Join us  

सकाळी व्यायाम केल्यानंतर काय खायचं? ४ पदार्थ, फिट होण्याचा वाढवतील वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 9:14 AM

Best Food Options After Morning Exercise : व्यायामानंतर भूक लागते हे जरी खरे असले तरी नेमके काय खाल्लेले चांगले हे लक्षात घ्यायला हवे.

ठळक मुद्देव्यायामानंतर लागलेली भूक योग्य पदार्थांनी शमवायला हवी, नाहीतरसकाळी वजन कमी होण्यासाठी व्यायाम करता, पण त्यानंतर काहीही खाता?

सकाळी व्यायाम झाल्यावर आपल्याला सणकून भूक लागते. रात्री लवकर जेवण झालेले असते, सकाळी आपण लवकर उठलेले असतो, त्यात पोट चांगले साफ झाल्याने पोटात खड्डा पडलेला असतो आणि भरपूर व्यायामही झालेला असतो. अशावेळी व्यायामाहून आल्या आल्या काय खावे असा प्रश्न आपल्याला पडतो. कधी आपण व्यायाम म्हणून चालायला जातो तर कधी जीमला कधी घरच्या घरीच काही व्यायाम करतो. काहीही असेल तरी व्यायाम हा व्यायाम असतो आणि तो झाल्यावर भूक लागतेच. अशावेळी आपण काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या तर वजन नियंत्रणात येण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे व्यायामानंतर खाल्ल्या तर चालतील आणि वजन नियंत्रणात ठेवतील अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया (Best Food Options After Morning Exercise).

(Image : Google)

१. दाणे किंवा सुकामेवा 

दाणे आणि सुकामेवा यामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅटस असतात. शरीर मजबूत बनवण्यासाठी हे दोन्ही घटक अतिशय उपयुक्त असतात. व्यायामामुळे शरीराची खर्च झालेली ऊर्जा भरुन येण्यासाठी यांचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे व्यायाम झाल्यावर सुकामेवा खाणे उपयुक्त असते. यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

२. फळं 

सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घेण्यापेक्षा फळं खाणं केव्हाही चांगले. फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने शरीराला एकदम एनर्जी मिळते. पोट भरले जात असल्याने इतर पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात. फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण चांगले असल्याने फळे आरोग्यासाठी अतिशय चांगली असतात. प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण फळांमध्ये चांगले असल्याने पोट साफ होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फळे केव्हाही चांगली. 

३. मोड आलेली कडधान्ये 

कडधान्यांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात. कडधान्यांना मोड आणल्यावर ती पचायला हलकी होतात. व्यायामामुळे आपली बरीच ऊर्जा खर्च झालेली असते. अशावेळी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. दिवसातील पहिले खाणे म्हणजेच नाश्ता हा प्रोटीन्स युक्त असावा असे आहारतज्ज्ञही सांगतात. मोड आलेली कडधान्ये कच्ची, फक्त उकडून, उसळ करुन किंवा मिसळीसारखी खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

(Image : Google)

४. ओटस 

ओटसमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. व्यायामामुळे लागलेली भूक भागवण्यासाठी ओटस हा उत्तम उपाय आहे. ओटसमुळे बराच काळ भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. ओटसमध्ये आपण फळे, ड्रायफ्रूटस, दूध, मध असं सगळं घालून खाऊ शकतो किंवा ओटसचा डोसा, इडली असे पदार्थही छान लागतात. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाफिटनेस टिप्स