सुकामेवा आरोग्यासाठी पोषक असतो. त्यामुळे दररोज थोडा का होईना पण सुकामेवा आपल्या पोटात जायलाच हवा, असं आहारतज्ज्ञ सांगतात. सुकामेव्यामध्ये बेदाणे किंवा लाल मनुका किंवा किसमिस हा एक महत्त्वाचा भाग आहे. बेदाणे खाल्ल्यामुळे शरीरातील लोह, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते (Benefits Of Eating Kismis). ॲनिमियाचा त्रास असेल तर तो कमी होतो. पचनशक्ती उत्तम होण्यास मदत होते. पण असे सगळे फायदे तेव्हाच मिळतील, जेव्हा तुम्ही घेतलेले बेदाणे हे उत्तम दर्जाचे असतील. ते उत्तम दर्जाचे आहेत, हे कसं ओळखावं आणि बेदाणे खरेदी करताना कोणती गोष्ट तपासून घ्यावी, ते पाहा..
बेदाणे खरेदी करताना कोणती गोष्ट तपासून घ्यावी?
बेदाणे खाल्यामुळे काय फायदे होतात आणि ते खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून घ्यायला पाहिजेत, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी dcdhyani_naturopathy या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
म्हातारपणी पार्किंसन, अल्झायमरचा त्रास नको तर ३ सवयी आताच लावून घ्या- मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी...
यामध्ये ते सांगतात की बेदाणे खरेदी करताना ते लालसर असणं गरजेचं आहे. आकाराने लहान, कच्चे असणारे तसेच खाल्ल्यावर थोडेसे आंबट लागणारे बेदाणे खरेदी करू नका. असे बेदाणे खाल्ल्यास पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
बेदाणे खाल्ल्यामुळे होणारे फायदे
रात्री बेदाणे पाण्यात भिजत घालावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते खावेत. यामुळे पोट फुगणे, अपचन असा त्रास कमी होतो. लघवी मोकळी होण्यास मदत होते.
ज्यांच्या शरीरात खूप उष्णता असते किंवा ज्यांना नेहमीच तोंड येते, अशा व्यक्तींनी बेदाणे भिजत घालताना त्या पाण्यात थोडं सैंधव मीठ टाकावं आणि दुसऱ्या दिवशी ते बेदाणे बारीक चावून खावेत. यामुळे अंगातली उष्णता कमी होते आणि लिव्हरच्या आरोग्यासाठीही ते चांगले आहे.
१० ते १५ बेदाणे आणि चमचाभर बडिशेप रात्री पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी बेदाणे व बडिशेप एकत्र करून खा. यामुळे ॲसिडीटीचा त्रास कमी होतो.