Join us  

कारल्याची भाजी खाण्याचे 5 फायदे; कडू कारले आरोग्यासाठी गोड मानलेलेच बरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 7:50 PM

कारल्याची भाजी चवीसाठी नाही तर गुणांसाठी खावी. तज्ज्ञ सांगतात कारल्याची भाजी खाण्याचे महत्वाचे फायदे

ठळक मुद्देकारल्याच्या भाजीतील औषधी गुणधर्मामुळे कारल्याची भाजी आठवड्यातून एक ते दोन वेळेस खायलाच हवी असं आहार तज्ज्ञ सांगतात.कारल्यामुळे हदयविकार, कॅन्सर, फॅटी लिव्हर यासारख्या गंभीर समस्यांचा धोका कमी होतो. 

आहारात विविध भाज्या खाणं आवश्यक असतं. भाज्यांचं प्रयोजन केवळ चवीसाठी नसतं. आरोग्याच विचार करुन भाज्यांचा आहारात समावेश करायचा असतो असं आहार तज्ज्ञ म्हणतात. अमूक भाजी आवडते आणि तमूक आवडत नाही , हे आवडी निवडीपुरती ठीक असलं तरी आरोग्याचा विचार करता प्रत्येक भाजीला आहारात महत्व द्यायला हवं. सर्व भाज्यांप्रमाणे हाच न्याय कारल्याच्या भाजीलाही लावायला हवा. 

Image: Google

कारल्याच्या भाजीत अ, ब, क जीवनसत्व असतात. त्यासोबतच केरोटीन, बीटाकेरोटीन, लूटीन, लोह,, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीजसारखे आरोग्यास उपयुक्त घटक असतात. त्यामुळेच कारल्याची भाजी आठवड्यातून एक ते दोन वेळा खायलाच हवी असं आहार तज्ज्ञ सांगतात. कारल्यामुळे पचन यंत्रणा सुधारते, भूख सुधारते. पोटदुखी, ताप, डोळ्यांचे विकार यावर कारलं औषधी असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

Image: Google

कारल्याची भाजी का खावी?

1. कारल्याचा भाजी किंवा ज्यूसचा स्वरुपात आहारात समावेश करायला हवा. कारल्यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्यानं मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आणि मधुमेह असल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी कारल्याचा उपयोग होतो.

2. वजन कमी करण्यासाठी कारल्याची भाजी उपयुक्त असते. कारल्याच्या भाजीतल्या गुणधर्मांमुळे  वजन कमी होतं किंवा नियंत्रित ठेवलं जातं. 

3. कारल्यामधे फ्लेवोनाॅइडस हे ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कारलं खाणं महत्वाचं आहे. आयुर्वेदानुसार कॅन्सरच्या उपचारात कारल्याचा समावेश केलेला असतो. 

Image: Google

4. कारलं सेवन केल्यामुळे यकृतातील विषारी  घटक बाहेर टाकले जातात. फॅटी लिव्हरसारख्या समस्यातही कारलं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. 

5. कोलेस्टेराॅल वाढल्यानं हदय विकाराचा धोका संभवतो. हा धोका कमी करण्यासाठी कारलं खाणं आवश्यक असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात. कारल्यामध्ये शरीरातील बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं. नियमित आहारात कारल्याचा समावेश असल्यास कोलेस्टेराॅल नियंत्रणात राहातं.

टॅग्स :आहार योजनावेट लॉस टिप्सअन्न