दिप्ती काबाडे
वजन कमी करणे हे अनेकांसाठी एक मोठे आव्हान असते. वजन कमी करायचे या नादात आपण कधी व्यायाम, कधी डाएट तर कधी आणखी काही उपाय करतो. मात्र हे उपाय करणे बंद केले की पुन्हा आपली स्थिती जैसे थे होते. अशावेळी नेमके काय करावे, वजन कमी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याविषयी समजून घेऊया (Avoid 5 Mistake While Losing Weight).
1. अती स्ट्रिक्ट डाएट करणे
ही चूक तर अनेक लोक करतात. वजन कमी करणाऱ्या लोकांना आपले वजन कमीतकमी वेळात अगदी झटपट कमी व्हावे असे वाटत असते. त्यासाठी अनेक जण खूप कठीण असे डाएट निवडतात. कॅलरी अगदीच कमी असणारे डाएट निवडतात. अशा प्लॅन मध्ये दिवसभरातून फक्त दोन किंवा तीन वेळा खाण्याची परवानगी असते. या प्लॅनने सुरुवातीला खूप छान परिणाम दिसतात. वजन झपाट्याने कमी होते. मात्र हे डाएट फार काळ करता येत नाही कारण ते कठीण असते. एकदा डाएट सोडले की वजन पुन्हा वाढू लागते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जास्त कठीण प्लॅन निवडू नका. महिन्याला दोन ते अडीच किलो वजन कमी होईल असाच प्लॅन निवडा.
2. पाणी कमी पिणे
ही चूक विशेषतः स्त्रिया जास्त करतात. जर तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली जात नसेल तर शरीर पाण्याचा संचय करायला लागते, ज्याला वॉटर रिटेंशन म्हणतात. यामुळे वजन दीड ते दोन किलो वाढू शकते. शिवाय पचन व्यवस्थित होऊन अन्नातील प्रत्येक कॅलरी प्रोसेस होण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. पाणी योग्य प्रमाणात न पिण्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊन वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळे येतात. म्हणूनच दिवसभरात किमान दोन लिटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
3. व्यायामाकडे दुर्लक्ष करणे
काही लोकांना असे वाटत असते की जर आपण डाएट व्यवस्थित केला तर व्यायामाची काही गरज नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. डाएट च्या सोबतीला व्यायाम हवाच. तरच फॅट्स बर्न होण्याची प्रोसेस योग्य प्रमाणात होते आणि अपेक्षित परिणाम दिसू शकतो.
4. प्रत्येक आठवड्याला ब्रेक घेणे
काही लोक दर आठवड्याला एक चीट डे घेतात. म्हणजेच ते आठवड्यातून एक दिवस डाएट अजिबात पाळत नाहीत. उलट आवडीचे सर्व पदार्थ खातात. जर सतत असे केले तर सहा दिवसात कमी केलेले फॅट्स अगदी एका दिवसाच्या अनिर्बंध खाण्याने सुध्दा पुन्हा वाढू शकतात. म्हणूनच ब्रेक फक्त महिना पूर्ण झाल्यानंतर घ्यावा, तोही फक्त दोन दिवसांचा.
5. खाण्याच्या वेळा न सांभाळणे
कामात व्यस्त असल्याने, प्रवासात असल्याने किंवा इतर कोणत्याही कारणाने जर खाण्याच्या योग्य वेळा सांभाळल्या जात नसतील तर कोणतीही डाएट प्लॅन चा अपेक्षित परिणाम दिसू शकत नाही. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य अन्न सेवन करणे महत्त्वाचे आहे.
(लेखिका पुण्यात आहारतज्ज्ञ आहेत.)