वजन कमी करण्यासाठी पहिली अट असते संयमाची. ज्याच्याकडे संयम नसेल त्याने या वाटेला जाऊच नये असं वेटलाॅस तज्ज्ञ म्हणतात. कारण संयम नसला की वजन कमी करण्यासाठी हे नाही तर ते , ते नाहीतर आणखी काहीतरी वेगळं अशी शोधाशोध होते. प्रयोग होतात आणि त्याचा वजन कमी होण्यासाठी फायदा तर होत नाहीच पण तोटाच होतो. हे टाळण्यासाठी संयम हवा. तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वजन 10 किलो घटवायचं असो नाहीतर केवळ 2 किलो, पण ते कमी होण्यासाठी वेळ लागतो. व्यायाम आणि योग्य डाएट या स्वरुपात आपले प्रयत्न सुरु ठेवावे लागतात. आज व्यायाम केला, आहार तज्ज्ञांनी सांगितला तसा आहार घेतला, म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी वजन कमी होत नाही, हे आधी ध्यानात घ्यायला हवं असं तज्ज्ञ म्हणतात.
आरोग्य तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार घेण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते वजन कमी करण्यासाठी आहारात प्रथिनं आणि फायबर जास्त असलेले पदार्थ समाविष्ट करायला हवेत. याचा फायदा पोट लवकर भरतं, जास्त वेळ भरलेलं राहातं. यासाठी आहारात धान्यं, तृणधान्यं, कडधान्यं, फळं, सुकामेवा यांचा समावेश करण्यास सांगतात. पण यातील फळं या घटकाविषयी मात्र बहुतांशजणांमधे द्विधा मनस्थिती असते. अनेकांना वाटतं वजन कमी करायचं म्हणजे इतर सर्व सोडून जास्त फळंच खायला हवीत तर अनेकांना वाटतं, की वजन कमी करताना आधी फळं खाणं बंद करायला हवीत. कारण फळांमुळे वजन वाढतं. तज्ज्ञ म्हणतात, फळांच्या बाबतीत ही द्विधा मनस्थिती बाळगली तर फळं जास्त खाऊन जसं नुकसान होतं, तसं फळं न खाऊनही वजन कमी करण्याबाबत नुकसानच होतं. त्यासाठी फळांमुळे वजनावर काय परिणाम होतो? वजन कमी करण्यासाठी फळं उपयुक्त की अपायकारक याबाबतचा शास्त्रीय दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे.
Image: Google
फळांमधील साखर फायद्याची की तोट्याची
फळांमधे जीवनसत्त्वं, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. फळांमधील घटक हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी फळं ही आहारात हवीच असं आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. फळं ही प्रामुख्यानं गोड असतात. आंबट फळंही काही प्रमाणात गोड लागतात. कारण फळांमध्ये फक्टोज हा साखरेचा प्रकार असतो. फ्रक्टोज म्हणजे ग्लुकोजचं एक रुप. फळांमधील साखर ही नैसर्गिक मानली तरी फळांमधील ग्लुकोज हे कृत्रिम साखरेतही असतं, आणि साखर म्हणजे वजन वाढवणारा घटक मानला जातो. पण फळांमधल्या ग्लुकोजचं स्वरुप समजून घेणं आवश्यक आहे.
Image: Google
1.यावर झालेलं संशोधन सांगतं, की फळांमधे जी साखर असते ती यामुळे वजन वाढण्यावर विशेष प्रभाव पडत नाही. कारण फळांमधील ग्लुकोज आणि साखरेतील ग्लुकोज यामधे फरक असतो.
2. पण फळांमधील फ्रक्टोज प्रमाणातच शरीरात जायला हवं. पण फळांमधे फ्रक्टोजसोबतच इतर घटकही असतात जे वजन कमी करण्यास किंवा नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरतात. फायबर आणि मॅग्नेशियम हे फळांमधे आढळणारे दोन मुख्य घटक. फायबरमुळे फळं हळूहळू पचतात. फळं पचवण्यासाठी शरीराल आपली जास्त ऊर्जा वापरावी लागते. म्हणजेच फळं खाल्ल्याने जे उष्मांक किंवा कॅलरीज शरीराला मिळतात त्या फळांचं पचन करण्यास वापरल्या जातात. यामुळे फळं खाल्ली तरी फळांमधील फ्रक्टोज या ग्लुकोजमुळे वजन वाढत नाही.
