वजन वाढण्याचं प्रमाण लॉकडाऊननंतर प्रचंड वाढलेले आहे. वजन वाढवणं जेवढं सोपं आहे ना, त्याहून अनेक पटीने कमी करणे कठीण आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात व्यायाम करणे, आळसं सोडणे आदींपेक्षा कठीण जाते ते खाण्यावर नियंत्रण ठेवणे. जिभेचे चोचले पुरवल्याशिवाय मानसिक समाधान खवय्यांना मिळतंच नाही. मात्र कितीही व्यायाम केला तरी योग्य आहार घेतल्याशिवाय वजन कमी होणे शक्य नाही. वजन वाढणार नाही आणि पोटही भरेल असं काहीसं चविष्ट खायला मिळाले तर किती बरं होईल असा विचार तुम्ही करत असाल तर ही रेसीपी तुमच्यासाठीच आहे. तेच-तेच बोरींग सॅलेड खाऊन कंटाळले असाल, तर हे सॅलेड बनवून खा. पोट भरेलच पण मनही तृप्त होईल.
टिपः आजकाल सॅलेड म्हटलं की विदेशी भाज्या आल्याचं. मात्र आपल्या साध्या रोजच्या वापराच्या भाज्यासुद्धा पौष्टिक असतात. त्या ताज्या असतात. त्यांचा वापर जास्त करावा. विदेशी भाज्या फार महाग मिळतात. आपल्या रोजच्या जेवणातल्या भाज्या स्वस्त आणि ताज्या असतात.
साहित्यः
कोबी, सिमला मिरची, गाजर, पाणी, मीठ, सोयाबीन, तेल, तिखट, पनीर, कांदा, टॉमॅटो, ओरेगानो
ड्रेसिंगसाठी साहित्यः लसुण, मिरची, पुदिना, कोथिंबीर, उकडलेले बीट
तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यादेखील वापरू शकता.
कृतीः
-सर्वप्रथम कोबी, सिमला मिरची, गाजर, लांब लांब कापून घ्या. एका मोठ्या भांड्यात या भाज्या आणि त्या पूर्ण बुडतील एवढं पाणी घेऊन त्यात चमचाभर मीठ घाला. आता या भाज्या छान उकळून घ्या. मधे-मधे ढवळत राहा.
-भाज्या पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करा आणि थोडा वेळ निथळत ठेवा.
-थोड्या गार झाल्यावर पाणी गाळून टाका. हे पाणी तुम्ही प्यायला वापरू शकता. पाणी राहणार नाही याची काळजी घ्या.
-एकीकडे सोयाबीनसुद्धा मऊ होईपर्यंत उकळून घ्या.
-आता एका पॅनमध्ये थोडासं तेल घ्या त्यात थोडे तिखट व मीठ घाला. तिखट करपण्या आधीच कापलेले पनीरचे तुकडे, उकळलेले सोयाबीन व चिरलेला कांदा त्यात परतून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत परता म्हणजे चव छान लागेल.
-एका मिक्सरच्या भांड्यात लसुण, मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि उकडलेले बीट घाला. थोडस मीठ घालून अगदी थोडं पाणी घाला. व्यवस्थित वाटून घ्या.
-नंतर पनीर, सोयाबीन, कांदा भाज्यांमधे घाला. चिरलेला टोमॅटो घाला. वरतून वाटलेले ड्रेसिंग घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
-वरतून थोडं ओरेगानो घाला.