फेब्रुवारी महिना मध्यावर आला तसा आता वातावरणात बदल झालेला जाणवायला लागला आहे. आधी दोन- दोन पांघरुणं घेऊन रात्रीची थंडी जात नव्हती ते आता एका पांघरुणावर आलंय.. हळूहळू उन्हाचा पारा वाढणार तसा पंखा, त्यानंतर एसी असं सगळं सुरू होणार.. हा बाह्य बदल स्वीकारताना आपला आहार मात्र तसाच ठेवून कसं चालेलं. जसे थंडीचे कपडे उन्हाळ्यात चालत नाहीत, तसाच थंडीतला आहार उन्हाळ्यात (summer special food) पचनार नाही. म्हणूनच उन्हाळा सुरू होतोय तसं या काही पदार्थांचं सेवन कमी करून टाका...
१. तळलेले पदार्थ-हिवाळ्यात, पावसाळ्यात गरमागरम तळलेले पदार्थ खायला बरं वाटतं.. सहज पचन होत असल्याने असे पदार्थ खाऊन हिवाळ्यात त्रास होत नाही. हेच पदार्थ उन्हाळ्यात मात्र त्रासदायक ठरू शकतात. तळलेले पदार्थ उन्हाळ्यात पचायला जड जातात. शिवाय त्यामुळे खूप पाणी- पाणी होतं.. त्वचेसाठीही उन्हाळ्यात तळलेले पदार्थ खाणं अजिबात चांगलं नसतं..
२. सुकामेवाशरीरात उर्जा टिकून रहावी म्हणून हिवाळ्यात सुकामेवा भरपूर प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच हिवाळ्यात आपण सुकामेव्याचे लाडूही खातो. पण हाच सुकामेवा उन्हाळ्यात मात्र त्रासदायक ठरू शकतो. सुकामेवा उष्ण असतो. तो पचायलाही जड असतो. त्यामधलं पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात सुकामेवा खाणं कमी करा.
३. गूळगूळदेखील हिवाळ्यात आपण भरपूर प्रमाणात खातो. कारण गूळ उष्ण असतो आणि हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी, शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण उष्ण प्रकृतीमुळे उन्हाळ्यात मात्र गुळाचा वापर मोजून मापूनच व्हायला हवा.
४. तिखट, मसालेदार पदार्थतिखट आणि मसालेदार पदार्थांमध्ये capsaicin या पदार्थाचे प्रमाण जास्त असते. हा पदार्थ लाल मिरच्या किंवा लाल तिखटामध्ये असताे. उन्हाळ्यात जर मसालेदार पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले तर त्याचा पित्ताशयावर परिणाम होऊन पित्त दोष निर्माण होतो. त्यामुळे खूप जास्त घाम येणे, डिहायड्रेशन, अशक्तपणा असा त्रास जाणवू शकतो.
५. दालचिनी दालचिनी टाकून केलेला वाफाळता गरमागरम चहा हे तर हिवाळ्यातलं सुख. पण आता हे सुख बाजूला ठेवा कारण बाहेरची थंडी कमी होतेय आणि गरमी वाढत चालली आहे. दालचिनी हा एक मसाल्यातला पदार्थ असून तो चांगलाच उष्ण असतो. त्यामुळे उन्हाळ्यात दालचिनीचा वापर एकदम कमी करून टाका.
६. चहा- कॉफीथंडी पळविण्यासाठी हिवाळ्यात गरमागरम चहा- कॉफीचे कपच्या कप रिचवले जातात. पण उन्हाळा येतो म्हटल्यावर ही सवय सोडायला हवी. उन्हाळ्यात या पदार्थांचं अतिसेवन शरीरात उष्णता निर्माण करू शकतं. अनेक जणांना चहा- कॉफीच्या अतिसेवनामुळे वारंवार लघवीला जावं लागतं. त्यामुळेही डिहायड्रेशन होऊन विकनेस येऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात या पेयांचे कमी सेवन केलेलेच बरे.