वजन कमी करायचं ही अनेकांपुढील एक मोठी समस्या असते. वजन एकदा वाढलं की ते कमी करण्यासाठी अनेक जण काही ना काही प्रयत्न करत असतात. कधी काही डाएट करुन तर कधी भरपूर व्य़ायाम करुन आपण वजन घटवण्याचा प्रयत्न करतो मात्र तो सफल होतोच असे नाही. बैठी जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव यांमुळे वजनवाढीची समस्या सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. वाढलेलं वजन कमी करणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. अनेकदा वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या इतर समस्या भेडसावतात इतकेच नाही तर वजनामुळे मानसिकरित्याही नैराश्यात गेलेले लोक आपण आजुबाजूला पाहतो. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ दिक्षा भावसार एक अतिशय सोपा उपाय सांगतात (Ayurveda Doctor Diksha Bhavsar Suggest How to Take Honey as Fat Burner).
आयुर्वेदात मधाचे अतिशय चांगले महत्त्व सांगितले आहे. शरीराच्या आतील आणि बाहेरील समस्यांसाठी मध उपयुक्त ठरतो. मध स्वादाला जेवढा चांगला तितकाच तो आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त असतो. नैसर्गिक स्वीटनर असलेला मध आयुर्वेदिक फॅट बर्नर म्हणून ओळखला जातो. तहान कमी करण्यासाठी, कफ, मूत्रविकार कमी करण्यासाठी मधाचा अतिशय चांगला उपयोग होतो. आयुर्वेदात तर या मधाला बरेच महत्त्व आहे. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार मधाचा शरीरावरील चरबी घटवण्यासाठी कसा उपयोग होतो हे सांगतात. इन्स्टाग्रामवर एक रील शेअर करत त्या आपल्याला याबाबत माहिती देतात. पोस्टच्या कॅप्शनमध्ये मधाचे फायदे सांगून त्याचे सेवन नेमके कशापद्धतीने केल्यास फॅटस बर्न होतात याबाबत डॉ. भावसार सांगतात.
मध कशासोबत घ्यावा, कशासोबत घेऊ नये?
साध्या पाण्यात २ चमचा मध घालून घेतल्यास त्याचा वजन कमी होण्यास अतिशय चांगला फायदा होतो. तसेच १ चमचा मध, हळद आणि मीरपूड एकत्र करुन घेणे कफ कमी होण्यासाठी फायद्याचे असते. अनेक जण वजन कमी होण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट किंवा गरम पाण्यात मध घालून घेतात पण ते चुकीचे आहे. तसेच मध कोणत्या गोष्टींसोबत खायचा नाही याचीही माहिती डॉ. भावसार आपल्या पोस्टमध्ये देतात. गरम पाणी किंवा कोणत्याही गरम पदार्थासोबत मध घेऊ नये. तसेच तुम्ही उष्णकटीबंधात राहत असाल तर मधाचा वापर शक्यतो टाळावा. तसेच तूप किंवा मसालेदार पदार्थांसोबतही मध घेऊ नये.