Join us  

थंडीत खायलाच हवे काळे तीळ, ऊर्जेसोबतच मिळतील ३ जबरदस्त फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 11:48 AM

Benefits of Black Sesame : काळ्या तीळामध्येही आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच घटक असतात आणि त्याचा थंडीच्या दिवसांत शरीराला चांगला फायदा होतो.

ठळक मुद्देतिळामध्ये असलेले कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम हृदयाच्या कार्यासाठी फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत काळे तीळ खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते. 

थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचा आपण आहारात आवर्जून समावेश करतो. या काळात आपण फळं, भाज्या, गूळ, बाजरी तसेच सुकामेवा, तीळ हे पदार्थ आवर्जून खातो. या पदार्थांमुळे शरीराला ऊर्जा मिळायला मदत होते आणि शरीराचे पोषणही होते. हवेत असणाऱ्या गारठ्यामुळे शरीराची जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने आहाराच्या माध्यमातून शरीराला ती ऊर्जा मिळवावी लागते. म्हणूनच संक्रातींच्या काळात तील लावलेली भाकरी, तीळ-गुळाची पोळी, तिळाचे लाडू किंवा वड्या आवर्जून खाल्ले जातात. आपण साधारणपणे पांढरे तीळ खातो. पण काळे तीळ सहसा वापरले जात नाहीत. मात्र काळ्या तीळामध्येही आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच घटक असतात आणि त्याचा थंडीच्या दिवसांत शरीराला चांगला फायदा होतो. पाहूयात काळे तीळ खाण्याचे फायदे (Benefits of Black Sesame)...

(Image : Google)

१. हाडांसाठी फायदेशीर

थंडीच्या दिवसांत साधारणपणे हाडांचे दुखणे डोके वर काढते. अशावेळी हाडांचे दुखणे किंवा सांधेदुखी दूर होण्यासाठी काळे तीळ फायदेशीर ठरतात. तीळामध्ये असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे घटक हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे थंडीत आवर्जून या तीळांचा आहारात समावेश करायला हवा. 

२. बद्धकोष्ठतेपासून आराम 

थंडीच्या दिवसांत साधारणपणे पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पोट साफ होण्यासाठी शरीराला जास्तीत जास्त फायबर्सची आवश्यकता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत काळे तीळ खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. डायबिटीस आणि हृदयरोग 

सध्या डायबिटीस आणि हृदयरोग या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. तिळामध्ये असलेले कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम हृदयाच्या कार्यासाठी फायदेशीर असते. तसेच डायबिटीसमुळेही अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी काळे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. काळे तीळ आपल्याकडे अशुभ मानले जात असल्याने ते खायचे नसतात असा एक समज आहे. मात्र आरोग्याच्या दृष्टीने त्यात अनेक उपयुक्त घटक असतात हे नक्की. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्य