ब्रेकफास्ट हा दिवसभराच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे ब्रेकफास्ट पोटभर आणि हेल्दी असावा असं आपण नेहमी ऐकतो. आता आपण घरात असू तर आपल्याला हवं ते करुन घेता येणं शक्य असतं. पण आपण कामानिमित्ताने बाहेर असू तर मात्र आपलं आहाराकडे थोडं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. अशावेळी आपली आबाळ होण्याची शक्यता असते. पण बाहेर असतानाही आपण नक्कीच हेल्दी नाश्ता करु शकतो. कधी ऑफीसच्या कामासाठी, कधी फिरायला गेलेलो असतानाही आपल्याला नाश्त्याचे बरेच पर्याय उपलब्ध असू शकतात. काही गोष्टी आपण आपल्या सोबतही कॅरी करु शकतो. तर काही गोष्टी आपण आहोत त्या ठिकाणी सहज मिळू शकतात. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहोली घराबाहेर असताना नाश्त्यासाठी परफेक्ट होतील असे काही पदार्थ सुचवतात, ते कोणते पाहूया (Breakfast Options when You Are Out)..
१. कडधान्ये
मोड आलेली कडधान्य आणि त्यावर मीठ, मीरपूड घालून खाणे हा उत्तम पर्याय असतो. प्रोटीन आणि फायबर तसेच इतरही अनेक उपयुक्त घटक मिळत असल्याने हा ब्रेकफास्टला नक्कीच एक चांगला पर्याय आहे.
२. सिड्स
तुळशीच्या किंवा सब्जाच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्या आणि सकाळी ते पाणी प्यायलं तर मेटाबॉलिझम चांगलं ठेवण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे. सुकामेव्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचा आपण ब्रेकफास्टमध्ये वापर करु शकतो.
३. ज्यूस
वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस हाही ब्रेकफास्टच्या वेळी घेण्यासाठी चांगला पर्याय आहे. फळांचे ज्यूस, कोल्ड कॉफी, लस्सी यांसारखी पेय आपल्याला ब्रेकफास्टमध्ये घेता येतात.
४. फळं
फळं हा सकाळी खाण्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. आपण बाहेर असलो तरी त्याठिकाणी साधारणपणे लोकल फळं मिळतात. ही फळं घेऊन ती स्वच्छ करुन खाणं हा सोपा आणि हेल्दी पर्याय असतो.
५. सिरीयल
कॉर्नफ्लेक्स, व्हीट फ्लेक्स यांसारखे सिरीयल फूड आपण ब्रेकफास्टला खाऊ शकतो. दूध, मध आणि सुकामेवा घालून हे सिरीयल्स खाता येतात. हे कॅरी करणेही सोपे असल्याने आपण प्रवासाला जाताना ते सोबत घेऊ शकतो. हल्ली नाचणी, ज्वारी अशा विविध धान्यांचे सिरीयल्स मिळतात. लाह्या, मुरमुरे हेही ब्रेकफास्टला खाण्यासाठी चांगले पर्याय आहेत.
६. पराठा, उपमा
पराठा, पुरी, उपमा हे साधारणपणे हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक असतात. पोटभरीचे असल्याने सकाळी एकदा खाल्ल्यावर आपल्याला लवकर भूक लागण्याची शक्यता नसते.