शीतल मोगल (आहारतज्ज्ञ)
आपण सगळे भारतीय संस्कृतीत वाढलो आहोत. आपली संस्कृती कितीतरी हजार वर्ष जुनी आहे व पिढ्यानपिढ्या आपण ती जपत आलो आहोत. प्रत्येक सणाला प्रत्येक ऋतुला व प्रत्येक उपवासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. "अन्न हे पूर्ण ब्रह्म " असे म्हटले आहे. पूर्ण सकस आहार घेणे रोज घेणे हे जसे शरीरसौष्ठवासाठी महत्त्वाचे आहे व गरजेचे आहे तेवढेच गरजेचे आहे ते शरीर आतून स्वच्छ करणे व त्याला एक ऊर्जा देणे ! आणि यासाठीच आपल्या संस्कृतीत उपवास हा एक महत्त्वाचा संस्कार आहे.
जसा निसर्गाला बदल अनिवार्य आहे तसाच शरीराला पण बदल हवा असतो. जसे मनाला व मेंदूला शांतता व नवीन ऊर्जेची गरज असते तेव्हा आपण रोजच्या दिनचर्येला ब्रेक देऊन जागा बदलतो किवा योग, ध्यान या माध्यमातून एक ऊर्जा व नावीन्य देतो त्याचप्रमाणे शरीराला नावीन्य व ऊर्जा देण्यासाठी उपवास अतिशय महत्त्वाचा असतो.लेखाच्या प्रारंभी दिलेल्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे "उपवास" या शब्दाची फोड अशी आहे-‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे राहणे. धार्मिक अर्थाप्रमाणे देवाच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. धार्मिक सण, पूजाअर्चा अशी घाई असलेल्या या दिवशी अन्न शिजविण्यामध्ये वेळ जाऊ नये व देवाला जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी उपवास केला जातो. अन्न-पाणी वर्ज्य करून राहणे म्हणजे उपवास. सामान्यपणे उपवासाचा अर्थ म्हणजे हलका वा मीत आहार घेणे. उपवास म्हणजे दैनंदिन आहार वर्ज्य करून शरीर शुद्धी करण्याचा एक नैसर्गिक व आयुर्वेदिक उपचार. तपाच्या निरनिराळ्या प्रकारात ‘उपवास’ हा सर्वश्रेष्ठ असे महाभारतामध्ये नमूद आहे.
आषाढी एकादशी, महाशिवरात्र, रामनवमी, हरतालिका, श्रावण महिना, नवरात्र अशा व्रतांमध्ये उपवासाचे स्थान महत्त्वाचे आहे. ज्यावेळी हे व्रत व उपवास येतात त्या त्या वेळी निसर्गात मोठे बदल होत असतात. एक ऋतू संपून दुसरा येत असतो. शारीरिकदृष्ट्या एक नवीन बळ घेऊन या बदलत्या ऋतूंना सामोरे जाण्यासाठी उपवास करावा. योग्य पद्धतीने केलेल्या उपवासामुळे प्रतिकारशक्ती अगदी १०० टक्के वाढते आणि निरनिराळ्या व्याधींना आळा नक्कीच बसतो...उपवास हे एक रामबाण औषध असते.प्राणीमात्रांमध्ये कुणी आजारी पडले तर ते अन्नाचा एक कण पण घेत नाहीत आणि काही काळात ठणठणीत बरे होतात. आश्चर्य आहे ना....? उपवास हे निसर्गाने दिलेले एक वरदान आहे आणि दुर्दैव असे की हे आपण विसरत चाललो आहोत.
1. एकादशी आणि दुप्पट खाशी....असंच आपल्याकडे असतं. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणा, बटाटे, रताळं, बटाटा पापड, बटाटा किस, तळलेले शेंगदाणे, उपवासाचे थालीपीठ, दाण्याची आमटी, चिप्स, ड्रायफ्रूट, भगर, मिल्कशेक असे अनेकानेक पदार्थ बनवायची नुसती लगबग असते....आणि इथेच आपण चुकतो....उपवास हा एक संस्कार म्हणून न घेता त्याला सणाचं रूप देतो.2. उपवास करताना तो शक्यतो फक्त पाण्यावर करावा किवा निसर्गाने बहाल केलेला उत्तम पर्याय म्हणजे फळं .फळांमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज ) असल्याने शरीराला ताकद व ऊर्जा मिळते. बाकीचे सर्व पदार्थ म्हणजे जिभेचे चोचले आहेत.
3. ज्यांना असा उपवास सहन होत नाही त्यांच्यासाठी भगर आणि रताळं हे उत्तम उपाय आहेत. भगरीमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस मुबलक असतं, त्यामुळे भगर पचायला अतिशय हलकी असते. वजन कमी होण्यास मदत होते, हाडांना मजबुती मिळते, ऊर्जेची पातळी वाढते, मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी भगर हे एक परिपूर्ण अन्न आहे.3. दुसरा पर्याय रताळं...जीवनसत्वयुक्त रताळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. हे उकडून खाल्याने त्यातील बहुतांश पोषक मूल्य टिकून राहतात.
4. उपवासाला साबुदाणा शक्यतो टाळावा. तो पचायला जड असतो.5. प्रत्येकाची ताकद व शरीररचना भिन्न भिन्न असल्याने आपल्याला सहन होईल असाच आहार उपवासाला घ्यावा. दही, ताक, भगर, रताळे आणि फळं यांचा आहारात समावेश असावा.
काय करायला हवे?1. उपवास उपवास म्हणून खूप घोळ घालू नका. हलकं अन्न घ्या आणि भरपूर पाणी प्या.2. आपल्याला किती आहार लागतो हे तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे. खूप खाणं टाळा; पण त्याचबरोबर योग्य ते खा.3. दीर्घायुषी व निरोगी राहण्यासाठी निसर्गाने आपल्याला उपवास हे रामबाण औषध दिलेलं आहे हे कायम लक्षात ठेवा.