Join us  

डोळ्यांची जळजळ ते वेटलॉस.. अनेक समस्यांवर एक उन्हाळी फळ सोपा उपाय.. खाऊन तर बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2022 6:54 PM

Benefits of Mulberry: एवढंसं फळ.. पण किती त्याची कमाल... त्यामुळे वाचा त्याचे फायदे आणि करून टाका सुरुवात.. अगदी आजपासूनच!

ठळक मुद्दे मलबेरी खाण्यामुळे शरीराला होणारे लाभ वाचा आणि बाजारात दिसलं तर लगेच खरेदी करा आणि भरपूर खा.. 

आपल्या सभोवती अनेक फळं किंवा पदार्थ असतात, ज्याचा खरा उपयोग आपल्याला माहितीच नसतं.. त्यामुळे काखेत कळसा आणि गावाला वळसा... अशी आपली अवस्था अनेक वेळा होऊन जाते.. आता हेच बघा ना.. मलबेरी हे एक छोटंसं फळ. पण आपण त्याला कधीच गांभिर्याने घेत नाही. समर फ्रुट म्हणून ओळखलं जाणारं मलबेरी या दिवसांत अनेक प्रांतात आढळून येतं. पण बाकीची फळं खाण्याच्या नादात आपण एकतर या काळ्या- सावळ्या दिसणाऱ्या लालसर फळाकडे दुर्लक्ष करतो किंवा मग त्याचे फायदेच माहिती नसल्याने ते विकत घेणं टाळतो...(why to eat mulberry?)

 

पण उन्हाळ्यात इतर फळांप्रमाणेच मलबेरीही आवर्जून आणि भरपूर खाल्ली पाहिजेत, असं सांगत आहेत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर. त्या इन्स्टाग्रामवर खूप ॲक्टीव्ह असून डाएट, फिटनेस, व्यायाम याविषयी त्या नेहमीच काही ना काही महत्त्वाची माहिती शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी मलबेरी खाण्याचे फायदे समजावून सांगितले आहेत. त्यामुळे मलबेरी खाण्यामुळे शरीराला होणारे लाभ वाचा आणि बाजारात दिसलं तर लगेच खरेदी करा आणि भरपूर खा.. 

 

मलबेरी खाण्याचे फायदे (benefits of eating mulberry)१. उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा सारखी स्क्रिन पाहून डोळे थकले असतील तर अशा थकलेल्या डोळ्यांसाठी उत्तम उपाय म्हणजे मलबेरी. कारण त्यातून carotenes and zeaxanthin हे दोन डोळ्यांसाठी पोषक असणारे घटक भरपूर प्रमाणात मिळतात. जास्त स्क्रिन पाहिल्याने अनेकदा डोळे कोरडे होण्याची समस्याही जाणवते. हा त्रास कमी करण्यासाठीही मलबेरी खावी.

 

२. रोगप्रतिकारक शक्ती (improves immunity) वाढविण्यासाठी मलबेरी हे अतिशय उत्तम फळ मानलं जातं. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे हे फळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून उन्हाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार रोखता येतील. ३. वेटलाॅससाठी प्रयत्न करत असाल तरी मलबेरी भरपूर प्रमाणात खा. कारण यामुळे भरपूर उर्जा मिळते आणि त्यामुळे मग भरपूर वेळासाठी भूक न लागल्याने इतर काही खाण्याची गरज पडत नाही.

 

मलबेरीचे इतर उपयोग- मलबेरीमध्ये व्हिटॅमिन के, सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनाचा त्रास असणाऱ्यांना मलबेरी खाणे फायदेशीर ठरते.- मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मलबेरीचा उपयोग होतो.- कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर.- मलबेरीमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टी बॅक्टेरियल घटक असल्याने हिरड्यांचे दुखणे कमी करण्यासाठी  उपयुक्त.  

टॅग्स :अन्नफळेसमर स्पेशलआरोग्यहेल्थ टिप्स