नव्या वर्षी (new year planning) नवं काही तरी करण्याचा विचार अनेक जणं करतात. मग येत्या वर्षासाठी काही संकल्प केले जातात. कोणी व्यायाम करण्याचं ठरवतं, तर कुणी डाएटिंग (diet plans) करण्याच्या विचारात असतो... आता कुणाचे संकल्प किती काळ टिकून राहतात, हा भाग निराळा. पण वर्षाच्या सुरूवातीला मात्र सगळ्यांचेच इरादे बुलंद असतात. तुम्हीही येत्या वर्षासाठी असं काही ठरवत असाल आणि त्यात तुमचा वेटलॉस करण्याचा विचार असेल, तर मग मात्र तुम्ही आतापासूनच या काही पदार्थांपासून, डाएट प्रकारांपासून दूर राहण्याची मानसिक तयारी सुरू करून टाका. या डाएट प्रकारांपासून दूर राहणं जमलं तर वजन कमी होण्यास फार काळ लागणार नाही.
१. ॲसिड अल्कलाईन डाएट (acid alkaline diet)
काही पदार्थ आपण खाल्ले तर शरीरात खूप वेगाने ॲसिड तयार होण्यास सुरूवात होते. शरीरात ॲसिड तयार झालं की आपलं शरीर नैसर्गिक पद्धतीने मग ॲसिड बाहेर टाकण्याची तयारी सुरू करतं. वारंवार ॲसिडिक पदार्थ घेतल्याने आपल्या पचन संस्थेचा अर्धा अधिक काळ ॲसिड शरीराबाहेर टाकण्यात जातो. त्यामुळे मग पचन कार्याचा वेग हळूहळू मंदावत जातो. त्यामुळे वेटलॉसचा विचार असेल तर असे ॲसिड तयार करणारे डाएट या वर्षी घेणं टाळा किंवा कमीतकमी खा. यात अनेक मांसाहारी पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे असे पदार्थ टाळून फळे, डाळी, भाज्या यांचा आहारातील समावेश वाढवावा.
२. झटपट वेटलॉस डाएट (fast weightloss diet)
हल्ली असे अनेक वेटलॉस प्लॅन सांगितले जातात, जे फॉलो केल्याने झटपट वजन कमी होईल असे सांगितले जाते. अशा प्रकारच्या डाएट प्लॅननुसार वजन कमी झाले तरी ते आरोग्यदायी नसते. त्याचे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. U.S. News & World Report नुसार जे डाएट फाॅलो करायला सोपे असतात आणि ज्यामुळे तुमचे वजन एका ठराविक वेगाने कमी होत जाते, ते डाएट प्लॅन आरोग्यासाठी अधिक चांगले असतात. त्यामुळे झटपट वेटलॉस सुचविणारे प्लॅन नको.
३. ग्लायसेमिक इंडेक्स डाएट (Glycaemic-index diet)
काही पदार्थ खाल्ले की रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढते. असे पदार्थ खाल्ल्यास वजन वाढते, असे काही डाएटनुसार सांगितले जाते. त्यामुळे वेटलॉससाठी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ खावेत असा सल्ला दिला जातो. पण ग्लायसेमिक इंडेक्स आणि मधुमेह हे जसे एकमेकांशी जोडलेले आहेत, तसेच ग्लायसेमिक इंडेक्स आणि वजन यांचा एकमेकांवर परिणाम होतो असे कोणत्याही अभ्यासात सांगितलेले नाही. त्यामुळे जर वजन कमी करण्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे डाएट घेत असाल, तर असे करू नका. कारण अनेक फळं किंवा इतर पदार्थांची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असली तरी ते आपल्या तब्येतीसाठी खूप पोषक असतात.
४. पॅलियो डाएट (paleo diet)
वेगाने वजन कमी करण्यासाठी पॅलियो डाएट करण्याचा सल्ला दिला जातो. अशा प्रकारच्या डाएटमध्ये साखर, धान्य, डेअरी प्रोडक्ट्स, डाळी असे अजिबातच खाऊ नका, असे सांगितले जाते. पण असे केल्यामुळे शरीराला धान्ये, डाळी, दुग्धजन्य पदार्थ, कार्बोहायड्रेट्स यांचे पोषण मिळत नाही. त्यामुळे भारतीय आहारानुसार असे डाएटही आरोग्यासाठी खूप चांगले मानले जात नाही.
५. फर्टिलिटी डाएट (fertility diet)
असे अनेक डाएट प्लॅन असतात, जे स्पेशली स्त्री आणि पुरूषांमधील फर्टीलिटी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. जाडीमुळे जर कुणाला अपत्य होत नसेल, तर अशा लोकांसाठी डॉक्टर असे स्पेशल फर्टिलिटी डाएट प्लॅन करून देतात. पण या डाएटचा उपयोग जर कुणी फक्त वजन कमी करण्यासाठी करत असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. या डाएटनुसार जे पदार्थ खाऊ नयेत, असे सांगितले जाते, अनेकदा तेच पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात. त्यामुळे कुणाचेही फर्टिलिटी डाएट तुम्ही फॉलो करू नका. प्रत्येकाच्या शरीराच्या गरजेनुसार ते वेगवेगळे असते.