आंबे, टरबूज ही उन्हाळी फळं शर्यतीत असली तरी त्यांच्या काही काळ आधीच मार्केटमध्ये येऊन द्राक्ष त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण करतात. खाण्यासाठी सगळ्यात सोपं फळं कोणतं असं विचारलं तर त्याचं उत्तर म्हणजे द्राक्ष. ना चिरायची कटकट ना साेलून खाण्याची झंझट... बरं आकारही अगदी एवढासा.. कधीही येता- जाता एखादं द्राक्ष झटकन तोंडात टाकता येतं (Health Benefits of grapes).. म्हणूनच तर सध्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असणारं आणि अगदी सहज खाता येण्यासारखं हे फळ हंगाम असेपर्यंत भरपूर खाऊन घ्या.. का ते सांगते आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress shilpa shetty)...
शिल्पा शेट्टी तिच्या आरोग्याबाबत, फिटनेसबाबत (health and fitness tips) किती जागरूक आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे ती देत असलेला एखादा सल्ला मुळीच हलक्यात घेण्यासारखा नसतो. शिल्पाने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये ती द्राक्षं खाण्याचे फायदे सांगत आहेत. अगदी त्वचा व केसांपासून ते शरीरातील बॅड कोलेस्टरॉल कमी करण्यापर्यंत अनेक बाबतीत द्राक्षं कशी उपयोगी ठरतात, हे तिने सांगितले आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. त्यासोबतच त्यांच्यामध्ये असणारे काही विशेष ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेची, केसांची काळजी घेण्यासोबतच अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठीही मदत करतात.
द्राक्षं खाल्ल्याने मिळणारे फायदे
१. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त (controls blood pressure)
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी द्राक्षांमध्ये असणारे काही घटक अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे लो बीपी किंवा हाय बीपीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे द्राक्षं खावीत.
२. इम्युनिटी बुस्टर (immunity booster)
रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असणं किती गरजेचं आहे, हे कोरोनाने आपल्या सगळ्यांनाच शिकवलं आहे. त्यामुळेच रोगप्रतिकाक शक्ती वाढवायची असेल, तर सध्या द्राक्षांसारखा गोड आणि रसरशीत पर्याय उपलब्ध आहे. इम्युनिटी वाढविण्यासाठी द्राक्षं अतिशय उपयुक्त ठरतात. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 आणि लोह असते.
३. कोलेस्टरॉल राहते नियंत्रणात (controls cholesterol)
शरीरातील बॅड कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी द्राक्षं अतिशय उपयुक्त ठरतात. द्राक्षांच्या सेवनामुळे शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचा स्तर नियंत्रणात राहतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी द्राक्षं खाण्याचा सल्ला दिला जातो.
४. हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त (strengthens bones)
द्राक्षांमध्ये फायबर, प्रोटीन, लोह, तांबे, फोलेट हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळेच आरोग्य सुधारण्यासोबतच हाडांना मजबूती देण्यासाठीही द्राक्ष उपयुक्त ठरतात.
५. त्वचा आणि केसांसाठी उत्तम (beneficial for skin and hair)
द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. हे दोन्ही त्वचेसाठी ॲन्टीएजिंग घटक म्हणून काम करतात. त्यामुळेच जर त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ नयेत किंवा केसांचे आरोग्य उत्तम असावे असे वाटत असेल तर सध्याच्या हंगामात भरपूर द्राक्षं खाऊन घ्या.