Join us  

दिवाळीत डाएट कसं मॅनेज करायचं? तज्ज्ञ सांगतात- गोडावर कंट्रोल करण्याच्या ४ टिप्स, शुगर-वजन राहील कंट्रोलमध्ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 12:48 PM

Diet tips for Diwali to control sugar spike and weight gain : वर्षातील मोठ्या सणाला गोड खाच, पण...

डायबिटीस, कोलेस्टेरॉल किंवा लठ्ठपणा या समस्या असणारे लोक एरवीही डाएटची काळजी घेत असतात. मग दिवाळी आल्यावर या डाएटचे काय होणार असा प्रश्न या लोकांना साहजिकच पडतो. सगळे एकत्र आल्यावर किंवा आपण कोणाकडे गेल्यावर साहजिकच गोड, तेलकट असे काहीतरी खायला दिले जाते. फराळाचे पदार्थ दिवाळीच्या दिवसांतच खाल्ले जात असल्याने आपण त्याला नाही म्हणत नाही. इतकेच नाही तर कधी भेट म्हणून मिळालेले मिठाईचे बॉक्स नाहीतर कधी कोणी प्रेमाने दिलेला फराळातला लाडू, करंजी हे पदार्थ खाल्लेच जातात (Diet tips for Diwali to control sugar spike and weight gain). 

या सगळ्यात आपल्या आरोग्याची हेळसांड होते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. या काळात व्यायामालाही ब्रेक लागल्याने मेद किंवा फॅटस वाढतात आणि मग आरोग्याचे सगळे गणित बिघडून जाण्याची शक्यता असते. पण असे होऊ नये आणि आपली तब्येत चांगली राहावी यासाठी आरागतज्ज्ञ अमिता गद्रे काही सोप्या टीप्स देतात. दिवाळीच्या दिवसांतही आहारावर नियंत्रण ठेवायचं तर काय करता येईल याबाबत त्या काय सांगतात पाहूया... 

१. मिठाई खाताना लक्षात ठेवा

आपल्याला मिळालेली सगळीच मिठाई आपण खायला हवी असं काही नाही. आपल्याला जे सगळ्यात जास्त आवडतं, ते योग्य त्या प्रमाणात खा. म्हणजे खूप जास्त गोड खाल्ले जाणार नाही आणि गोड खाल्ल्याचा त्रासही होणार नाही. 

२. मिठाईसोबतच हेही करायलाच हवे

बरेचदा नाश्त्याच्या वेळी किंवा मधल्या वेळात मिठाई खाल्ली की आपल्याला जेवणाची इच्छा राहत नाही किंवा पुरेशी भूक लागत नाही. मग नकळतच जेवण स्कीप केले जाते. पण असे होता कामा नये. मिठाई खाल्ली असेल तरी त्यासोबत नेहमीचे जेवणही व्हायलाच हवे. विशेषत: या जेवणात प्रोटीन योग्य प्रमाणात असायला हवे. 

३. दिवाळी पार्टीला जाताना

दिवाळी पार्टी किंवा सेलिब्रेशनला जाताना रिकाम्या पोटी अजिबात जाऊ नका. उलट घरुन व्यवस्थित खाऊन जा. म्हणजे नकळतच त्याठिकाणी तेलकट, गोड, मसालेदार पदार्थ योग्य प्रमाणातच खाल्ले जातील. 

४. गोड खाताना मिळणारा आनंद

साधारणपणे आपल्याला एका प्लेटमध्ये गोडाचा पदार्थ दिला तर त्याचा पहिला घास खाल्ल्यावर आपल्याला प्रमाणाबाहेर आनंद होतो. दुसऱ्या घासाला या आनंदाचे प्रमाण थोडे कमी झालेले असते. तर त्यापुढच्या प्रत्येक घास खाताना मिळणारा आनंद कमी कमी होत जातो. मग आपण संपवायचे म्हणून हा पदार्थ संपवतो. पण पहिले २ ते ३ घास खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद आणि समाधान मिळाले असेल तर तो पदार्थ खाणे तिथेच थांबवायला हवे. अशावेळी पदार्थ एकतर घेतानाच कमी घ्या किंवा मग तो सोबतच्या व्यक्तींसोबत शेअर करा. 

 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सदिवाळी 2024आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना