जेवण म्हटलं की पोळी-भाजी, भात-आमटी, कोशिंबीर, चटणी असं सगळं ओघानेच आलं. ऑफीसला जात असलो तर आपण डब्यात फक्त पोळी-भाजी आणि चटणी किंवा सॅलेड नेतो. पण जेवायला घरात असू तर आपल्याला भात लागतोच. गरमागरम भात समोर आला की आपण स्वत:ला कंट्रोल करु शकत नाही. भात हा अनेकांचा वीक पॉईंट असतो. रात्रीच्या जेवणात किंवा सुट्टीच्या दिवशी दुपारी तरी आपण आवर्जून भात खातो. यामध्ये कधी साधा पांढरा भात असतो तर कधी मूगाच्या डाळीची खिचडी, मसालेभात, भाज्या घातलेला पुलाव, मसूर भात, पालक भात, दही भात असे असंख्य प्रकार आपण ट्राय करतो (Advantages and Disadvantages of Having White Rice).
पण भात खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? भाताचे आपल्या शरीरावर काय दुष्परीणाम होतात? कोणत्या प्रकारचा भात कोणत्या वेळेला खाल्लेला चांगला असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला कायमच पडतात. या प्रश्नांची उत्तरे शोधायचा आपण आपल्या परीने प्रयत्नही करत असतो. पण ती मिळतातच असे नाही. बरेचदा आपण सोशल मीडियाच्या किंवा अन्य माध्यमातून भाताविषयी काही ना काही माहिती वाचतो. पण नेमके काय बरोबर काय चूक हे ठरवणे मात्र आपल्याला अवघड जाते. आपण पांढरा भात खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात आणि भात कोणत्या कारणासाठी फायद्याचा असतो, जास्त प्रमाणात खाल्ला तर काय तोटे होतात हे आज आपण समजून घेणार आहोत. प्रसिद्ध लेखक लॉरेन मनाकेर याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात.
१. ऊर्जेचा उत्तम स्त्रोत
पांढऱ्या भातामध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण अतिशय चांगले असते. आपल्या शरीरासाठी हा ऊर्जा देणारा एक उत्तम स्त्रोत असू शकतो. तसेच विविध प्रकारच्या तांदळातून शरीराला आवश्यक असणारे वेगवेगळे पोषक घटक मिळत असतात. न्यूट्रीएटस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, तांदळातील फोलेटचा अपवाद वगळता सर्व प्रकारचे व्हिटॅमिन बी शरीरातील पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे शरीराची ऊर्जा टिकून राहण्यासाठी हा घटक अतिशय आवश्यक असतो. त्यामुळे भात कमी प्रमाणात खाल्ला किंवा खाल्लाच नाही तर शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्याचा शरीराच्या मेटाबॉलिक आणि एकूण आरोग्यावर वाईट परीणाम होतो.
२. हाडांसाठी फायदेशीर
पांढरा भात हा हाडांसाठी अतिशय फायदेशीर असतो असे म्हटले जाते. आता यामध्ये काय तथ्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे असतात. पण याशिवायही काही घटक हाडांना मजबूत ठेवण्याचे काम करत असतात. मॅंगनिज हा यातील एक महत्त्वाचा घटक असून भातामध्ये तो चांगल्या प्रमाणात असतो. त्यामुळे हाडे दिर्घकाल ठणठणीत ठेवायची असतील तर आहारात भाताचा समावेश असायला हवा.
३. अर्सेनिक घटकाचे प्रमाण
अर्सेनिक हा तांदळामध्ये असणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे जो आरोग्यासाठी तितका फायदेशीर नसतो. त्यामुळे आपण भात खातो तेव्हा हा घटक आपल्या शरीरात जातो. हातसडीच्या तांदळापेक्षा पांढऱ्या भातामध्ये अर्सेनिक या घटकाचे प्रमाण कमी असते. असे असले तरीही पांढरा भात योग्य त्या प्रमाणातच खायला हवा असा सल्ला तज्ज्ञ देतात. अर्सेनिक घटक आरोग्याच्या विविध समस्यांसाठी तोट्याचा असल्याने आपला तांदूळ ज्या देशात किंवा राज्यात पिकतो तेथील अर्सेनिक पातळी काय आहे याबाबत आपण माहिती घ्यायला हवी.