आपल्याला हातसडीचा तांदूळ माहित असतो, सेंद्रिय पध्दतीनं पिकवलेला तांदूळ आपण खाल्लेला असतो, आरोग्यासाठी म्हणून अधून मधून ब्राऊन राइसही वापरतो , पण आपण कधी ब्लॅक राइसबद्दल ऐकलंय का? तांदळाचा हा कुठला प्रकार. खरंतर तांदळाच्या सर्व प्रकारात ब्लॅक राइस ही तांदळाचे जात खूप पौष्टिक मानली जाते. सुपरफूडच म्हणतात या तांदळाला. भारतात हा ब्लॅक राइस केवळ ईशान्य भारतात विशेषकरुन मणिपूरमधे होतो. तिथे या भाताला ‘चाक- हावो’ असं म्हटलं जातं. तज्ज्ञांच्या मते हा भात पिकवणं अवघड गोष्ट आहे. पण या तांदुळाचे फायदे खूप आहेत.
Image: Google
ब्लॅक राइस खावा कारण..
1. ब्लॅक राइस मधे 123 प्रकारचे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. तांदळाच्या कोणत्याच प्रकारात इतक्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस नसतात. याशिवाय या तांदळात प्रथिनं, फायबर आणि लोहाचं प्रमाणही पुष्कळ असतं.
2. या तांदळात फ्लेवोनॉइडस भरपूर असतात. त्यामुळे शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत होते आणि तांदळातल्या या गुणामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं.
3. ब्लॅक राइसमधे अँंन्थोसायनिन्सचं प्रमाण भरपूर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अनेक अभ्यासांचा निष्कर्ष सांगतो की अँन्थोसायनिन्सचा समावेश असलेले पदार्थ खाल्ल्यास त्याचा कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी फायदा होतो.
4. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ब्लॅक राइस उपयुक्त असतो. कारण यात लुटेइन आणि झियाक्सानथिन हे अँण्टिऑक्सिडण्टस फ्री रॅडिकलमुळे होणार्या नुकसानापासून डोळ्यांचं रक्षण करतात.
5. फायबरचं प्रमाण भरपूर असल्यानं आणि प्रथिनंही मुबलक असल्यानं ब्लॅक राइस खाल्ल्यास सारखी भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा तांदूळ उपयुक्त मानला जातो.
Image: Google
ब्लॅक राइसची खीर
ब्लॅक राइसपासून खीर, बिर्याणी यासारखे पदार्थ तयार करता येतात. तज्ज्ञ म्हणतात भिजवलेल्या ब्लॅक राइसचं पाणी तांदळाचे पेय बनवताना त्यात वापरले तर फायदेशीर ठरतं.
ब्लॅक राइसचा प्रत्यक्षात उपयोग करताना एक कप ब्लॅक राइस तीन ते 5 तास पाण्यात भिजवावा. नंतर एका कढईत 8 कप दूध गरम करावं. दुधाला उकळी फुटली की त्यात भिजवलेला ब्लॅक राइस घालावा. गॅसची आच मंद करावी. जोपर्यंत दूध निम्मं होत नाही तोपर्यंत तांदूळ शिजवावा. दूध निम्मं झालं की गॅस बंद करुन त्यात साखर किंवा गुळ घालावा. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं आणि नंतर त्यात सुकामेवा आणि वेलची पूड घालावी. ब्लॅक राइसची खीर थोडा वेळ फ्रीजमधे ठेवून सेट करावी आणि मग खावी.