डॉ. वर्षा जोशी
जगभरात अन्नपदार्थ वापरण्यामधे कोणत्या नवीन गोष्टी आल्या ज्या लोकांनी उचलून धरल्या अशांचा आढावा घेतला तर आढळून येतं की नारळाचं तेल म्हणजेच खोबरेल तेल ही अशी एक नवीन गोष्ट आहे. पूर्वी मर्यादित उपयोगासाठी वापरलं जाणारं खोबरेल तेल आता स्वयंपाकासाठीही मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे.संपृक्त मेदाम्लांचं प्रमाण प्रचंड असल्यानं हे तेल उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदय विकार यांच्या दृष्टीनं योग्य नाही असं सर्वसाधारण मत होतं. सोयाबीन तेलाचा प्रचार सुरू झाला आणि नारळ आणि त्याच्या तेलाच्या वापरावर गदा आली. पण गेल्या काही वर्षात नारळाच्या तेलावर जे संशोधन झालं आहे त्याच्या निष्कर्षामुळे पूर्वीच्या समजुतीला मोठा छेद गेला आहे.अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन ॲण्ड डाएटेटिक्सच्या मते व्हजिर्न खोबरेल तेल जे रसायनांचा किंवा तापमानाचा वापर न करता खोबऱ्यापासून मिळवलेलं असतं, त्या तेलातील फेनॉलिक संयुगांमुळे त्यामधे ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म असतात, ज्याचा शरीराला चांगला फायदा होतो.
नारळाच्या तेलाचे फायदे कोणते?
१. नारळाच्या तेलामधील संपृक्त मेदाम्लांमधे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लॉरिक ॲसिड असतं. आपलं शरीर याचं रूपांतर मोनोलॉरीनमधे करतं, ज्याचा उपयोग विषाणू आणि सूक्ष्मजीव यापासून होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी होतो. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. लॉरिक ॲसिडमुळे कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबासारख्या समस्यांना व त्यामुळे हृदयविकाराला प्रतिबंध होतो. त्यामुळे संपृक्त मेदाम्लं प्रचंड प्रमाणात असूनही नारळाचं तेल हृदयाच्या आरोग्याला घातक नसतं.२. नारळाच्या तेलामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे तेल पचायला सोपं असतं आणि थायरॉइड ग्रंथींचं काम त्यामुळे उत्तम राहतं. शरीराचा उष्मांक खर्च करण्याचा वेग वाढतो. यकृत, पित्ताशय, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड या अवयवांना होवू शकणाऱ्या आजारांना या तेलामुळे प्रतिबंध होतो.३. नारळाच्या तेलामुळे इन्शुलिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाते. या तेलामुळे शरीराची कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं शोषण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे हाडांचं आणि दाताचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. ४. त्वचा आणि केसांना या तेलामुळे फायदा होतो. तसेच डोक्याला या तेलानं हलका मसाज केल्यास मेंदूवरील ताण कमी होण्यास मदत होते.
खोबरेल तेलातलं तळण करावं का?
खोबरेल तेलाचा स्मोकिंग पॉइंट 177 अंश से. म्हणजे साजुक तुपापेक्षाही कमी असतो. रिफाइन्ड खोबरेल तेलाचा मात्र जरा जास्त असतो. संपृक्त मेदाम्लाचा रेणू छोटा असतो. त्यामुळे त्याचं प्रमाण जास्त असलेल्या या तेलात पदार्थ तळला की तेलाचे खूप रेणू खूप खोलवर भराभर पदार्थात शिरू शकतात. त्यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो. म्हणून केरळमधे केळ्याचे वेफर्स किंवा फणसाचे गरे खोबरेल तेलात तळले जातात.हल्लीच्या संशोधनातील निष्कर्षाप्रमाणे खोबरेल तेल आपल्या आरोग्याला अतिशय उत्तम आहे असं आढळतं. पण या तेलात असलेल्या संपृक्त मेदाम्लांच्या प्रचंड प्रमाणामुळे काही वैज्ञानिक त्याच्या भरपूर वापराबद्दल साशंक आहेत. त्यामुळे सारासार विचार करूनच या तेलाचा स्वयंपाकात उपयोग करतात.
(लेखिका भौतिकशास्त्रमध्ये डॉक्टरेट असून, त्यांची दैनंदिन विज्ञानाबद्दलची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)