रोजच्या धावपळीत जीवनशैलीतील अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. कधी जेवणाच्या वेळा चुकवतो तर कधी रात्री खूप उशीरा झोपतो. जंक फूड खाणे, व्यायामाचा अभाव यांसारख्या गोष्टींकडे वेळीच योग्य ते लक्ष न दिल्याने त्याचा आपल्या तब्येतीवर विपरित परीणाम होतो. त्यामुळे जेवणाच्या वेळा, आपण घेत असलेला आहार यांकडे पुरेसे लक्ष द्यायला हवे. कधी हवामानातील बदलामुळे तर कधी आणखी काही कारणांनी आपली पचनशक्ती क्षीण होते. अशावेळी पोटाची योग्य ती काळजी घ्यायला हवी अन्यथा आरोग्याच्या तक्रारी आपल्या मागे लागल्याशिवाय राहत नाहीत. एखादवेळी दिवसा एखादी गोष्टी जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी खाल्ली तर ठिक आहे पण संध्याकाळच्या वेळी तर आहाराबाबत जास्त काळजी घ्यायला हवी (Avoid 4 food items for good health After 7 in the Evening).
सूर्यास्त झाला की आपली पचनशक्ती जास्त क्षीण होते. तसेच संध्याकाळनंतर आपल्या शरीराची फारशी हालचाल होत नसल्याने आहारात काय घ्यायला हवे, काय टाळायला हवे याची माहिती घ्यायला हवी. आपले रात्रीचे जेवण आणि झोप यांमध्ये किमान ३ तासाचे अंतर असावे. तसेच रात्री किमान १० वाजता झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय आरोग्यासाठी अधिक चांगली असते. रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ च्या आत घेतल्यास अधिक चांगले. त्यामुळे पचनशक्तीवर ताण तर येत नाहीच पण झोप चांगली लागण्यास, मूड फ्रेश राहण्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. रात्री न खाता झोपू नये पण जे खाऊ ते योग्य, बरोबर वेळेला आणि तब्येतीला मानवेल असे असावे असे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदीप काळे सांगतात.
रात्री कोणते पदार्थ टाळावेत
१. मसालेदार
भारत हा मसाल्याच्या पदार्थांचे मुख्य केंद्र मानले जाते. त्यामुळे भारतीय पदार्थांमध्ये मसाल्याचे घटक जास्त प्रमाणात वापरले जातात. मात्र मसालेदार पदार्थ रात्रीच्या वेळी खाल्ल्यास पित्त होणे, वर आल्यासारखे होणे, जळजळणे, मूळव्याध, फिशर अशा समस्या उद्भवू किंवा वाढू शकतात. मसालेदार पदार्थ साधारणपणे जास्त तेल किंवा बटर घालून बनवले जातात. ज्यांना कोलेस्टेरॉलची समस्या आहे अशांसाठी हे घातक असल्याने रात्रीच्या वेळी असे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.
२. मिठाई किंवा गोड पदार्थ
जेवल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर गोड खाणे ही भारतीय जेवणाच्या पद्धतीतील खासियत आहे. मात्र संध्याकाळी ७ नंतर गोड खाणे शक्यतो टाळायला हवे. रात्री गोड खाल्ल्याने झोपेच्या रुटीनमध्ये बाधा येऊ शकते. जेवणानंतर गोड खाल्ल्यास जेवण चांगले पचते असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण मिठाईमुळे आपण जास्त चार्ज होतो आणि त्यामुळे झोप जाऊन आपण रात्रभर जागे राहू शकतो.
३. तेलकट पदार्थ
पावसाळ्याच्या दिवसांत भजी, वडे अगदी सर्रास केले जातात. सकाळी ऑफीस आणि इतर गोष्टींची घाई असल्याने साधारणपणे रात्रीच्या जेवणात असे तळलेले पदार्थ केले जातात. मात्र संध्याकाळी ७ नंतर हे तळलेले पदार्थ खाल्ल्यास अॅसि़डीटी वाढण्याची शक्यता असते. रात्री तेलकट पदार्थ योग्य पद्धतीने पचले नाहीत तर झोपेच्या समस्या उद्भवतात. साधारणपणे तेलकट पदार्थ कितीही खाल्ले तरी पोट भरल्यासारखे किंवा खाल्ल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात.
४. कॅफीनयुक्त पेय
चहा, कॉफी यांसारख्या पदार्थांमध्ये कॅफीन असते हे आपल्याला माहित आहे. कॅफीन हे एक असे उत्तेजक आहे जे आपली झोप घालवण्यासाठी पूरक असते. म्हणूनच आपण सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतो. पण या गोष्टी रात्री झोपताना घेतल्यास झोप उडून जाते आणि याचा आपल्या संपूर्ण शेड्यूलवर परिणाम होतो.
याशिवाय रात्री झोपताना आवळा, तीळ किंवा तिळाचे पदार्थ, दही असे पदार्थ खाणेही टाळायला हवे, सुपारी, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांच्या सेवनानेही शरीरावर विपरित परीणाम होत असल्याने हे पदार्थही संध्याकाळी ७ नंतर खाऊ नयेत. हे पदार्थ पचायला जड असल्याने पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते. तसेच रात्री झोपताना व्यायामही करु नये असा सल्ला डॉ. काळे देतात.