राजश्री कुलकर्णी, (एम.डी.आयुर्वेद)
सरकारच्या आयुष विभागाकडून अधिकृतपणे दिला जाणारा आयुष क्वाथ किंवा इतर तज्ञ वैद्यांकडून दिले
जाणारे काढे यात काही मूळ तत्त्वं कॉमन आहेत. सर्दी,अंगदुखी, ताप येणं ही जी कोविडची प्रमुख लक्षणं आहेत
त्यावर उपयोगी पडतील अशी औषधी द्रव्यं या काढयांमध्ये प्रामुख्याने वापरली गेली आहेत.
कोरोना हा कफ प्रधान असा हा आजार असल्यामुळे ही सगळी औषधं उष्ण आणि तीक्ष्ण गुणांची आहेत.
उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास सुंठ, मिरे,लेंडी पिंपळी, लवंग ,दालचिनी वगैरे ! यांचं प्रमाण किंवा प्रपोर्शन
वेगवेगळं असू शकतं . पण एकूण कॉम्बिनेशन उष्णच आहे हे निश्चित ! असं काढ्याचं मिश्रण जर घेतलं आणि
त्याचा घरी काढा उकळायचं म्हटलं तर त्याचं प्रमाण जास्त नको . साधारण मोठ्या माणसांना ( adults) साधा
पोहे खायचा चमचा अर्धा इतकं औषध पुरेसं आहे .घरातील व्यक्ती किती आहेत त्यानुसार प्रमाण मोजून त्यात
प्रत्येकी दोन कप या प्रमाणात पाणी घालून हा काढा अर्धा शिल्लक राहीपर्यंत आटवायचा आहे .
म्हणजे चार व्यक्तींसाठी काढा करायचा असेल तर दोन चमचे भरुन औषध घेऊन त्यात आठ कप पाणी घालून
ते चार कप उरेपर्यंत आटवून मग गाळून घ्यायचं .चहा जसा गरम पितो त्याप्रमाणे हा काढा प्यावा. ज्यांना नुसता
काढा पिणं शक्य वाटत नाही त्यांनी थोडा गुळाचा खडा टाकावा पण डायबिटीस असेल तर अर्थातच हे वर्ज्य आहे. मुख्य म्हणजे हा प्रिव्हेंटिव स्वरूपाचा उपाय आहे हे लक्षात घ्यावं.ज्या लोकांना कोरोनाची कोणत्याही स्वरुपाची लक्षणं दिसत असतील त्यांना या व्यतिरिक्त इतरही औषधोपचार नक्कीच घ्यावे लागणार त्यामुळे तेव्हा
मनानेच हे उपाय घरी करत राहणं व वैद्यकीय सल्ला घेणं टाळणं हे चुकीचं आहे. हा काढा दिवसातून
जास्तीतजास्त दोन वेळा घेणं चालेल , तेही ती व्यक्ती जर रोज कामासाठी घराबाहेर पडत असेल तर ! इतरांनी
सकाळी जास्त ऊन व्हायच्या आधी एक वेळा काढा घेतला तरी पुरेसं आहे .
दुसरी महत्त्वाची गोष्ट गरम पाण्याविषयी ! दिवसभर गरम पाणी पीत राहणं अपेक्षित नाही. ज्यांना काही लक्षणं
जाणवत आहेत किंवा कोविड आहे असं कन्फर्म झालं आहे त्यांनी गरमच पाणी प्यायला हवं पण इतरांनी दुपारी
उन्हाच्या वेळी गरम पाणी पिण्याची गरज नाही. सकाळी चालेल, तेही कोमट घ्यावं,अगदी चटका लागेल असं
गरम नको. दिवसभर वारंवार गरम पाणी प्यायल्याने अनेकांचं नको तितकं वजन मागच्या वर्षात कमी झालेलं
आहे. साधं पाणी प्यावं .ज्यांना पट्कन सर्दी होण्याची टेंडन्सी आहे ,किंवा गार पाण्याने घसा धरतो, खोकला येतो
अशांनी माठ किंवा फ्रिजमधील पाणी टाळावं. आंबट आणि थंड पदार्थ वर्ज्य करावेत.
१. गरम पाणी पिण्यापेक्षा सकाळी व रात्री गरम ( शेक बसेल इतपत) पाण्यात थोडं मीठ आणि हळद घालून गुळण्या कराव्यात, यामुळे घसा स्वच्छ राहतो आणि विषाणू किंवा कोणत्याही जीवजंतूंचा एन्ट्री पॉईंट आपण असा करतो की त्यांचा प्रवेश होऊ नये.
२. आहारात आलं, लसूण,हळद हिंग या पदार्थांचा किंवा वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर आपण पूर्वापार स्वैपाकात
करतच आलो आहोत, किंबहुना त्यासाठी भारतीय आहार किंवा पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत परंतु त्यांचा
अतिरेकी वापर ऍसिडिटी, अलसर्स , इरिटेबल बॉवेल सिंड्रोम अशा वेगवेगळ्या व्याधींना कारणीभूत ठरतो. त्यामुळे हेच मसाल्याचे पदार्थ सूज्ञपणे प्रमाणात वापरले तर ते अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करु
शकतात.
३. चहा करताना त्यात सुंठ, वेलची, दालचिनी, जायफळ ,मिरे वगैरे वापरून घरीच तयार केलेला मसाला वापरला तरी चालेल.
४. हळद ही अंतर्बाह्य जंतुघ्न म्हणून आपण वापरतो नव्हे आपले त्यासाठी अनेक पेटंट्स रजिस्टर आहेत. त्यामुळे
रात्री दुधात हळद आणि किंचित सुंठ पावडर घालून कपभर दूध सर्वांनीच प्यावं.
५. कफाचा त्रास असणाऱ्यांनी कफ वाढेल अशी फळं म्हणजे केळं, सीताफळ, पेरु खाऊ नयेत. दही,लिंबू, लोणचं यांचा वापर करु नये.
६. आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स ,ताक टाळावे. दह्यातील कोशिंबिरी, कच्चे सॅलड्स, यांचा वापर कफाचा
त्रास असणाऱ्यांनी करु नये.
७. केवळ इतकंच नाही तर मागचं जवळजवळ वर्षभर लोकं भरपूर चीज,पनीर,बटर यांचा
वापर खूप जास्त प्रमाणात करत आहेत, हेही पदार्थ शरीरात कफ व परिणामी वजन, स्थूलता वाढवतात ,त्यामुळे
त्यांचा वापर नियंत्रीतच हवा.
८. गरम आणि ताजे अन्न खावे . तयार अन्न फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गरम करून त्याचा वापर करणं टाळावेच !
९. थोडक्यात आपली प्रकृती ,आपल्याला काय सोसतं काय चालत नाही याचा विचार करून उष्ण शीत म्हणजेच थंड गरम याचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करावा.
१० . हे सगळे उपाय कोरोना टाळता यावा म्हणून करायचे आहेत. परंतु थोडी जरी शंका आली तर लगेचच टेस्ट करून घेणं आवश्यक नव्हे अत्यावश्यक आहे हे विसरता कामा नये !
पुढील भागात अंघोळ, वाफारा घेणं याविषयी माहिती जाणून घेऊ.
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या संचालक आहेत.)
www.ayushree.com