आपला आहार हा प्रोटीन, फायबर्स, व्हिटॅमिन्स, स्निग्ध पदार्थ, खनिजे अशा सर्वांगिण असावा असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. शरीराचे पोषण होण्यासाठी आहारात हे सगळे घटक योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. रोजच्या जेवणात आपण भाजी-पोळी किंवा भात आमटी आवर्जून खातो. पण सॅलेड खातोच असे नाही. ऑफीसला डबा नेताना त्यामध्ये प्रामुख्याने पोळी-भाजी नेली जाते. पण कोशिंबीर किंवा सॅलेड नेण्याचा आपण कंटाळा करतो किंवा विसरतो. पण सॅलेड हा आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असून रोजच्या आहारात किमान एका वेळेला तरी सॅलेड असायलाच हवे (Benefits of Having Salad in Diet).
सॅलेडमध्ये फायबर्स असल्याने आरोग्यासाठी सॅलेड खाणे अतिशय चांगले असते. कोशिंबीर किंवा सॅलेड असेल तर आपले पोट भरते आणि आपोआपच आपण इतर पदार्थ कमी खातो. त्यामुळे जास्त खाल्ल्याने वाढणारे वजन नियंत्रणात येण्यात सॅलेडचा महत्त्वाचा सहभाग असतो. इतकेच नाही तर यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. कच्चे सॅलेड, उकडून, फोडी करुन किंवा कोशिंबीर करुन आहारात सॅलेड आवश्यक घ्यायला हवे. यामध्ये कोबी, मुळा, काकडी, गाजर, टोमॅटो, बीट यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो. प्रसिद्ध डायटिशियन शिखा कुमारी आहारात सॅलेड का असायला हवे याची ४ महत्त्वाची कारणं सांगतात, ती कोणती पाहूया.
१. आपण खात असलेल्या पदार्थातील पोषण शरीराला मिळण्यासाठी सॅलेड अतिशय महत्त्वाचे काम करतात.
२. कलरफूल असणारी सॅलेड फळं आणि फळभाज्या यांपासून तयार होतात त्यामुळे ती शरीराला फायदेशीर असतात. वजन कमी होण्यासाठी सॅलेड अतिशय फायदेशीर ठरते.
३. सॅलेडमुळे शरीराला फायबर तर मिळतेच पण त्यासोबत व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन सी हे घटक मिळण्यासही मदत होते.
४. सॅलेडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होतो.