डॉ. वर्षा जोशी
रोजच्या स्वयंपाकात आता खोबरेतेल अनेकजणी वापरतात. पण या खोबरेल तेलात बरेच प्रकार आहेत. त्यातील नेमका कोणता वापरावा. कोणत्या तेलाचे फायदे कोणते, हे समजून घ्यायला हवे. पहिला प्रकार म्हणजे व्हजिर्न कोकोनट ऑईल हे तीन प्रकारे बनवलं जातं. पहिल्या प्रकारात ओलं खोबरं वाळवून मग त्यातून तेल काढलं जातं. दुसऱ्या प्रकारात प्रथम नारळाचं दूध ओल्या खोबऱ्यापासून काढलं जातं. मग ते उकळून त्यातील पाणी निघून गेलं की साजुक तूप कढवताना बेरी तयार होते तशी बेरी आणि तेल तयार होतं. त्यातील तेल गाळून वेगळं करता येतं. नारळाचं दूध आंबवून, फ्रीजमध्ये ठेवून, विकर वापरून सेंट्रिफ्यूजमधे घालून अशा विविध प्रक्रिया करून तेल अलग करता येतं. तिसऱ्या प्रकारात १० ते १२ टक्के आर्द्रता उरेर्पयत ओलं खोबरं वाळवतात आणि मग त्यातून तेल काढतात.
खोबरेल तेलावर आवश्यक त्या प्रक्रिया करून रिफाईण्ड खोबरेल तेल बनवलं जातं. यासाठी प्रथम सुक्या खोबऱ्यापासून तेल बनवलं जातं व मग त्यावर प्रक्रिया केल्या जातात. ओलं किंवा सुकं खोबरं ज्या झाडांच्या नारळांपासून मिळवलं जातं ती झाडं सेंद्रिय खतांवर पोसलेली असतील तर निघणाऱ्या तेलाला ऑर्गनिक ऑईल असं म्हटलं जातं. रिफाईण्ड तेलाचा स्मोकिंग पॉईंट जास्त असल्यानं हे तेल खास करून तळण्यासाठी वापरलं जातं.
खोबरेल तेलात दाबाखाली हायड्रोजनचा भरणा करून वनस्पती तुपासारखं हायड्रोजनेटेड ऑईल बनविण्यात येतं. शेवटचा प्रकार म्हणजे फ्रॅक्शनेटेड ऑईल. यामध्ये तेलाच्या काही भागातील विशिष्ट रसायनं काढून टाकलेली असतात. या सगळ्या तेलांपैकी व्हजिर्न कोकोनट ऑईल, सुक्या खोबऱ्यापासून पाण्यावर काढलेलं तेल आणि रिफाइण्ड कोकोनट ऑईल ही तीन प्रकारची तेलं स्वयंपाकात वापरता येतात. पण एकूणच कुठल्याही तेलाचा वापर हा मर्यादित स्वरूपातच व्हायला हवा.
डोक्यापासून पायार्पयतच्या आजारावरचा उपाय
नारळाच्या तेलामधील संपृक्त मेदाम्लांमधे 5० टक्क्यांपेक्षा जास्त लॉरिक ॲसिड असतं. आपलं शरीर याचं रूपांतर मोनोलॉरीनमधे करतं, ज्याचा उपयोग विषाणू आणि सूक्ष्मजीव यापासून होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी होतो. लॉरिक ॲसिडमुळे कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबासारख्या समस्यांना व त्यामुळे हृदयविकाराला प्रतिबंध होतो. त्यामुळे संपृक्त मेदाम्लं असूनही नारळाचं तेल हृदयाच्या आरोग्याला घातक नसतं.
नारळाच्या तेलामुळे रक्तातील एल.डी.एल. म्हणजे विघातक कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही आणि रक्तवाहिन्यांनाही हानी पोचत नाही. नारळाच्या तेलामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ते पचायला सोपं असतं आणि थायरॉईड ग्रंथींचं काम त्यामुळे उत्तम राहतं.
नारळाच्या तेलामुळे शरीराचा उष्मांक खर्च करण्याचा वेग वाढतो ज्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. नारळाच्या तेलामधील लॉरिक ॲसिड, कॅप्रिक ॲसिड आणि कॅप्रिलिक ॲसिड यामधे सूक्ष्मजीवविरोधी, बुरशीविरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
नारळाच्या तेलामधील संपृक्त मेदाम्लांमुळे यकृताच्या रोगांना प्रतिबंध होतो. पित्ताशय, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड यांच्या रोगांनाही प्रतिबंध होतो. नारळाच्या तेलामुळे इन्शुलिनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
शरीराची कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं शोषण करण्याची क्षमता नारळाच्या तेलामुळे वाढते. त्यामुळे हाडांचे व दातांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. त्वचा आणि केसांना या तेलामुळे फायदा होतो हे तर सर्वानाच माहीत आहे; पण डोक्याला या तेलाने हलका मसाज केल्यास मेंदूवरील ताण कमी होण्यास मदत होते. हल्लीच्या संशोधनातले हे सर्व निष्कर्ष आहेत. पण संपृक्त मेदाम्लांच्या या तेलात असलेल्या प्रचंड प्रमाणामुळे काही वैज्ञानिक त्याच्या भरपूर वापराबद्दल साशंक आहेत. त्यामुळे सारासार विचार करूनच या तेलाचा स्वयंपाकात वापर करावा.
(लेखिका भौतिकशास्त्रतील तज्ज्ञ संशोधक आहेत. रोजच्या जगण्यातल्या विषयांमधील विज्ञान सांगणारी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.)