वजन कमी करायचा मार्ग खाण्यातून जातो. खाणं टाळणं, खाण्यातून एक एक पदार्थ वजा करत जाणं हा वजन कमी करण्याचा आरोग्यदायी मार्ग नाही असं आहारतज्ज्ञ म्हणतात.अनेकजण वजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळतात. आहारतज्ज़ांच्या मते ही सर्वात मोठी चूक आहे. कारण नाश्त्याद्वारे वजन नियंत्रित करता येतं आणि वजन कमीही करता येतं. दिवसभर भूक लागली आहे या भावनेतून सुटका करुन घेण्यासाठी, निराशा आणि आळस टाळण्यासाठी सकाळी व्यवस्थित नाश्ता करणं हा योग्य पर्याय आहे.नाश्ता केल्यानं वजन वाढतं हा गैरसमज आहे उलट नियमित पोटभरीचा नाश्ता केल्यास वजन कमी होतं , काम करण्याची ऊर्जा वाढते अन दिवसभर समाधानी वाटतं.
सकाळी नाश्त्या केल्यानं काय होतं?
नाश्ता शरीराला इंधन देतं
रात्रीच्या जेवणानंतर सकाळपर्यंत खाण्यात एक मोठा गॅप पडतो. त्यामुळे शरीराला सकाळी ऊर्जेची आवश्यकता असते. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास दुपारच्या जेवणापर्यंत कामाच्या धावपळीसाठी आपल्याला जी ऊर्जा लागते ती मिळते. नाश्ता पूर्णच टाळण्यापेक्षा थोडं फार काही हलकं फुलकं खाल्लं तरी चालतं. सकाळच्या नाश्त्यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरल्यासारखं राहातं, आनंदी वाटतं आणि कामासाठी ऊर्जा मिळते. नाश्ता म्हणजे सकाळची सुरुवात असते.ती काहीही खाऊन न करता आपण जे खाणार आहोत ते पौष्टिकच खाऊ याकडे लक्ष असायाला हवं. पौष्टिकता आणि वजनाचा विचार करता सकाळच्या नाश्त्यात कडधान्यं, तृणधान्यं आणि फळं , मिश्र धान्यांची थालीपीठं, आंबोळ्या , मिश्र धान्याचे डोसे, इडली हे उत्तम पर्याय आहेत.
नाश्ता काम करण्यास प्रेरणा देतं.
सकाळी पौष्टिक नाश्ता केल्यास ते व्यायाम करण्यास , काम करण्यास प्रेरणा देतं. आरोग्यदायी जीवन आणि वजन कमी करण्याचा नियम याबाबत व्यायाम आणि नाश्ता या दोन्ही गोष्टी हातात हात घालून येतात. सकाळी नाश्ता केल्यानं शरीरात जी ऊर्जा, आनंद आणि समाधान निर्माण होतं ती सकारात्मक भावना रात्री झोपेपर्यंत टिकून राहाते. सकाळी पौष्टिक नाश्ता केल्यास दिवसभर आपल्या खाण्याची लाइन चुकत नाही. सकाळचा नाश्ता चुकवल्यास दिवसभर भूक भूक राहाते. आणि मग मधे अनेकवेळा खाल्लं जातं. त्यासाठी चटकमटक, तळलेले पदार्थ खाल्ले जातात. जंक फूडचे पर्याय निवडले जातात. एकूणच दिवसभरातल्या खाण्याचं स्वरुप बिघडतं. अशा खाण्यातून मग वजन वाढतं. हे होऊ नये म्हणून सकाळी पौष्टिक नाश्ता करणं गरजेचं आहे. सकाळचा पौष्टिक नाश्ता दिवसभरातील ताणतणावाला सामोरं जाण्याची शक्ती आणि प्रेरणा देतो.
नाश्ता दिवसाची पायाभरणी करतो
सकाळी पोटभरीचा पौष्टिक नाश्ता करणं ही सवय आपल्या दिवसाची दिशा निश्चित करतो. आपल्या पूर्ण दिवसभराच्या खाण्यापिण्याचा, कामाचा, ताकदीचा आणि वजन कमी करण्याच्या उद्देशपूर्तीचा पाया हा सकाळच्या नाश्त्यावर आधारित असतो. आणि म्हणूनच आहारतज्ज्ञ म्हणतात की सकाळच्या नाश्त्याचा विचार डोळसपणे करा. जाणीवपूर्वक पौष्टिक पदार्थ खा. सकाळी जर तेलकट .जड आणि प्रोसेस्ड फूड या स्वरुपाचा नाश्ता केल्यास दिवभर खाण्याची इच्छा राहाते. त्यासाठी अयोग्य आणि जंक फूड निवडले जाण्याची शक्यताच जास्त असते. दुसरं म्हणजे अती फॅटस असलेला आणि प्रोसेस्ड फूडचा पर्याय नाश्त्यासाठी निवडल्यास दिवसभर आणखी काही तर हवं ही भावना शिल्लक राहाते. समाधान होत नाही. वजन कमी करण्याच्या दृष्टीकोनातून हे घातक आहे.
आरोग्य नीट ठेवण्यासाठी आणि आरोग्यदायी मार्गानं वजन कमी करण्यासाठी नाश्ता हा उत्तम पर्याय असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. सकाळचा नाश्ता चुकवू नये हे जितकं खरं तितकंच सकाळी नाश्त्याला आपण काय खातोय याचा विचार करणं, आरोग्यदायी पर्याय निवडणंहे ही तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसाची सूरुवात उत्तमरितीनं करण्याचा मार्ग हा सकाळच्या नाश्त्यातूनच जातो हेच खरं.