झिरो फिगर किंवा एकदमच स्लिमट्रिम अशा कॅटेगिरीतल्या अभिनेत्रींच्या यादीत काही परिणिती चोप्राचं नाव येत नाही. पण तिचा फिटनेस आणि ज्या पद्धतीने तिने स्वत:ला मेंटेन केलं आहे ते अगदी परफेक्ट आहे.. म्हणूनच तर आता बऱ्याचा तरूण मुलींना आता झीरो फिगर करून एकदमच काडीमुडी दिसण्यापेक्षा परिणितीसारखं मेंटेन दिसायला आवडतं.. तुम्हालाही तिचा फिटनेस आणि वेट मेंटेन फंडा (fitness secret of Parineeti Chopra) समजून घ्यायचा असेल, तर ती त्यासाठी काय करते ते बघाच..
आपल्या स्वयंपाक घरात अनेक पदार्थ असतात. त्या पदार्थांचा व्यवस्थित वापर कसा करायचा, हे जर आपण समजून घेतले तर मग नक्कीच ते पदार्थ अधिक आरोग्यदायी ठरू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरच्याघरी काय उपाय करायचे, हे तर आपण कोरोना काळात अनुभवलेच आहेत.. त्यातलाच एक मस्त उपाय परिणितीने नुकताच इन्स्टग्राम स्टोरी (instagram story) म्हणून शेअर केला आहे. तिच्या या स्टोरीमध्ये एक मोठ्या आकाराचा कप असून या कपात काढ्याप्रमाणे दिसणारा एक पदार्थ आहे. या कपावर 'Greater gut health starts here' असं लिहिलं असून त्या खाली हा काढा कशापासून तयार करण्यात आला आहे, हे तिनं सांगितलं आहे.
सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरात अगदी सहज सापडतील, अशाच पदार्थांपासून तिने हा काढा बनविला आहे. त्यामुळे तिचा हा फिटनेस फंडा फॉलो करणं आपल्यासाठी मुळीच अवघड नाही. परिणितीने हा काढा जीरे, बडिशेप, ओवा आणि अद्रक या चार पदार्थांपासून तयार केला आहे. या चारही पदार्थांमध्ये असणारे एक ठळक साम्य म्हणजे हे चारही पदार्थ पचन क्रिया (digestion) आणि चयापचय क्रिया (metabolism) सुधारण्यासाठी खाल्ले जातात. जेव्हा आपली पचन क्रिया आणि चयापचय क्रिया सुधारते तेव्हा शरीरावर अतिरिक्त चरबीचे थर साचण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपोआपच वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला खूप काही मेहनत घेण्याची गरज पडत नाही. म्हणूनच तर वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी करून बघा हा परिणितीने सांगितलेला सोपा उपाय..
कसा करायचा हा वेटलॉस काढा...
- सर्वसामान्यपणे कोणताही काढा करण्यासाठी आपण जी पद्धत वापरतो, त्याच पद्धतीने हा काढा करावा.
- त्यासाठी सगळ्यात आधी एक ग्लासभर पाणी पातेल्यात घ्या आणि उकळायला ठेवा.
- या पाण्यात जीरे, ओवा, बडिशेप आणि अद्रकाचा किस हे सगळे पदार्थ एकेक टी स्पून टाकावेत.
- पाणी उकळून अर्धे होऊ द्यावे.
- त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि हा काढा गरमागरम पिऊन टाका.
- हा काढा पिताना जळजळ होऊ नये किंवा काढ्याची चव चांगली लागावी, यासाठी यात एक टी स्पून गुळ टाकावा.
- रोज सकाळी रिकाम्यापोटी हा काढा पिणे अधिक चांगले.