डाळिंब सोलण्यासाठीच थोडा वेळ लागतो. पण डाळिंबाचं खरखरीत साल एकदा निघून गेलं की आतले लालसर दाणे अगदी बघताक्षणीच खावे वाटतात. कुणाला मीठ टाकून खायला आवडतात, तर कुणी नुसतेच गटकावून टाकतात. पचनशक्ती वाढवून हृदय, पोट आणि यकृताचं कार्य सुरळीत करण्यास मदत करण्याची अजब शक्ती डाळिंबाच्या दाण्यांमध्ये असते. म्हणूनच तर ज्यांना भूक लागत नाही, त्यांची भूक वाढविण्यासाठीही आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठीही डाळिंबाचा ज्यूस पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
डाळिंबांचा ज्यूस पिण्याचे फायदे- त्वचेचे सौंदर्य राखण्यात डाळिंबाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच तर त्वचा तजेलदार होण्यासाठी डाळिंबाचा रस चेहऱ्यावर लावण्याचा सल्लाही दिला जातो. - शरिरातील साखरेची पातळी संतूलित ठेवण्याचे काम डाळिंब करते. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे, अशा व्यक्तींनाही डॉक्टरांचा सल्ला घेऊन डाळिंब खाणे चालते. - रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस घ्यावा. म्हणूनच तर आजारातून उठलेल्या व्यक्तीचा अशक्तपणा दूर करण्यासाठी त्याला दररोज डाळिंब दिले पाहिजे. - हिरड्या मजबूत करण्यासाठी, तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी आणि दातांच्या मजबुतीसाठी डाळिंबाचे दाणे दररोज बारिक चावून खाण्याचा सल्ला दिला जातो.
- डाळिंबाच्या ज्यूसमध्ये ॲन्टीऑक्सिडंट्स, विटामिन्स अणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असतात.- लोह आणि फॉलिक ॲसिड डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ॲनिमियाच्या रूग्णांनी आणि गरोदर महिलांनी दररोज डाळिंब खावे.- डाळिंबामध्ये असणारे विशिष्ट घटक कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पेशींची वाढ रोखतात.- डाळिंबाच्या रसात असणारे अँटी-इंफ्लेमेटरी घटक हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत.- डाळिंबाच्या रसामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.- डाळिंबाचा रस शरीराला डिटॉक्स करतो. त्यामुळे यकृत निरोगी राहतो.
- हाडांना मजबूत करून सांध्यातील वेदना कमी करण्यासाठीही डाळिंब उपयुक्त ठरते. - पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता अशा पचनासंबंधी तक्रारी असणाऱ्यांनी रोज डाळिंब खावे.- डाळिंब शरीरातील वायू आणि कफ दोषाचा नाश करते.
- गर्भवती स्त्रियांना उलटीचा त्रास होत असल्यास त्यांनी डाळिंब खावे. - शरिरातील उष्णता कमी करण्यास डाळिंब मदत करते.