Join us  

तुळशीची पानं रोजच चावून चावून खाता? तुळस बहूगुणी असली तरी रोज पानं खाणं घातक कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2022 6:44 PM

How To Eat Tulsi Leaves: तुळस आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर आहे.. पण ती कशी खावी याचीही एक खास पद्धत आहेच.(Health benefits of tulsi or basil leaves)

ठळक मुद्देआरोग्यासाठी चांगली म्हणून तुळशीची पानंही अनेक जण रोजच खातात. पण खरंच अशा पद्धतीने तुळशीची पानं चावून चावून खाणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का?

तुळस ही आरोग्यासाठी किती गुणकारी आहे, हे प्रत्येकालाच माहिती असतं. केवळ आरोग्यासाठीच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही तुळस अतिशय महत्त्वाची असते. कारण जास्तीतजास्त ऑक्सिजन उत्सर्जित करून आजुबाजूची हवा शुद्ध करणे, हे तुळशीचं एक महत्त्वाचं काम. त्यामुळे अगदी पुर्वीपासूनच आपल्याकडे प्रत्येक अंगणात दुसरं कोणतं झाड असो की नसो, तुळस मात्र हमखास असतेच असते. आरोग्यासाठी चांगली म्हणून तुळशीची पानंही अनेक जण रोजच खातात. पण खरंच अशा पद्धतीने तुळशीची पानं चावून चावून खाणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का? (How to eat tulsi leaves)

 

काही अभ्यासानुसार असं सांगितलं गेलं आहे की तुळशीच्या पानांमध्ये पारा असतो. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात तुळशीची पानं खात असाल आणि ती देखील चावून चावून तर यामुळे रिॲक्शन होऊन तुमच्या दातांवर डाग पडू शकतात आणि दातांचा रंग बदलू शकतो. याशिवाय टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार तुळशीची पानं ॲसिडीक असतात तर आपल्या तोंडाचा आतील भाग अल्कलाईन असतो. या दोन वेगवेगळ्या गुणधर्माचा परिणाम दातांवरील आवरण निघून जाण्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुळशीची पानं चावून चावून खाण्यापेक्षा थाेडीशी चावून लगेच गिळून टाकावीत किंवा मग पुढील पद्धतीने तुळशीच्या पानांचा वापर करावा. 

 तुळशीची पानं खाण्याची योग्य पद्धत१. एक सोपी पद्धत म्हणजे तुळशीची पाने खूप चावायची नाहीत. एक- दोन वेळाच चावायची आणि नंतर लगेचच गिळून टाकायची.२. दुसरी पद्धत म्हणजे चहामध्ये टाकणे. चहा करताना आपण त्यात आलं, गवती चहा, सुंठ, विलायची असं काही काही टाकतच असतो. त्यात तुळशीची पानंही टाका. तुळशीयुक्त चहा चवीलाही छान असतो आणि आरोग्यसाठीही उत्तम असतो.३. तुळशीचा काढा ही देखील तुळस खाण्याची एक उत्तम पद्धत आहे. काढा करण्यासाठी एक कप पाणी घ्या. त्यात तुळशीची ७ ते ८ पाने तोडून तोडून टाका. पाणी उकळायला ठेवा. आटून पाऊण कप झाले की ते गाळून घ्या. त्यात गुळाचा लहानसा खडा टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि गरमागरम तुळशीचा काढा प्या. हा काढा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना प्यायला तरी चालते. 

 

तुळस खाण्याचे फायदे - तुळशीमध्ये ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी व्हायरल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. - प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तुळस उपयुक्त आहे.- तुळशीचे सेवन नियमित केल्यास पचनशक्ती मजबूत होते.- दमा किंवा श्वसनाच्या विकारांवर तुळस प्रभावी ठरते.- रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास तुळस मदत करते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स