राजश्री कुलकर्णी, M.D.( आयुर्वेद)
कोरोना जसा मागच्या वर्षी हळूहळू वाढू लागला, त्याची लक्षणं स्पष्ट होऊ लागली तसं त्यावरची औषधं येऊ
लागली, शास्त्रीय उपचार होऊ लागले पण तेवढेच किंबहुना त्याही पेक्षा वेगानं इतर घरगुती उपचार व्हाट्सॲप
युनिव्हर्सिटी वर व्हायरल होऊ लागले. वास्तविक पाहता यातील बरेच उपाय हे आपण गेली कित्येक वर्षं, पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत, ते गावठी किंवा टाकाऊ आहेत असंही नाही, आजीबाईच्या बटव्यातील म्हणता येतील असे यातील काही नुसखे होते, स्वयंपाकघरातील दवाखाना म्हणता येईल असे उपाय होते .
यामध्ये आयुर्वेदाचं योगदानही खूप मोठं आहे. माईल्ड स्वरूपात लक्षणं असणारे किंवा ज्यांना त्रास बऱ्यापैकी
आहे पण घरीच विलगीकरण करुन बरे होऊ शकतील असे हजारो लाखो रुग्ण भारतभरात त्याकाळात वैद्यांनी
बरे केले आहेत. आपल्या आयुष मंत्रालयाने काही ठराविक औषधांना, काढ्यांना यासाठी वापरण्याची परवानगी
दिली होती आणि इतरही शास्त्रीय आयुर्वेदिक औषधे रुग्णांच्या लक्षणांचा विचार करून वैद्य अत्यंत
काळजीपूर्वक व यशस्वीपणे वापरत होते. बरीच औषधं ही कोरोना होऊ नये, सर्दी ,खोकला किंवा श्वसनसंस्थेशी
संबंधित लक्षणं निर्माण होऊन ,ताप वगैरे येऊन कोरोनाला निमंत्रण नको म्हणून प्रिव्हेंटिव स्वरूपाची पण होती. पण मे जून महिन्यात काही वेगळीच लक्षणं घेऊन पेशंट्स यायला लागले.
आपल्या कडे लोकांची मानसिकता हा एक अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. एरवीही काही त्रास होत असेल तर
फॅमिली डॉक्टर किंवा अगदी स्पेशालिस्टपर्यंत लोकं जातात , तपासणी फी देतात पण एकदा का त्या डॉक्टरांनी
लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन हातात पडलं की यांना तपासणी फी हा वायफळ खर्च वाटायला लागतो. मग कितीही
गंभीर आजार असला तरी त्याच चिठ्ठीवर फक्त मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन वर्षानुवर्षे मनानेच औषधं
खाणारे असंख्य रुग्ण आमच्या बघण्यात असतात. यात कधी कधी तर अगदी स्टिरॉइड्स, अँटी बायोटिक्स
यांचाही समावेश असतो, अनेक औषधं ठराविक काळापेक्षा जास्त दिवस घेतली तर त्याचे दुष्परिणाम होऊ
शकतात हे यांच्या गावीही नसतं. डायरेक्ट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन ओव्हर द काउंटर औषधांची भारतात
जितकी विक्री होते तेवढी क्वचितच कुठे होत असेल!
