दिप्ती काबाडे
घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले असेल. आता गणपती आले म्हटल्यावर खाण्यावर आणि गोडाधोडावर ताव मारला जाणार अशी भिती अनेकांच्या मनात निर्माण झाली असेल. ज्यांचे वेट लॉस डाएट सुरू आहे अशांना या गोष्टीमुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक महिन्यांची मेहनत या काही दिवसांच्या गोड खाण्याने वाया जाऊ शकते, अतिशय कष्टाने कमी केलेले वजन पुन्हा वाढू शकते (Diet Tips for Ganpati Festival). ज्यांच्या घरी गणपती बसणार असतील किंवा ज्यांना दर्शनासाठी इतर ठिकाणी जावे लागेल अशांना गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळणे शक्य होणार नाही. एकमेकांच्या आग्रहामुळे किंवा प्रसाद म्हणून तरी आपण थोडं-थोडं म्हणत नकळत बरंच गोड खातो. मात्र योग्य ती काळजी घेतली तर वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होऊ शकते. विशेष म्हणजे काही गोष्टी आवर्जून पाळल्या तर डाएटचा परिणाम वाया जाऊ न देता, वजन वाढू न देता सुद्धा आपल्या आवडीचे गोड पदार्थ आपण खाऊ शकतो. पाहूया त्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे (Weight loss Tips in Festive Season)...
१. योग्य प्रमाणातच खा
एखादी मिठाई खाणार असाल तर एका वेळी जास्तीत जास्त एक नगच मिठाई खा. प्रसाद म्हणून दिल्यावर किंवा समोर आल्यावर नियंत्रण राहू शकत नसेल तरी एकावेळी खूप जास्त न खाता अर्धी किंवा एकच नग मिठाई खावी. मिठाईमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने हे योग्य त्या प्रमाणातच खाल्लेले चांगले.
२. गोड जेवणाच्या आधी खा
अनेकदा गणपतीत जेवणात गोड असते. जेवणासोबत स्वीट डिश घेणार असाल तर हा नियम नक्की पाळा. सामान्यतः आपण सर्व जेवण झाल्यावर शेवटी स्वीट डिश खातो. मात्र तसे केल्याने कॅलरीज जास्त प्रमाणात वाढतात. जर स्वीट आधी खाल्ले तर बाकीचे अन्न किती कमी खावे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. स्वीट नंतर सलाड, कोशिंबीर, रायता जे असेल ते आधी खाऊन घ्या. त्यानंतरच जितकी गरज असेल तितके मुख्य अन्न घ्या. अशाप्रकारे तुम्ही कॅलरीज कमीतकमी ठेवूनही आवडते पदार्थ खाऊ शकता.
३. संध्याकाळनंतर गोड खाणे टाळा
सूर्य मावळल्यानंतर आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पूर्णपणे विघटन होत नाही. अशावेळी अन्नाचा जास्त भाग फॅट्स मध्ये रुपांतरीत होतो. म्हणूनच स्वीट खायचे असल्यास सूर्य मावळायच्या आत म्हणजेच दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागात खा.
४. व्यायाम विसरू नका
ज्या दिवशी आपण डाएट नीट पाळत नाही अशा दिवशी व्यायाम फारच महत्त्वाचा ठरतो. कारण कॅलरीज जर अतिरिक्त प्रमाणात घेतल्या गेल्या असतील तर या वाढलेल्या कॅलरीज व्यायामाने कमी करणे आवश्यक असते. म्हणूनच गोड खात असताना रोज न चुकता व्यायाम करण्याचे भान ठेवा.
५. ब्रेक वाढू देऊ नका
हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण, काही कारणांनी एकदा डाएट मोडले तर ते कायमचेच मोडले असे अनेकांचे होते. म्हणूनच आवडीचे पदार्थ सणाच्या दिवसांत खाताना मनाशी ठाम निश्चय ठेवा की एकदा सण संपला की पुन्हा आपण आपल्या नेहमीच्या डाएटवर आणि आहार नियंत्रणावर येणार आहोत.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)