Join us  

नाश्ता करतानाच खा दिवसभर पुरेल एवढी एनर्जी देणारा 'हा' पदार्थ, डायबिटिस असणाऱ्यांसाठी आवश्यकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 3:15 PM

Benefits of having soaked moong for breakfast : वजन नियंत्रणात येईल आणि मिळेल भरपूर प्रोटीन

रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. नाश्त्याला भरपूर एनर्जी देणारे, पोटभरीचे आणि प्रोटीन्स असलेले पदार्थ असायला हवेत असं आपण अनेकदा ऐकतो. मोड आलेले मूग हा यातीलच एक महत्त्वाचा पर्याय असून ते करायला आणि खायलाही सोपे असतात. मोड आलेल्या मूगाची कोरडी उसळ, मिसळ, डोसे, आप्पे असे बरेच पदार्थ करता येतात. सॅलेडसारखेही या मूगामध्ये कांदा, काकडी, शेंगदाणे, पनीर असे काही काही घालून खाता येते. मूगामध्ये शरीराला आवश्यक असे बरेच घटक असल्याने नाश्त्याला नियमितपणे मूग खायला हवेत. पाहूयात मूग खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे होतात (Benefits of having soaked moong for breakfast). 

१. प्रोटीनचा उत्तन स्त्रोत

मुगामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. स्नायूंच्या बळकटीसाठी, पेशींची बांधणी करण्यासाठी आणि एकूण आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते.

(Image : Google)

२. एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत 

मुगामध्ये व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्नेशियम हे घटक असतात. भिजवलेले मूग खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळण्यास मदत होते. शरीरातील ऑक्सिजन वहनाचे काम सोपे होत असल्याने थकवा निघून जाण्यास याचा चांगला फायदा होतो.

३. पचनक्रिया सुरळीत होते

मुगामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास तसेच बद्धकोष्ठता दूर होण्यास त्याचा फायदा होतो. मुगामुळे कॉम्प्लेक्स शुगर कट होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते.

४. रक्तातील साखरेचे प्रमाण

मुगाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखर निर्मितीचे काम नियंत्रणात आणण्यासाठी याचा फायदा होतो. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह असणारे आणि दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायची असेल तर सकाळी नाश्त्याला मूग खाणे फायदेशीर असते.

(Image : Google)

५. वजनावर नियंत्रण 

फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पटकन पोट भरल्यासारखे वाटते. एकदा सकाळी पोटभर मूग खाल्ले की नंतर सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यआहार योजना