बरोबर हाच नियम या औषधांच्या बाबतीत पण लागू झाला. एकदा डॉक्टरांना विचारलं की झालं ,मग पुढे त्याचा
डोस दिवसातून किती वेळा घ्यायचा,किती घ्यायचा, कोणाला चालेल, प्रकृती काय आहे, वय किती आहे ,बाहेर
हवामान कसं आहे याचा कसलाही विचार न करता घरोघरी दिवसातून तीन तीन वेळा लहान मोठे सगळे काढेच
पीत होते. बरं ,कोरोनाची सगळी लक्षणं कफ दोषाशी संबंधित असल्याने तसेच फुफ्फुसे हा मुख्य परिणाम
होणारा अवयव असल्याने हे काढे, किंवा इतर औषधी चिकित्सा ही प्रामुख्याने कफनाशक व उष्ण गुणधर्म
असलेली अशी होती. मे जून महिन्यात जेव्हा तापमान चाळीस पंचेचाळीस डिग्रीच्या पार गेलं तेव्हा या
औषधांच्या उष्ण, तीक्ष्ण अशा गुणांमुळे ज्या व्यक्तींची मूळ प्रकृती उष्ण आहे, पित्त जास्त आहे अशा लोकांना
हळूहळू त्याचे परिणाम जाणवू लागले. हाता पायांची , डोळ्यांची आग होणे, तोंड येणं, घशात छातीत जळजळ
होणं, लघवी खूप गरम व पिवळी होणं, स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव खूप होणं ,पोटात
आग पडणं, सगळ्या अंगाचा दाह होणं इथपासून तर नंतर नंतर संडासच्या वेळी गुदद्वारातून रक्त पडणं,
मूळव्याधीचा त्रास अचानक उफाळणं इथपर्यंत तक्रारी घेऊन रुग्ण येऊ लागले . कारणांच्या मुळाशी जाता जाता
हीच कारणे सापडू लागली .
काढ्यात घटक कोणते व किती प्रमाणात असावेत, एका व्यक्तीसाठी काढा बनवताना त्या औषधांचं प्रमाण किती
घ्यावं, किती वेळ, किती प्रमाणात उकळावे , दिवसातून किती वेळा प्यावा याचे सगळे वैद्यकीय निकष धाब्यावर
बसवून, अधिकस्य अधिकं फलं असा स्वतःच विचार करून महिनोंमहिने लोकं काढा घेत राहिले.
ही औषधं घेत असताना काय पथ्य पाळा, काय आहार घ्यावा, काय टाळावं हे प्रत्येक वैद्य आपल्या रुग्णांना
सांगत होते पण ते दुर्लक्षित राहिल्यामुळे अनेक त्रास घेऊन पुन्हा रुग्ण येऊ लागले. हीच परिस्थिती गरम
पाण्याच्या बाबतीत देखील झाली. घसा व आतील मार्ग विषाणूंना प्रवेश देऊ नये म्हणून गरम पाणी उपयोगी
पडेल असं वाचलं, ऐकलं की लोकांनी अशाच प्रकारे काहीही सल्ला न घेता, न विचारता लिटरच्या लिटर गरम
पाणी रिचवलं. घशात आग होतेय इथपासून घशाला छाले पडलेत, गिळताना त्रास होतो असं सांगत रुग्ण येऊ
लागले.
सांगण्याचा मुद्दा असा की प्रत्येक गोष्ट करण्याची,वापरण्याची एक पद्धत, नियम असतो ,ते पाळलं नाही तर
त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. दुर्दैवाने याबाबतीतही असंच काहीसं म्हणावं लागेल. ज्यांची मूळची प्रकृती
कफप्रधान आहे किंवा वात कफ आहे अशा लोकांना हे उपाय खूप चांगले लागू पडले पण पित्त प्रकृतीच्या
व्यक्तींना मात्र खूप त्रास सहन करावा लागला तोही त्यांच्या अर्धवट माहितीमुळे, नीट सल्ला न घेता मनाने
उपचार करण्यामुळे...
याही वर्षी आता ही दुसरी लाट जोरात आल्यावर पुन्हा एकदा लोकांनी उपचार सुरु केले आहेत पण त्याचं तंत्र
समजून घेऊन औषधं नीट घेतली तर त्याचे अमेझिंग फायदे बघायला मिळतील. कारण यामुळे अनेक रुग्ण या
आजारापासून दूर राहू शकले, चुकून झालाच तर लवकर बरे झाले !
पुढच्या भागात आपण हे तंत्र ,नियम समजून घेऊया ! कारण Prevention is always better than cure हे
आपल्याला चांगलंच माहीत आहे !
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री आयुर्वेद केंद्राच्या संचालक आहेत.)