सुचेता कडेठाणकर
गणपतीचे दहा दिवस धामधूमीत गेले, म्हणता म्हणता बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आला. दोन वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव काहीसा शांततेत पार पडल्याने यावर्षी मात्र सगळ्यांनी २ वर्षांची कसर भरुन काढली. या वर्षी सर्वांनीच अतिशय थाटामाटात हा सण साजरा केला. गणपतीचे म्हणून मोदक, मिठाई आणि गौराईचे म्हणून गोडधोड असं भरपूर खाणं झालं असेल. कितीही नाही म्हटलं तरी प्रसाद म्हणून किंवा आवड म्हणून तरी आपण भरपूर गोड खातोच. आता काही दिवसांवरच नवरात्री आणि मग त्यानंतर दिवाळी. अशावेळी कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्या बरोबर उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घेणं कोणाला आवडणार नाही? पण मग या सगळ्यामध्ये, वजनाचा विचार मनात कसा आणि कुठे ठेवायचा? (Diet and Fitness Tips For Festive Season).
आता हा प्रसंग बघा....परवा माझ्या योग वर्गाला येणाऱ्या सर्वांना घेऊन पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेण्यासाठी प्रभात फेरीत केली. पायी दर्शन घेऊन आलो. आम्ही २५-३० जण होतो. आमचा हा फेरफटका झाल्यावर माझ्यातर्फे सर्वांना लस्सी पार्टी होती. सर्वांचा एकदम झकास मूड असतानाच, कोणीतरी एक शेरा मारला..."अरे बापरे, आता ही लस्सी पिऊन, इतका वेळ जे चाललो ते सगळं पाण्यात जाणार." अशी गिल्टची पाल मनात चुकचुकली की गोंधळ उडतो. आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा, त्या पदार्थाचा परीणाम आपल्या शरीरावर नेमका कसा होणार याची तयारी तो पदार्थ खाताना आपल्या मनात काय सुरु आहे इथपासून होते.
मी खाते आहे, तो पदार्थ आत्ता खाण्याचे नेमके कारण काय आहे, तो पदार्थ मला नेमका किती खायचा आहे हे मनात स्पष्ट असेल तर गोष्टी सोप्या होऊ शकतात. एकीकडे आपण मेंदूला सांगत असतो की "हा पदार्थ खात कामा नये, हा योग्य नाही, याने वजन वाढेल" पण दुसरीकडे आपली कृती मात्र विरुद्ध असते. म्हणजे पदार्थ शरीरात आला तरी आपण आपल्या मेंदूला तो नाकारण्याची पूर्वसूचना दिलेली असल्यामुळे तो योग्य त्या पद्धतीने पचत नाही आणि मग या गिल्टमुळे खाल्लेले सर्व पदार्थ चरबी बनून शरीरावर दिसायला लागतात. सणांच्या दिवसात सर्वात आधी सुट्टी कशाला मिळत असेल तर ती व्यायामाला मिळते. आपल्याला सणांचा आनंद मनसोक्त साजरा करता यावा यासाठी, व्यायाम सुरूच ठेवायला हवा.
या गोष्टी अवश्य करा
१. सर्व पदार्थ मर्यादित खाऊया.
सणावारांमध्ये आपल्या आवडीचे गोड, तळकट असे पदार्थ आपल्या पानात असतात. मात्र स्वत:वर थोडे नियंत्रण ठेवून हे पदार्थ योग्य त्या प्रमाणातच खायला हवेत. आवडते म्हणून प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले तर त्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो.
२. खाण्याचा वेग कमी करूया.
आपल्याला दररोज जेवायला १५ मिनिटे लागत असतील तर सणाच्या दिवशी ठरवून २५-३० मिनिटे सावकाश जेवण करू. वेग कमी करताना प्रत्येक घास जास्त वेळा चावून खाण्यावर भर देऊ. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होईल.
३. दिवसभर आठवणीने भरपूर पाणी प्यायला हवे
आपण जे अन्न खातो ते चांगल्या पद्धतीने पचावे यासाठी शरीरात पाण्याची आवश्यकता असते. गोड किंवा तेलकट खाल्ल्यानंतर लगेच खूप पाणी पिणे योग्य नसले तरी ठराविक वेळाने थोड्या प्रमाणात का होईना पाणी प्यायला हवे.
४. सणाची गडबड असली, तरी घरच्या घरी सोपे व्यायाम करा.
- आपल्या इमारतीचे जिने चढउतार करणे, दररोज कमीतकमी १५० पायऱ्या चढाव्यात.
- दररोज कमीतकमी ४ सूर्य नमस्कार
- रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर शांतपणे ५ मिनिटे एका जागी बसून ११ वेळा ओंकार
(लेखिका योग आणि आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
sucheta@kohamfit.com