गणेशोत्सवात किंवा संकष्टी चतुर्थीला हमखास भाव खाऊन जाणारी एक वस्तू म्हणजे गणरायाला अतिशय प्रिय असणारी दुर्वांची जुडी. गणपतीला दुर्वा का इतक्या प्रिय असतात, याची जी गोष्ट सांगितली जाते, त्यातही दुर्वांचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. दुर्वांचा उपयोग शरीराचा दाह, उष्णता कमी होण्यासाठी होतो, असं आपण ऐकलेलं आहे. पण दुर्वांचा फक्त तेवढाच उपयोग नाही. दुर्वा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असून त्वचाविकारांपासून ते पचन संस्थेतील दोष कमी करण्यापर्यंत अनेक आजारांसाठी दुर्वांचा रस घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.
१. नैसर्गिकपणे बॉडी डिटॉक्स होते
दुर्वांमध्ये 'फ्लॅवोनाईड्स' या अतिशय पोषक घटकांचा समावेश असतो. यामुळे शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करायचे असेल, तर दुर्वांचा रस अतिशय फायदेशीर ठरतो. सणासुदीच्या दिवसात खूप खाणे होते. त्यामुळे जर दुसऱ्या दिवशी आपण दुर्वांचा रस घेतला तर पचन संस्थेच्या समस्या दूर होतात आणि बॉडी डिटॉक्स होते. दुर्वांचा रस घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास टळतो आणि पचनसंस्था सुधारते.
२. स्त्रियांचे आजार कमी होतात
युरीन इन्फेक्शन होण्याचे प्रमाण पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक असते. युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी दुर्वा अतिशय प्रभावी ठरतात. युरिन इन्फेक्शन झाल्यास दिवसातून दोन वेळेस दुर्वांचा रस लिंबू पिळून घ्यावा. लगेचच आराम जाणवतो. मासिक पाळीत खूप पोट दुखत असल्यास किंवा ब्लिडिंग खूप जास्त होत असल्यास दुर्वांचा रस घ्यावा.
३. अंगावरून पांढरे जात असल्यास...
अनेक महिलांना अंगावरून खूपच पांढरे पाणी जाते. यालाच पांढरा पदर जाणे असेही म्हणतात. अंगावरून पांढरे जाणे म्हणजे काही तरी संसर्ग झाला आहे. त्यामुळे असा संसर्ग झाला असेल तर दुर्वांचा रस दही टाकून घ्यावा. यामुळे लगेचच फरक दिसून येतो.
४. साखरेची पातळी संतुलित राहते
दुर्वांचा रस घेतल्याने शरीराती साखरेची पातळी संतुलित राहते. यामुळे मधुमेहींसाठी दुर्वांचा रस अतिशय गुणकारी आहे. हा रस मधुमेह असणाऱ्यांनीच घ्यावा, असे काही नाही. सण समारंभ असल्यावर बऱ्याचदा गोड पदार्थांचे जास्त सेवन केले जाते. अशावेळी शरीरातील वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दुर्वांचा रस घेणे फायद्याचे ठरते.
५. रोगप्रतिकारशक्ती वाढते
सध्या कोरोनामुळे प्रत्येक जण रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल, याची काळजी घेत आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा उत्तम उपाय म्हणजे दुर्वांचा रस घेणे. दररोज सकाळी दोन टेबलस्पून एवढा जरी दुर्वांचा रस घेतला तरी आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते.
६. मूळव्याध बरा होतो
दुर्वांचा रस दही टाकून घेतल्यास मूळव्याधीचा त्रास लक्षणीय प्रमाणात कमी होतो. मुळव्याधीची सुरूवात होते आहे, असे लक्षात आल्यास लगेचच घरच्याघरी हा उपाय सुरू करावा. आजार बळावणार नाही.
७. सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग
त्वचेवर पुरळ उठले असतील, तर दुर्वांचा रस पिणे उत्तम आहे. तसेच उष्णतेमुळे जर चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील, तोंड आले असेल, तरी दुर्वांचा रस घ्यावा. अंगातील उष्णता कमी होते आणि त्वचेचा दाह थांबतो. पिंपल्सवर दुर्वा आणि हळद यांची पेस्ट करून लावल्यास लगेचच फरक पडतो. दुर्वांचा रस पिल्याने रक्त शुद्ध होते. त्यामुळे आपोआपच चेहऱ्यावर ग्लो येतो.