शुभा प्रभू साटम
उन्हाळ्यात पिता येईल असे हे एक गारेगार सूप. चवीला मस्त. पोटाला थंड. पौष्टिकही. खरं तर हे सूप म्हणजे आपल्या काकडी रायत्याचा फिरंगी अवतार आहे. काकडीची दही घालून कोशिंबीर आपण सर्वजण करतो, याच कोशिंबीरिला आपण आज पेय प्रकारात पाहू. या सूप मध्ये आपल्याला हवं ते घालता येते, उन्हाळ्यात जेव्हा जेवावेसे वाटत नाही तेव्हा असे काही पदार्थ उत्तम पर्याय ठरतात.
तर याला नाव द्यायचे काकडी कुलर किंवा थंड काकडी.
(सर्व फोटो -गुगल)
साहित्य
काकड्या. या सुपात आपण चक्क जून किंवा पिवळ्या काकड्या वापरू शकतो, तर तश्या किंवा नेहमीच्या काकड्या माणशी १.
आवडीप्रमाणे सोलून आणि तुकडे करुन घ्यायचे.
ताजे गोड दही
पुदीना
आले
मीठ मिरपूड साखर
हे अगदी बेसिक साहित्य.
यात आपण पुढील पदार्थ घालू शकतो
पिकलेले टरबूज/डाळिंब दाणे/कलिंगड
हिरवी मिरची/चिली फ्लेक्स
चाट मसाला/चीज किसून
कृती
ब्लेंडरमध्ये सर्व घालून छानपैकी एकजीव आणि हवे तितके घट्ट पातळ करून घेणे, फक्त डाळिंब दाणे नंतर घालणे.
हे सूप गाळायचे नाही.
एरव्ही कोशिंबीर नाक मुरडत खाणारे पण हे सूप आवडीने खातात. सोबत सूप स्टिक किंवा लवाश.
नक्की करून पाहा हे सोपे वेगळे सूप. पौष्टिकही आणि थंडगारही.
( लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)