गुढीपाडवा झाला आणि भारतातल्या विविध प्रांतांमध्ये चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली.. उन्हाळा आणि त्यातही उपवास हे समीकरणच जरा अवघड आहे. कारण उन्हाळ्यात आधीच जेवण जरा कमी जातं आणि त्यामुळे थोडासा अशक्तपणा (how to reduce weakness due to fasting) जाणवत असतो. अनेक जणांना उपवासाचे पदार्थ खाऊन ॲसिडिटीचा त्रास हाेताे, काही जणांना थकवा येतो. त्यामुळेच तर उन्हाळ्यातले उपवास सुसह्य करायचे असतील, तर खाण्यापिण्यात काय आणि कसे बदल केले पाहिजेत याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर (instagram share) करून त्यात ३ उपाय सुचविले आहेत.
रोजच्या डाएटमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उपवास हे एक चांगले माध्यम आहे. कारण आहारात झालेला चांगला बदल शेवटी उत्तम आरोग्यासाठीच कारणीभूत ठरतो. पण उपवास आहे म्हणून खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे, अधिकाधिक वेळ उपाशी राहणे, अशी अनेक महिलांची मानसिकता असते. ती त्यांनी सोडून द्यायला हवी. त्यामुळे उपवासाच्या दिवशी उपवासाचेच पदार्थ खा. पण उपवासाच्या नावाखाली उपाशी राहणे किंवा मग अति खाणे हे दोन्ही पर्याय टाळा..
उन्हाळ्यातले उपवास करताना...
१. उपवासाच्या दिवसाची सुरुवात नट्स आणि सुकामेवा या प्रकारातले पदार्थ खाऊन करा.. भिजवलेले मणूके आणि भिजवलेले बदाम, खजूर आणि अक्रोड, अंजीर आणि काजू, जर्दाळू आणि पिस्ते असं प्रत्येक दिवशी वेगवेगळं नट्स ॲण्ड ड्रायफ्रुट्स कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. यामुळे चवीतही बदल होतो तसेच वेगवेगळे ड्रायफ्रुट्स आणि नट्स खाण्याचे वेगवेगळे लाभही मिळतात.
२. दुपारच्या फराळाला तुम्ही राजगिरा थालिपीठ, साबुदाणा खिचडी, भगर, भगरीचं थालिपीठ असे वेगवेगळे पदार्थ खाऊ शकता.
३. सायंकाळी उपवास सोडणे चालत असेल तर सायंकाळच्या जेवणात डाळींचा सहभाग नक्की वाढवा. उपवास सोडायचा नसेल तर सायंकाळी फराळाला मखाना खीर, बटाट्याचा किंवा भोपळ्याचा हलवा, रताळ्याच्या फोडी असे पदार्थ खाऊ शकता.
हे देखील लक्षात ठेवा..
- उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी कमी होत असते. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला विसरू नका.
- बटाट्याचे चिप्स, पापड असे उपवासाचे तेलकट पदार्थ खूप खाऊ नका. यामुळे पाणी पाणी होते. हे पदार्थ खायचेच असतील तर फराळाला बसल्यावर ते पदार्थ आधी खाऊन टाका आणि त्यानंतर इतर पदार्थ खा.
- ताक, फळांचा रस, दही- साखर, लिंबू सरबत असे पदार्थ उपवासाच्या दिवशी आवर्जून घ्यावेत.
- फळे अधिकाधिक प्रमाणात खावीत.
- सलग ९ दिवसांचे उपवास असतील तर ॲसिडिटी वाढू नये म्हणून दररोज रात्री दूध प्या.