शुभा प्रभू साटम
बफौरी. हा पदार्थ भोजपुरी आहे किंवा मध्य प्रदेशामधील म्हणा,छत्तीसगड राज्य अस्तित्वात यायच्या आधीच्या मध्य प्रदेशातला. बस्तर इथं आणि आजूबाजूच्या आदिवासी समाजात हा पदार्थ हमखास होतो,आणि मध्य प्रदेशात अन्य ठिकाणीही. याचे प्रमुख कारण पदार्थ करायला लागणारं साहित्य स्वस्त. तेल ,तूप लागत नाही पण चवीला म्हणाल तर अप्रतिम, सध्या जे वेगन खाणे लोकप्रिय होतेय त्यात परफेक्ट बसणारा हा पदार्थ,अर्थात आपण यात आपल्या आवडीनुसार साहित्य वाढवू शकतो..तर पाहूया बफौरी.
साहित्य
चणा डाळ-2 वाट्या ,छान टपटपीत भिजवून,चार तास तरी भिजली पाहिजे.
आले ,हिरवी मिरची ,जिरे ,कोथिंबीर भरडून,यात लसूण ऐच्छिक आहे.
हळद मीठ हे झाले पारंपरिक पद्धतीने बापूरी करण्याचे साहित्य.
आता यात आपण काय व्हॅल्यू एडिशन करू शकतो?
भाज्या बारीक चिरून/किसून
मका दाणे उकडून भरडून
कांदा बारीक चिरून
पनिर किसून
चीझ/बटर
कृती
चणाडाळ निथळवून मिक्सरमधून भरडसर वाटून घ्यावी.
त्यात मिरची आले वाटण ,मीठ ,हळद घालून व्यवस्थित कालवून घ्यावे.
वर सांगितलेले पदार्थ घालणार असल्यास याच वेळी कालवावेत.
नीट एकत्र करून मिश्रणाचे गोल गोळे करून तेल लावलेल्या इडली पात्रात ठेवून उकडवून घ्यावेत.
साधारण दहा मिनिटात होतात.
चटणी सोबत द्यावेत.
आदिवासी बायका हे गोळे केळीच्या पानावर उकडतात आणि मीठ लावलेल्या हिरव्या मिर्चीसोबत देतात.
मस्त चवीचा सोपा नाश्ता तयार. वेगनही. प्रोटीनही. डाएटसाठी उत्तम. चवीला उत्कृष्ट आणि करायला अगदी सोपा. बफौरी.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)