Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > व्हॉट्सॲप मेसेज वाचून कोरोनाकाळातलं खाणंपिणं ठरवताय? -त्याआधी हे वाचा..

व्हॉट्सॲप मेसेज वाचून कोरोनाकाळातलं खाणंपिणं ठरवताय? -त्याआधी हे वाचा..

कोरोनाबद्दल ही शास्त्रीय माहिती वाचा, आणि आपल्या जीवनशैलीत कुठं काय चुकतं याचा अंदाज घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 01:51 PM2021-05-08T13:51:48+5:302021-05-08T13:53:46+5:30

कोरोनाबद्दल ही शास्त्रीय माहिती वाचा, आणि आपल्या जीवनशैलीत कुठं काय चुकतं याचा अंदाज घ्या.

covid 19 food trends on whatsapp forwards , don't try your, take diet guidance from expert doctors. | व्हॉट्सॲप मेसेज वाचून कोरोनाकाळातलं खाणंपिणं ठरवताय? -त्याआधी हे वाचा..

व्हॉट्सॲप मेसेज वाचून कोरोनाकाळातलं खाणंपिणं ठरवताय? -त्याआधी हे वाचा..

वैद्य राजश्री कुलकर्णी, M.D.( आयुर्वेद)


मागच्या वर्षीपासून कोरोनाने आपलं जणू जगणं व्यापून टाकलंय ! नवीन विषाणू असल्याने त्याची लक्षणं, होणारे त्रास , त्यातही एकदम संपूर्ण जग त्याच्या तडाख्यात सापडल्यामुळे वेगवेगळ्या देशात, खंडात
आढळणारी लक्षणं यात काहीच एकवाक्यता नव्हती. ट्रीटमेंटचे काही ठरलेले प्रोटोकॉल नव्हते, औषधं
नव्हती, वॅक्सिन तर नव्हतंच नव्हतं! जगभरातले डॉक्टर्स,शास्त्रज्ञ यावरील उपायांसाठी अहोरात्र प्रयत्नशील होते
तेव्हा आत्ता कुठे साधारण सव्वा वर्षाने आपण लस घेतोय !
या आजारात इतकी विचित्र लक्षणं आढळतात की खाण्यापिण्याची काय पथ्यं सांगावीत किंवा पाळावीत ,काय
खाल्लं तर चालेल, काय टाळायला हवं या सगळ्याच बाबतीत नुसता गोंधळ होता जो अजूनही बऱ्यापैकी सुरुच
आहे. जिभेची चव जाणं, वास न येणं, अचानक जुलाब होणं,उलट्या, मळमळ होणं,तोंड येणं ही पचनसंस्थेशी
संबंधित लक्षणं दिसल्यामुळे हा गोंधळ अजूनच वाढतो.
आज आपण या विषयी शास्त्रीय माहिती जाणून घेऊया.
सर्दी ,खोकला होणं ,ताप येणं ही आयुर्वेदानुसार कफ दोषाशी संबंधित लक्षणे ही कोरोना मध्ये पहिल्या लाटेच्या
वेळी आढळणारी प्रमुख लक्षणं होती ,त्या अनुषंगाने भूक न लागणं, काही रुग्णांमध्ये मळमळ, उलटी अशीही
लक्षणं असतात. त्रास जास्त वाढला की सतत खोकला येणं व त्या बरोबर कफ पडणं किंवा तो अतिशय चिकट
असल्याने बाहेर न काढता येणं अशा तक्रारी रुग्ण करतात.
मुळात चिकटपणा हा कफाचा मूळ गुणधर्म आहे आणि या आजारात तो अधिकच वाढताना दिसून येतो. बऱ्याच
रुग्णांमध्ये तोंडाची चव गेल्यामुळे खायची इच्छाच नसते. प्रचंड प्रमाणात अशक्तपणा हे कोविडमध्ये दिसणारं
अजून एक महत्त्वाचं लक्षण आहे ज्याला आपल्याकडे फार महत्व आहे. एरवी देखील अशक्तपणा म्हटलं की
आपल्याकडे हजार सल्ले फुकट मिळतात .या सगळ्याचा परिणाम म्हणून स्वतः तो रुग्ण व त्याचे घरचे अगदी
गोंधळून जातात की खायला काय द्यावं ,काय नाही?
आहार सांगण्यापूर्वी दोन तीन महत्वाच्या गोष्टी इथं आवर्जून सांगाव्याशा वाटतात. पहिली म्हणजे कोरोना
व्हायरस हा सर्दी निर्माण करणाऱ्या इतर फ्लू सारख्या व्हायरस सारखाच असतो आणि तो पूर्वी पासून आहेच
फक्त सोप्या भाषेत सांगायचे तर तो त्याचं रुप सारखं बदलत असतो आणि यावेळी जो प्रकार निर्माण झाला आहे
तो घातक आहे.


