वजन कमी करण्यासाठी डाएट फूडमध्ये आरोग्यदायी स्मुदींचाही समावेश होतो . वजन कमी करण्यास परिणामकारक अशा अनेक स्मुदी आहेत, त्यात काकडी कोथिंबीरच्या स्मुदीचा विशेष फायदा होतो. काकडी आणि कोथिंबीर हे उन्हाळ्यासाठी कूल काॅम्बिनेशन असून यामुळे पोटही दीर्घकाळ भरलेलं राहातं.
Image: Google
उन्हाळ्यात काकडीचं सेवन करणं आरोग्यास लाभदायक असतं. तसेच पोटाला थंडावा मिळण्यासाठी कोथिंबीरचा उपयोग होतो. उन्हाळ्यात आहारात काकडीचा समावेश असल्यास शरीरात ओलावा टिकून राहातो. काकडी कोथिंबीरच्या स्मुदीनं थंडावा आणि वजन कमी होणं या दोन फायद्यांसह ब6, के, क ही जीवनसत्व, राइबोफ्लेविन, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फाॅस्फरस, झिंक हे पोषक घटक शरीरास मिळतात.
Image: Google
काकडीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे काकडी कोथिंबीर स्मूदी पिल्यानं पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. ही स्मूदी ओव्हर इटींगपासून परावृत्त करते. काकडी आणि कोथिंबीर या दोन्हींमध्ये उष्मांक ( कॅलरीज) कमी असतात. त्यामुळेच ही स्मूदी प्याल्यानं वजन कमी होतं आणि नियंत्रित राहातं. काकडी कोथिंबीरची स्मूदी प्याल्यानं पचन व्यवस्था सुधारते. काकडी आणि कोथिंबीर एकत्र सेवन केल्याने शरीरातील गुड कोलेस्टेराॅलचा स्तर सुधारतो. वजन कमी करण्यासोबतच आरोग्यास फायदेशीर ठरणारी काकडी कोथिबीरची स्मूदी तयार करणं सोपं आहे.
Image: Google
काकडी कोथिंबीरची स्मूदी कशी कराल?
काकडी कोथिंबीरची स्मूदी तयार करण्यासाठी 2 मध्यम आकाराच्या काकड्या, 1 कप कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, छोटा आल्याचा तुकडा, अर्धा ग्लास पाणी, चवीपुरतं सैंधव मीठ आणि 1 चिमूट काळी मिरीपूड घ्यावी.
काकडी कोथिंबीरची स्मूदी तयार करण्यासाठी काकडी धुवून घेऊन जाडसर चिरुन घ्यावी. कोथिंबीर- पुदिन्याची पानं निवडून-धुवून चिरुन घ्यावीत. काकडी. कोथिंबीर, पुदिना, आलं आणि अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. वाटलेलं मिश्रण एका ग्लासमध्ये काढावं. चवीनुसार सैंधव मीठ आणि चिमूटभर काळी मिरेपूड घालावी. काकडी कोथिंबीरची स्मूदी चविष्ट लागते आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.