आपल्याला सुंदर दिसायचं तर त्यासाठी आपण फिट आणि फाईन असण गरजेचं असतं. सौंदर्य हे केवळ दिसण्यावर नसतं तर ते आपल्या फिटनेसवरही अवलंबून असतं. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर कशी दिसते असा प्रश्न तरुणींना पडतो. पण कितीही हेक्टीक शेड्यूल असलं तरी अभिनेत्री अनेकदा आपलं फिटनेस आणि डाएट रुटीन बिघडू देत नाहीत. अभिनेत्री भाग्यश्री तर स्वत: फिटनेस आणि डाएटच्या बाबतीत जागरुक असतेच पण आपल्या चाहत्यांनाही ती याबाबत सातत्याने माहिती देत असते. त्यामुळे इन्स्टाग्रामवर भाग्यश्रीचे असंख्य चाहते असून ते सगळे तिने सांगितलेल्या टिप्स फॉलो करतात. नुकतीच तिने डाएट बाबतची एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासोबत शेअर केली आहे (Actress Bhagyashree Beauty Diet Secret).
यामध्ये भाग्यश्री आहारात सॅलेड का असायला हवे आणि सॅलेडचे आरोग्याला काय फायदे होतात याबाबत सांगितले आहे. दर मंगळवारी भाग्यश्री आपल्या अकाऊंटवरुन एक महत्त्वाची टिप शेअर करत असते, यामध्ये तिने सॅलेड खाण्याचे महत्त्व सांगितले आहे. या सलाडमध्ये पालेभाज्या, सॅलेड, नटस आणि टोफू, पनीर, अंडे असे प्रोटीन असलेले काहीही एकत्र केले तरी छान लागते आणि मुख्य म्हणजे शरीराला हे सगळे फायदेशीर असते. सॅलेड योग्य पद्धतीने केले असेल तर ते एक वेळचे जेवण म्हणूनही आपण घेऊ शकतो.
कारण यामध्ये कार्बोहायड्रेटस, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, खनिजे सगळेच असते. त्यामुळे फक्त डाएट करणाऱ्यांनीच सॅलेड खावे असे नाही. तर आपण सगळेच जण सलाड खाऊ शकतो असेही भाग्यश्री सांगते. निरोगी राहण्यासाठी आपले आतडे चांगले असणे महत्त्वाचे असते. आपल्या पोटात 100 ट्रिलियन पेक्षा जास्त सूक्ष्मजीव असतात, ते एका मोठ्या संयुक्त कुटुंबासारखे राहत असतात. त्या सर्वांना आनंदी ठेवणे किती कठीण आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. परंतु उत्तम आहार घेऊन आपण त्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी नक्कीच मदत करु शकतो. सॅलेड पोषक तत्वांचा खजिना असल्याने आहारात सॅलेडचा आवर्जून समावेश करायला हवा.