Join us  

कोरोना बरा झाला, त्यानंतरही इम्युनिटी आणि ताकद वाढावी म्हणून कोणतं ‌Diet कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 2:55 PM

बँक बॅलन्स जसा एका दिवसात साठत नाही तसंच प्रतिकारशक्ती आणि प्रकृतीचंही असतं. योग्य आहार, योग्य व्यायामाला मेडिटेशनची जोड देऊन आपण हे साधू शकतो.

ठळक मुद्देआपल्याला विषाणू संसर्ग होतो तेव्हा शरीरात युद्ध झालेलं असतं. जसे युद्धाचे काही परिणाम सर्व व्यवस्थेवर होतात तसे शरीरावरही होतात. खूप दिवस अशक्तपणा जाणवतो. पण, म्हणून कोरोनाकाळात आणि कोरोनानंतर असा काही विशेष वेगळा आहार नसतो.आजारपणात व सध्याच्या उकाड्यामुळेही शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. अशावेळी पाणी त्यासह ताक, सरबतं, सूप शरीरात जायला हवे. उत्तम ड्रायफूट्स, ताजी फळं, दही, ताक, भाज्या, अंडी असे घरगुती जेवण करा.

- डॉ. शिल्पा जोशी, उपाध्यक्ष

इंडियन डाएटिशियन असोसिएशन

कोरोना होऊन गेल्यावर मनात भीती असतेच. काही जण घरीच बरे होतात, काहींना दवाखान्यात दाखल व्हावं लागतं, कुणी आयसीयू, कुणी ऑक्सिजन लावण्यापर्यंत जाऊन बरे होऊन घरी येतात. बरे झाले तरी भीती असतेच. त्यात बरं झाल्यावरही अशक्तपणा, थकवा अगदी २-३ महिने जाणवतो, अशी तक्रार काही जण करतात. होतं काय आपल्याला विषाणू संसर्ग होतो तेव्हा शरीरात युद्ध झालेलं असतं. जसे युद्धाचे काही परिणाम सर्व व्यवस्थेवर होतात तसे शरीरावरही होतात. खूप दिवस अशक्तपणा जाणवतो. पण, म्हणून कोरोनाकाळात आणि कोरोनानंतर असा काही विशेष वेगळा आहार नसतो. त्यात उकाडा वाढला, अनेकांना औषधांनी पित्त होतं तेव्हा भरपूर पाणी पिणं, नारळपाणी, ताक, सूप पिऊन शरीर हायड्रेट ठेवणं महत्त्वाचं वाटतं. कोरोनाकाळात अचानक माणसं मोठ्या प्रमाणात गरम पाणी प्यायला लागली, काढे प्यायला लागली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. अमुक एक काढा आदर्श असंही नव्हे. प्रत्येकाचे कॉम्बिनेशन वेगळे. मुळात आपण कोविड म्हणजे काय हे साधेपणानं समजून घेतलं तर बरं. हा रेस्पिरेटरी म्हणजे श्‍वसनमार्गातून प्रसार पावणारा सांसर्गिक आजार आहे. अमुक एक आहार घेऊन किंवा तमुक काढे पिऊन आपण या आजाराचा अटकाव करू असं नाही. त्यासाठी वेगळ्याच प्रकारची काळजी लागते. ती आपण मास्क घालून, स्पर्श टाळून, गर्दी टाळून घेतो आहोत.

ताक, सरबतं, सूप आणि सकस आहार!

आपलं शरीर आजारपणात युद्धभूमी झालेलं असतं. अशावेळी दमल्याभागल्या शरीराला रुळावर आणण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा. आपल्या शरीराला काय सोसतं व कशानं त्याचं बिनसतं हे ठाऊक हवं. आजारपणात व सध्याच्या उकाड्यामुळेही शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. अशावेळी पाणी त्यासह ताक, सरबतं, सूप शरीरात जायला हवे. इतक्या गरमीत कोण सूप पितं असं वाटेल, पण सूप्समध्ये असणारी मायक्रोन्यूट्रिएन्ट्स जरुरीची असतात. कोरोनामध्येच नव्हेतर, कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये शरीरात जो असमतोल झालेला असतो त्यातून आपली खाण्यापिण्यावरची वासना उडते. औषधांमुळे बऱ्याच प्रमाणात अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असतो. डोकं दुखतं. अशावेळी साधा सकस आहार घेणं खूप महत्त्वाचं. हळद, धने, जिरे घालून केलेलं अन्नही खूप चवदार लागतं व अंगाला लाभतं. शाकाहारी असो की मांसाहारी, कमी मसालेदार अन्न शरीरावरचा भार वाढवत नाही. अनेकदा भाज्यांना भर म्हणून हरबरा डाळीचं पीठ लावलं जातं, पिठलं, तुरीची डाळ यानं पित्ताचा त्रास होतो. अशावेळी आपण मुगडाळीचं पीठ वापरू शकतो. आपली तब्येत बघून डॉक्टर प्रोटीन पावडर, झिंक कॅप्सूल्स, बी १२ बाहेरून घेण्यासाठी देऊ शकतात, पण हे त्यांच्या सल्ल्यानेच वापरणं योग्य.

