भारत, जपान, इटली, पर्शिया या देशातलं साम्य शोधायचं तर ते कसं आणि कुठे शोधणार? तर ते शोधायचं जेवणाच्या ताटात. भारतात डाळ भात हा जेवणाचा मुख्य भाग. इटलीमधे भाताचाच प्रकार रिसोट्टो, जपानमधे ऑनिगिरी म्हणजे भाताचे बॉल्स , पर्शियामधे पर्शिअन राइस हे प्रामुख्याने जेवणात असणारे पदार्थ. म्हणजे भाताचीच विविध रुपं. भारत, इटली, जपान, दक्षिण अमेरिका , मध्य पूर्वेत भात प्रामुख्यानं खाल्ला जातो कारण भातातील पौष्टिक गुणधर्म. भाताचा स्वाद. शिवाय भातासोबत डाळ, भाजी असं काहीही छान लागतं आणि त्यामुळे भात आणखीनच पौष्टिक होतो. आपल्या शरीरला आवश्यक असणारे पोषक गुणधर्म भातात असतात. शिवाय भातामुळे शरीराला कामाची ऊर्जा मिळते आणि भात पचायलाही सोपा असतो.
Image: Google
पण तरीही सध्या मोठ्या प्रमाणावर भाताला पर्याय काय हे प्रामुख्यानं शोधलं जातंय. याचं कारण भात आरोग्याला हानिकारक आहे म्हणून नाही तर काही आरोग्यविषयक समस्यांमुळे डॉक्टरांनी आहारातील कर्बोदकं कमी करायला सांगितलेले असतात, काहींना आपल्या रोजच्या आहारातून उष्मांक कमी करायचे असतात तर काहींना भाताची अँलर्जी असते म्हणून भाताला पर्याय हवे असतात.
भाताला पर्याय शोधायचे तर त्याच्या तोडीचे गुण असणारे पदार्थच शोधावे लागतील. भातामुळे जेवणाचं ताट संतुलित होण्यास मदत होते. भात जर आहारातून वजा केला तर मग भाताशिवाय संतुलित आहार कसा होणार हे बघणं आवश्यक आहे. आहार तज्ज्ञांनी भाताला भाताच्या तोडीचे पर्याय सांगितले आहेत. जे पौष्टिक तर आहेतच सोबत चविष्ट असून वजन कमी करण्यास आणि एकूणच आरोग्य सांभाळण्यास उपयुक्त आहेत.
भाताला भाताच्याच तोडीचे पर्याय
Image: Google
1 क्विनोआ- क्विनोआ म्हणजे बिया. दक्षिण अमेरिकेतलं हजारो वर्षांपासूनचं प्रमुख अन्न आहे. भारतातही क्विनोआची चर्चा होतेय कारण त्यातली गुणधर्म वजन कमी करण्यास फायदेशीर असतात आणि आरोग्यास पोषकही . अगदी बारीक बिया स्वरुपात असलेला क्विनोआ हे ग्लूटेन फ्री असून यात भातापेक्षा प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. वनस्पतीजन्य अन्नामधील क्विनोआ हा असा पदार्थ आहे ज्यात प्रथिनांची साखळी पूर्ण करणारे सर्व नऊ अमिनो अँसिड उपलब्ध आहेत. शिवाय यात तांब आणि मॅग्नेशिअम ही दोन प्रमुख खनिजंही आहेत. चविष्ट पध्दतीने क्विनोआ करण्याच्या अनेक पाककृती आहेत. त्यामुळे आपल्या आहारात भात नाही याचं शल्य क्विनोआ ताटात असला तर अजिबात वाटत नाही.
Image: Google
2. मिलेट- आपल्याकडील बाजरी, नागली, ज्वारी हे मिलेटचं आहेत. हे धान्य सध्या भरड स्वरुपातही मिळतात. जे विविध भाज्या आणि मसाले घालून उपम्याप्रमाणे करता येतात. तसेच आज बाजारात विविध स्वरुपात मिलेटस उपलब्ध असून ते भाताला चांगले पर्याय ठरत आहे. नुसत्या भातालाच नाही तर ज्यांना गव्हातील ग्लुटेनची अँलर्जी आहे त्यांनादेखील पोळीला पर्याय म्हणून मिलेट हे खाण्याचा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ देतात. मिलेट उपमा, खिचडी, मिलेट डोसा, मिलेट इडली या अनेक प्रकारे मिलेट चवीची आणि पोषणाची गरज भागवतात.
Image: Google
3. दलिया- दलिया म्हणजे भरड स्वरुपातील गहू. मध्य पूर्वेकडील देशात तर दलिया हे मुख्य अन्नाच्या स्वरुपात खाल्ला जातो. कोंडायुक्त दलिया आरोग्यासाठी फायदेशीर असतो. ड्युरम प्रकारच्या गव्हापासून तयार केला जातो. कोंड्यामुळे दलिया पौष्टिक तर होतोच शिवाय पोट भरल्याचं समाधानही दलिया खावून मिळतं. दलियामुळे आतड्यातील आरोग्यदायी जिवाणुंची वाढ होते. त्यामुळे पचन चांगलं होवून बध्दकोष्ठता होत नाही. दलियामधे फोलेट, बी6 जीवनसत्त्वं, नियासिन, तांबं, मॅग्नीज, मॅग्नेशिअम आणि लोह हे महत्त्वाचे घटक असतात.
Image: Google
4. फ्लॉवर भात- हिवाळ्यात फ्लॉवर मोठ्या प्रमाणात बाजारात मिळतो.क्रुसीफेरस वर्गीय फ्लॉवरचा आहारात भाताच्या स्वरुपात समावेश केला जातो. फ्लॉवरमधे उत्तम पोषणमूल्यं असतात. शिवाय फोलेट, के जीवनसत्त्व, फायबर आणि आरोग्यास फायदेशीर गुणधर्म फ्लॉवरमधे असतात. फ्लॉवर स्वच्छ धुवून तो किसून घ्यावा. आणि तो उकडून केवळ मीठ, मिरे पूड घालूनही छान लागतो . किंवा विविध भाज्या आणि मसाले घालूनही उत्तम लागतो. या फ्लॉवर भातात अगदी कमी उष्मांक असतात. वजन कमी करण्यासाठी फ्लॉवर भात उपयुक्त असतो.
Image: Google
5. किसलेली कोबी- फ्लॉवर वर्गातलीच कोबी ही देखील भाताला पर्याय ठरते. कमी उष्मांक आणि कर्बोदकं असलेल्या कोबीला विशिष्ट चव असते. ती इतर कोणत्याही पदार्थासोबत चवीने खाता येते. कोबी किसून घेऊन त्यात चवीपुरती मीठ, मिरची, गरम मसाला, चाट मसाला, पास्ता मसाला घालता येतो. आपला साधा कोबी, रंगीत कोबी किसून खाल्ल्यास भाताची गरज तर पूर्ण होतेच पण पोटही लवकर भरतं. कोबीत क, के ही जीवनसत्त्वं असतात. तसेच फोलेट, पोटॅशिअम आणि मॅग्नेशियम हे मुख्य गुणधर्म असतात