कढी हा अनेक जणांचा आवडीचा पदार्थ. अनेक घरांमध्ये तर खिचडीसोबत कढी (benefits of eating kadhi khichadi) हमखास केलीच जाते. कधी कधी पराठे, धपाटे केलेले असतील तर त्यासोबतही कढी खाल्ली जाते. एरवीही बऱ्याचदा घरी ताक केलं किंवा दही खूप आंबट झालं की भाजी फार काही विशेष आवडीची नसेल तर कढी केली जाते. पण ही कढी नेमकी कशासोबत खाणं अधिक आरोग्यदायी मानलं जातं? याविषयीची ही माहिती. शिवाय उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात कढी प्यावी की नाही, हा देखील प्रश्न अनेकांना पडतो.. वाचा नेमकं काय करावं..
उन्हाळ्यात कढी प्यावी की नाही?
कढीमध्ये जे मसाले वापरले जातात, त्यावरून कढी ही उष्ण मानली जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत, सर्दी- खोकला असा त्रास होत असल्यास गरमागरम कढी प्यावी, असा सल्ला दिला जातो. पण उष्ण असल्याने कढी उन्हाळ्यात पिऊ नये, असं मात्र मुळीच नाही. इतर ऋतुंमध्ये कढी आहारात असणं जेवढं फायद्याचं असतं, तेवढंच ते उन्हाळ्यातही आहे. त्यामुळे उन्हाळा आला म्हणून कढी पिणं बंद करायचं, असं करू नका. कारण उन्हाळ्यात होणारे अनेक त्रास कमी करण्यासाठी कढी फायद्याची ठरते, असं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात.
कढी पिण्याचे फायदे (benefits of kadhi)
- उन्हाळ्यात अनेक जणांची भूक मंदावते किंवा काही खाण्याची इच्छा होत नाही. अशा लोकांनी आवर्जून कढी प्यावी. त्यामुळे चांगली भूक लागते.
- कॉन्स्टीपेशनचा त्रास तसेच गॅसेस होऊन पोट फुगण्याचा त्रास होत असेल, तर तो कमी करण्यासाठी कढी पिणे चांगले आहे.
- मायग्रेनचा त्रास कमी करण्याासाठी कढी प्यावी.
- यासोबतच केस आणि त्वचा यांच्या आरोग्यासाठीही कढी चांगली आहे, असे दिवेकर सांगतात.
कशासोबत कढी खाणे अधिक चांगले?
पोळीपेक्षा भातासोबत कढी खाणे अधिक आरोग्यदायी मानले जाते. ज्याप्रमाणे आपण दही- भात खातो, त्याचप्रमाणे कढी- भात हे एक उत्तम अन्न आहे. त्यामुळेच आपल्याकडे कढी- खिचडी खाण्याची पद्धत फार पुर्वीपासून चालत आली असावी. भातासोबत किंवा खिचडीसोबत कढी खाणे हे प्री आणि प्रो बायोटिकचे एक उत्तम कॉम्बिनेशन मानले जाते. तसेच त्यातून बऱ्याच प्रमाणात ॲमिनो ॲसिडची निर्मिती होते. त्यामुळे आयुर्वेदानुसार औषधी मानली गेलेली कढी उन्हाळ्यातही घ्यायलाच हवी.