दिवसातून दोन वेळा  चौरस आहार

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी सकस नि चौरस आहार ही संकल्पना नीट समजून घ्यायची गरज आहे. पूर्वी शाळेत फूड पिरॅमिड शिकवला जायचा. त्यात सगळ्यांत खाली धान्यं, डाळी नि दुधाचा पाया असायचा. मात्र ते इतकं तांत्रिक होतं की गोंधळ उडायचा. आता ‘माय फूड प्लेट’ ही संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाते. या थाळीला चार भागांमध्ये विभागायचं नि त्यातला एक चतकोर भाग कच्च्या भाज्या म्हणजे सॅलेड्सचा. कोशिंबिरी, रायते प्रकारात खा किंवा तुमच्या आवडीनुसार निवडा. दुसरा चतकोर हा शिजलेल्या भाज्यांचा. तिसरा प्रथिनं म्हणजे प्रोटीन्सचा. डाळी, कढी, मांसाहारी काही वगैरे. आणि शेवटचा चौथा चतकोर पोळी, भाकरी व भाताचा. हा मान्यताप्राप्त आहार आहे. तो समजून आपली थाळी सजवली तर शरीर सक्षम होईल, साथ देईल. असा चौरस आहार दिवसातून एकदा उपयोगाचा नाही. दोन्ही वेळ असं समतोल खाणं हवं. आपली आजी, पणजी रात्रीच्या जेवणाला फाटा देऊन इडली-दोसे, पिझ्झा, पास्ता खात बसलेल्या पाहिल्यात का आपण? जुन्या लोकांचं हाड मजबूत असं म्हणतात ते यासाठीच की त्यांच्या खाण्यात समजदारी होती.

फळं खायची का?

सोशल मीडियावर सतत प्रचारप्रसार करणारे फळांविषयीचे मेसेज पाहून मला माझे पेशंट विचारतात, ‘किवी नि ड्रॅगनफ्रूटमुळे कोविड होत नाही असं ऐकलंय ते खरंय का? मुळात ही दोन्ही बाहेरची फळं, आपल्या देशात न पिकणारी. महागडी. परवडत असतील तर जरूर खावीत. पण, अशा कुठल्या फळांनी किंवा आहाराने कोविडचा अटकाव झाल्याचं कुठलंही संशोधन समोर आलेलं नाही. आपल्याकडची सगळीच फळं कुठल्या ना कुठल्या जीवनसत्त्वांचा सोर्स आहेत. ती खावीत.

तसंच तेलाचं...

अमुक प्रकारचं तेल स्वयंपाकात वापरलं तर प्रतिकारशक्ती वाढते का? ऑलिव्ह ऑइल हे खूप महाग आहे. आपल्याकडची शेंगदाणा, राईस ब्रॅन, मोहरी, सोयाबीन, तीळ अशी कुठलीही तेलं बदलून बदलून तुम्ही वापरा, त्याचा फायदा होईल. एक काळजी घ्या, कुठलंही तेल कडकडीत तापवलं जातं तेव्हा त्यातले घटक अपायकारक फॅट्समध्ये बदलतात. हार्ट ब्लॉकेजिस, कॅन्सरची शक्यता वाढवतात, म्हणून ते टाळा. ‘नॅशनल कोलेस्ट्रॉल एज्युकेशन प्रोग्रॅम’नुसार काही तेलांमध्ये मोनॉन सॅच्युरेटेड रिच फॅट्स असतात, त्याचे मात्र फायदे आहेत. ते समजून घ्या. करडई, सूर्यफूल, ऑलिव्ह यांची तेलं अनेकदा कच्ची वापरली जातात त्याचं कारण हेच.

घरगुती जेवण

बाहेरचं अन्न खाण्याचं प्रमाण कमी असावं. अन्नातून वेगळे संसर्ग होऊ नयेत याची काळजी आपण घ्यायला हवी. लहान व वाढत्या वयातल्या मुलांनी ताजं, सकस अन्न खावं यासाठी पालकांनीही ते पाळणं गरजेचं आहे. कुणीच स्वत:वर व इतरांना अन्नाचा मारा करू नये. उत्तम ड्रायफूट्स, ताजी फळं, दही, ताक, भाज्या, अंडी असे घरगुती जेवण करा. सध्याच्या काळात मी मिठाच्या पाण्यात अर्धा तास भाज्या ठेवते व निर्जंतुक करते, कोरड्या करते व मग फ्रीजमध्ये ठेवते. पोटॅशिअम परमँग्नेटही वापरता येईल. मात्र वेळ वाचविण्यासाठी फळं नि भाज्या चिरून ठेवू नका.

प्रतिकारशक्ती कशी वाढवायची?

आपला देश डायबिटिसची राजधानी आहे. त्यामुळं अतिरेकी वजन वाढू न देण्यासाठी आपली शिस्त आपणच आखायला हवी. प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी वाढावी म्हणून आपण ‘कोरोना’च्या निमित्तानं पाऊल उचललं आहे ही चांगली गोष्ट आहे. पण, ‘पी हळद हो गोरी’च्या तालावर ते साधलं जाणार नाही. बँक बॅलन्स जसा एका दिवसात साठत नाही तसंच हे. योग्य आहार नि योग्य व्यायामाला मेडिटेशनची जोड देऊन आपण बराच पल्ला गाठू हे मात्र नक्की. आहार, प्रतिकारशक्ती याबाबतही तेच खरं आहे.

महत्त्वाचं म्हणजे ‘जिसका मन शांत उसका तन भी शांत’!

 

(डॉ. शिल्पा जोशी यांची ही मुलाखत लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतली.  त्या मुलाखतीचे हे संपादित संकलन सोनाली नवांगूळ यांनी केले आहे.)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअन्न