काही जणांचं जेवण तर अगदी व्यवस्थित असतं. पण तरीही चांगला, उत्तम आहार घेऊनही त्यांची तब्येत अगदीच किडकिडीत असते किंवा मग तब्येतीच्या सारख्या काही ना काही कुरबुरी सुरू असतात. मग सगळं व्यवस्थित असूनही का सारखा वेगवेगळा त्रास होतो, हे कळत नाही. असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर त्याला पुढे नमूद केलेल्या काही गोष्टीही कारणीभूत ठरू शकतात, असं औरंगाबाद येथील आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगत आहेत. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी जेवणानंतर लगेचच काही गोष्टी करणं टाळायला पाहिजे.
जेवण झाल्या झाल्या या ४ गोष्टी करू नका
१. फळं खाणे
जेवण झाल्यावर किंवा जेवणात फळं खाण्याची सवय अनेकांना असते. ही सवय अतिशय चुकीची आहे. याचा अनुभव आपण आमरसाचे जेवण केल्यावर घेतो. आमरसाचे जेवण झाल्यानंतर आपल्याला सुस्ती येते. तसंच काहीसं इतर फळांच्या बाबतीतही होतं. याचं कारण म्हणजे जेवणानंतर लगेचच खाल्लेली फळं व्यवस्थित पचविण्यासाठी आपल्या पचन संस्थेवर लोड येतो. त्यामुळे ना धड फळांचं पचन होतं ना जेवणाचं. त्यामुळे जेवणानंतर लगेच फळं खाणं नकोच.
२. जेवणानंतर चहा
जेवण झालं की गरमागरम कडक चहा घ्यायचा आणि फ्रेश होऊन पुन्हा ऑफिसच्या कामाला लागायचं, अशी सवय अनेक लोकांना असते. त्यामुळे अनेक ऑफिसेसमध्ये जेवणानंतर चहा पिणारी अनेक मंडळी दिसून येतात. पण चहामधलं टॅनिन आपण जे काही जेवलो आहोत, त्यातील पोषण मुल्ये रक्तात मिसळण्याच्या कामात अडथळा निर्माण करतं. त्यामुळे तुम्ही पौष्टिक तर जेवता पण त्यातलं पोषण मात्र तुम्हाला मिळतच नाही.
३. जेवणानंतर लगेचच झोप नको
ही सवय देखील अनेक लोकांना असते. खास करून वयस्कर व्यक्ती आणि घरी असणाऱ्या गृहिणी. घरकाम आवरून झालं की जेवण करायचं आणि जेवण केलं की लगेचच डुलकी मारायची, हा अनेकींचा दिनक्रम असतो. पण व्यवस्थित पचन होण्यासाठी जेवणानंतर लगेचच झोपणं टाळा.
४. जेवणानंतर खूप पाणी
जेवण सुरू असताना आणि जेवणानंतरही गटागट पाणी पिण्याची सवय देखील खूप लोकांना असते. जेवण करायचं आणि त्यानंतर लगेचच पोटभर पाणी प्यायचं, यामुळे पचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामागचं कारण असं की जेवल्यानंतर आपल्या जठरात, आतड्यांमध्ये जेवण पचविण्यासाठी काही एन्झाईम्स तयार होतात. पाणी खूप प्यायल्याने या एन्झाईम्सच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि ते अन्नाचं व्यवस्थित पचन करू शकत नाहीत. त्यामुळे जेवणादरम्यान घोट घोटच पाणी प्या तसेच जेवण झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने तुम्हाला जाईल तेवढे पाणी प्या.