पूर्वी सर्दी झाली की आपण म्हणायचो, सर्दी हा अतिशय साधा आजार आहे ,जो आपोआप बरा होतो त्यासाठी
औषध घ्यायची गरज नसते, त्यावरून विनोद देखील केले जातात, की औषध घेतलं तर सर्दी सात दिवसांत बरी
होते आणि नाही घेतलं तर मात्र आठवडा लागतो ,वगैरे वगैरे. सर्दी होणं,घसा खवखवणे, अंग दुखणं,थोडा
खोकला, कफ पडणं,शिंका,नाक गळणं, ताप ,ही सगळी फ्लूची लक्षण म्हणून सगळ्यांनाच पाठ आहेत .एखाद
दुसरी गोळी घ्यायची , आराम करायचा,गरम पाणी प्यायचं की दोन चार दिवसांत अगदी ओक्के अशी
आपल्याला सवय होती.
बऱ्याच जणांना काही ठराविक गोष्टींची ऍलर्जी असते, काहींना सिझन बदलला की हमखास सर्दी होणारच अशी
सवय असते. प्रवास,ऊन लागणं, अशा असंख्य कारणांनी अंग दुखणं,किरकोळ ताप येणं वगैरे गोष्टींकडे आपण
वर्षानुवर्षं दुर्लक्ष करत आलो आहोत आणि बरेही होत आलो आहोत पण मागच्या वर्षी पासून मात्र सगळं इक्वेशन
बदलून गेलं, कोरोना हा एक घातक आणि प्रसंगी जीवघेणा आजार ठरला.
मागच्या वर्षी कडक लॉक डाऊन आणि लोकांनी सुरुवातीच्या काळात घेतलेली काळजी यामुळे आपण त्यावर
पुष्कळ नियंत्रण मिळवलं परंतु दुसऱ्या लाटेने मात्र सगळ्या यंत्रणेची जाम दाणादाण उडाली.

याची काही महत्वाची कारणं म्हणजे..


