तब्येतीबाबत अतिशय जागरूक असणारे, डाएट फॉलो करणारे लोक जेव्हा त्यांच्या डाएटबाबत बोलतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात अनेक वेगवेगळे पदार्थ, फळं, भाज्या येतात. ज्या भाज्या किंवा फळं सहजासहजी आपल्या लोकल मार्केटमध्ये दिसत नाहीत. शिवाय त्या भाज्या आणि फळं अतिशय महागड्या देखील असतात. त्यामुळे आरोग्य सांभाळायचं, फिटनेस जपायचा तर असंच काहीतरी महागडं खावं लागतं की काय, असा सामान्यांचा समज होतो.. (importance of banana)
पण हा समज साफ चुकीचा आहे, हे आपल्या तेव्हाच लक्षात येईल, जेव्हा आपण केळी खाण्याचे विशेष आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ. केळी हे असं एक फळ जे सगळीकडे अतिशय मुबलक प्रमाणात आणि स्वस्तात उपलब्ध असतं. त्यामुळेच कदाचित आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. याविषयी तज्ज्ञ सांगतात की दररोज फक्त एक केळ खा.. यामुळे शरीराला अनेक लाभ मिळतात. जर तुमचं वर्कआऊट चांगलं असेल किंवा भरपूर अंग मेहनतीचं काम करत असाल तर दोन केळी दिवसभरातून खा. पण त्यापेक्षा अधिक नको.
केळी खाण्याचे फायदे
१. आतड्यांची कार्यक्षमता वाढते
२०१७ मध्ये झालेल्या न्युट्रीशन बुलेटीनच्या सर्वेक्षणानुसार केळी आतड्याच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. आतड्याची कार्यक्षमता चांगली असली की आपोआपच खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. केळीमुळे आतड्यातील short-chain fatty acids चे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता अधिक बळकट होते.
२. केळीमुळे वेटलॉसही शक्य (weight loss with banana)
केळीमध्ये फायबर आणि प्रथिने यांचे चांगले प्रमाण असते. त्यामुळे जेव्हा आपण केळी खातो तेव्हा अधिक काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरात उर्जा टिकून राहते. पण वजन घटविण्यासाठी केळी खाणार असाल तर दिवसभरातून १ पेक्षा अधिक केळ नकोच.
३. त्वचेचे साैंदर्य वाढते (improves skin)
केळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे मँगनीज केळीमध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दररोज १ केळ खाल्ल्यास पिंपल्स, त्यांचे काळे डाग, कोरडी निस्तेज त्वचा असा त्रास दूर होतो आणि त्वचेचे आरोग्य सुधारून ती अतिशय चमेदार तजेलदार होते.
४. हृदयाचे आरोग्य सुधारते (helps for heart's health)
केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. हृदयाच्या आरोग्यासाठी पोटॅशियम खूप आवश्यक आहे. अनेकदा पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्याने रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी आणि हृदयासंबंधी इतर काही तक्रारी उद्भवू नये, यासाठी नियमितपणे केळी खाणे फायद्याचे ठरते.
५. डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त (beneficial for eyes)
नजर तेज व्हावी, लहान मुलांना लवकर चष्मा लागू नये, डोळ्यांचे आरोग्य चांगले असावे, यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण डोळ्यांच्या दृष्टीने केळीदेखील गाजराएवढीच उपयुक्त आहे. केळीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. म्हणून लहान मुलांनाही नियमितपणे केळी खायला द्यावी.