3. फायबर आणि मॅग्नेशियम या घटकांमुळे फळांमधील साखर जलदपणे रक्तात मिसळत नाही. वजन कमी करताना आपल्या आहारात फळं हवीच. पण निरोगी आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी इतर आवश्यक घटकांचं नियंत्रित प्रमाणात खाणं आवश्यक असतात, तशीच फळं देखील नियंत्रित प्रमाणात खायला हवीत.
Image: Google
फळं खावीत मोजून मापून
वजन कमी करताना काही फळं अशी आहेत जी खायला तर हवीत पण त्यांचं नियंत्रित प्रमाण वजन नियंत्रित ठेवण्यास कारणीभूत ठरतात, तर त्यांचं सेवन प्रमाणापेक्षा अधिक केल्यास ही फळं वजन वाढीस कारणीभूत ठरतात..
Image: Google
1. द्राक्षं
द्राक्षं हे आरोग्याचा विचार करता फायदेशीरच असतात. पण इतर फळांपेक्षा साखर आणि फॅटस द्राक्षांमधे जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करताना द्राक्षं खावीत पण अगदी मोजून मापूनच. 100 ग्रॅम द्राक्षांमधे 67 उष्मांक आणि 16 ग्रॅम साखर असते. त्यामुळे आहार तज्ज्ञ सांगतात, की द्राक्षं ही केवळ द्राक्षांच्या हंगामातच खावीत. ती रोज न खाता आठवड्यातून ठराविक दिवशी आणि नियंत्रित प्रमाणात खावीत तरच द्राक्षं खाऊन आरोग्यास फायदा मिळतो आणि द्राक्षांच्या मर्यादित सेवनामुळे वजन वाढण्याचा धोका टळतो.
Image: Google
2. केळं
वजन कमी करताना आहारतज्ज्ञ दिवसातून एक केळ अवश्य खावं असा सल्ला देतात. पण ऐकणारे अनेकदा केवळ केळ खावं एवढंच ऐकतात आणि दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्तं केळी खातात. असं रोज झाल्यास केळ हे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतं. यामागचं कारण सांगताना तज्ज्ञ म्हणतात, की केळ हे अतिशय पौष्टिक फळ आहे. पण ते जर जास्त खाल्लं गेलं तर गणित चुकतं. कारण केळामधे जास्त उष्मांक असतात तसेच केळातील नैसर्गिक साखरेचं प्रमाणही जास्त असतं. एका केळात 150 कॅलरीज आणि 37.5 ग्रॅम साखर असते. त्यामुळे दिवसातून जर कोणी 2-3 केळं वजन कमी करण्यासाठी म्हणून खात असतील तर त्याचा उलटा परिणाम होवून एवढी केळी खाल्ल्यास वजन वाढेल. वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसातून केवळ एकच केळ खायला हवं. एक केळ खाल्ल्यास रक्तातील साखर एकदम वाढत नाही. तसेच केळ खाल्ल्याने भरपूर वेळ पोट भरलेलं राहातं.
Image: Google
3. आंबा
'आंबा मला आवडत नाही' असं म्हणणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही. आंबा म्हणजे आरोग्याच्यादृष्टीन एकदम गुणी फळ. पण आयुर्वेदिक तज्ज्ञ आंब्यातील गुणधर्म सांगताना आंबा हा मर्यादित प्रमाणात खायला हवा. जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यास आंब्यातील छुप्या कॅलरीजमुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरु शकतं. तसेच आंब्यातही नैसर्गिक साखर जास्त असते. म्हणून आंबा प्रमाणात खायला हवा.
Image: Google
4. सुकामेवा
सुकामेवा हा देखील फळांमध्येच मोडतो. सुकामेवा हा प्रामुख्याने ओली रसदार फळं वाळवून केली जातात. सुक्या मेव्यात पाण्याचं प्रमाण नसल्यानं सुकामेव्यात कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. म्हणूनच द्राक्षांपेक्षाही बेदाण्यांमधे कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे कोणताही सुकामेवा खाताना प्रमाणाकडे बघावं. सुकामेवा वजन कमी करण्यास फायदेशीर असतो, कारण त्यातील प्रथिनं आणि फायबरमुळे पोट भरतं, समाधान मिळतं, जास्तीचं खाणं टाळलं जातं. पण हाच सुकामेवा जास्त खाल्ला तर मात्र यातल्या कॅलरीजमुळे वजन वाढतं.