१. हळूहळू जेव्हा सगळं ओपन होत गेलं तसं लोकं कोरोना जणू जगातून हद्दपार झालाय अशा थाटात
वावरु लागले,सगळीकडे नेहमीप्रमाणे गर्दी होऊ लागली, सोशल डिस्टनसिंग, वारंवार हात धुणं,
सॅनिटायझर वापरणं वगैरे एकदम कमी झालं.
२. लग्न,सोशल गॅदरींग्ज,गेट टुगेदर, पर्यटन सगळं एकदम सुरु झालं,आणि नेमकं त्याच दरम्यान
व्हायरसचा नवा स्ट्रेन किंवा व्हेरियंट उदयाला आला .
३. लोकांच्या मनातली भीती कमी झाली की त्यांना घरात बसून कंटाळा आला याची काही कल्पना यायच्या
आत दुसऱ्या लाटेचा तडाखा जोरदार बसायला सुरुवात झाली.
४. त्यातही लक्षणं वेगानं बदलत गेली, आधीसारखं सर्दी ,ताप, चव जाणं वगैरे स्टॅंडर्ड पॅटर्न दिसेलच असं
राहिलं नाही ,एखादा जुलाब होणं,उलटी होणं,अंगावर रॅश येणं अशी काहीही लक्षणं असलेलं लोकं टेस्ट
केल्यावर पॉझिटिव्ह यायला लागले.
५. अनेक जणांना काहीही लक्षणच नव्हती( asymptomatic) त्यामुळे ते बिनदिक्कत सगळीकडे स्प्रेड करत
फिरत होते
६. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम त्या पेशंट्समध्ये बघायला मिळाले ज्यांनी सुरुवातीच्या अतिशय महत्त्वाच्या
कृषीयल अशा पाच सहा दिवसांत स्वतःकडे दुर्लक्ष केलं किंवा अंगावर काढलं किंवा घाबरून काही
सांगितलंच नाही .
७. पुष्कळ पेशंट्स तर व्हाट्सॲप युनिव्हर्सिटी वर मिळालेली माहिती वाचून घरीच उपचार मनानेच करत
राहिले आणि मग जेव्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालं,जीव घाबरा झाला, श्वास घेता येईनासा
झाला तेव्हा ऑक्सिजन बेड साठी धावपळ करत बसले.
८. आपल्याला काही होणार नाही या फाजील आत्मविश्वासापायी जीव गमावलेले पेशंट्स आमच्या
बघण्यात आहेत. काही विशेष महत्वाचं कारण नसताना, काम नसताना आणि सगळ्यात महत्त्वाचं
म्हणजे को मोरबिडीज म्हणजे इतर काही आजार जसं की डायबेटीस, ब्लडप्रेशर, हृदयविकार वगैरे
असताना उगीचच बाहेर फिरणं ,गर्दीच्या संपर्कात येणं आणि बाधित होणं अशा गोष्टी कित्येक
लोकांच्या बाबतीत घडल्या आहेत.
९. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या लाटेत दिसलेली काही वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणं की यात वयाचं काही
वेगळेपण नाही लहान मुलं, वृद्ध व्यक्ती,तरुण ,स्त्री ,पुरुष असा कोणताही विधिनिषेध नाही .घरातली
एक व्यक्ती जर बाधित झाली तर अनेक ठिकाणी कुटुंबाच्या कुटुंब पॉझिटिव्ह आली आहेत. अगदी हेल्थ
कॉन्शस ,फिट असणाऱ्या व्यक्ती देखील या आजाराला बळी पडलेल्या दिसतात.ज्यांची इम्युनिटी
चांगली आहे असं आपण समजतो कारण जे रोज व्यायाम करतात,उत्तम आहार घेतात त्यांनाही
कोरोनाने सोडलेलं नाही ( अर्थातच त्यांचं प्रमाण नगण्य आहे आणि ते पट्कन बरेही होतात)
१०. या एकूण सगळ्या निरीक्षणावरून काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात
कितीही माईल्ड लक्षणं असली अगदी एक दिवस सर्दी झाली,ताप आला वगैरे तरीही टेस्ट करून घेणं
आपल्याच हिताचं आहे. फाजील आत्मविश्वास किंवा आजाराबद्दल भीती यापैकी कोणत्याही कारणाने टेस्ट न करणं म्हणजे पुढील कॉम्प्लिकेशन्सना आमंत्रण हे नक्की ! घरगुती उपाय,ऐकीव माहितीवर मनाने उपचार करणं घातक ठरू शकतं. ढास न थांबणारा खोकला येणं म्हणजे इमर्जन्सी आणि लवकरात लवकर ऍडमिट करणं गरजेचं हे मनावर कोरून ठेवायला हवं. रुग्णाची पल्स आणि ऑक्सिजन कॉन्सनट्रेशन हे महत्वाचे इंडिकेटर आहेत,यात कुठेही काही बदल झाला तर लगेच सल्ला घेणं आवश्यक आहे.
११. वास्तविक हा आजार आपल्याला माहीत होऊन आता वर्षं सव्वा वर्षं झालं पण हे परत परत सांगण्याची गरज
अशासाठी आहे की अजूनही काही ठिकाणी लोकं या आजाराला लाईटली घेतायत आणि जास्त गंभीर होऊन
सगळ्या आरोग्य यंत्रणेवरचा भार वाढवतायेत ,त्यापेक्षा सगळं नीट समजून उमजून त्याप्रमाणे वागलं तर
ही वेव्ह पट्कन आटोक्यात यायला तसंच आपण निरोगी राहायला मदतच होईल म्हणून सांगणं गरजेचं
वाटतं!
आता पुढच्या लेखात कोरोना झाला तर आणि होऊन गेल्यावर काय आहार घ्यावा हे पाहू !

आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, नाशिक
rajashree.abhay@gmail.com


 

Web Title: covid 19 food trends on whatsapp forwards , don't try your, take diet guidance from expert doctors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.