आहार हा आपल्या आरोग्यातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अनेकदा आपण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेलिंग करतो. जीभेला चांगले लागणाऱ्या पदार्थांवर ताव मारत राहतो. पण त्यातून आपल्या शरीराचे किती पोषण होते हे आपल्याला समजत नाही. पण जंक फूडमुळे आपल्या शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. इतकेच नाही तर अनेकदा वजन कमी करायचे म्हणून आपण कधी मित्रमैत्रीणींच्या सल्ल्याने तर कधी मनानेच वेगवेगळे डाएट रुल्स फॉलो करतो. पण त्यामुळेही आरोग्याला त्रास होऊ शकतो. बरेच प्रयोग करुनही आपल्या शरीरावर त्य़ाचा योग्य तो परिणाम होत नसेल तर महिलांनी आहार घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, आहार हा आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते आपल्याला महागात पडू शकते.
पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक काय?
पुरुष आणि स्त्रियांच्या शरीररचनेत मूळातच खूप फरक आहे. पुरुषांची फॅटस स्टोअर करुन ठेवण्याची क्षमता ही पुरुषांपेक्षा खूप वेगळी आहे. पुरुषांच्या शरीरात एकूण फॅटसच्या ३ टक्के फॅटस जमा होतात. तर महिलांमध्ये हे फॅटस जमा होण्याचे प्रमाण १२ टक्के इतके असते. पण महिलांमध्ये जमा होणारे हे फॅटस आरोग्याच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर असतात. या फॅटसमुळे महिलांमध्ये टाइप २ डायबिटीस होण्याचे आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करायचे असे म्हणता तेव्हा तुम्हाला या गोष्टींची योग्य ती माहिती असणे आवश्यक आहे.
केटो डाएट घातक
सध्या केटो डाएट करायचे बरेच फॅड आले आहे. महिला तर अभिनेत्रींप्रमाणे झिरो फिगर हवी या नादात अनेकदा कोणतीही योग्य माहिती न घेता मनानेच वेगवेगळे डाएट फॉलो करतात. यामध्ये प्रामुख्याने केले जाणारे डाएट म्हणजे केटो डाएट. शरीरातील फॅटस कमी करणे महिलांसाठी तुलनेने जास्त अवघड असते. मात्र हे फॅटस महिलांना गर्भधारणेसाठी आणि त्यानंतर दूध येण्यासाठी आवश्यकही असतात हे लक्षात घ्यायला हवे. केटो डाएटमध्ये तुम्ही दिवसाला केवळ ५० ग्रॅम कार्बोहायड्रेटस खाऊ शकता. यामुळे तुमचा मेंदू आणि मेटाबॉलिझम यांचे असंतुलन होते आणि शरीरात हार्मोनल आणि मेटाबॉलिक बदल होतात. तसेच या डाएटमुळे फॅट लॉस होत असला तरी तो कमी काळासाठी होतो. या डाएटमुळे डोके जड होणे, मळमळमणे, अस्वस्थ वाटणे आणि थकल्यासारखे होणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य ती माहिती न घेता केटो डाएट करणे आरोग्याच्यादृष्टीने योग्य नाही.
इंटरमिजिएट फास्टींग
गेल्या काही वर्षात इंटरमिजिएट फास्टींग करण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. वजन, शरीरावर वाढलेले अनावश्यक फॅटस कमी करण्य़ासाठी या डाएटचा उपयोग होतो. असे असले तरी काही पदार्थ ठराविक काळासाठी न खाणे, ठराविक वेळेलाच जेवणे आणि काही वेळा अजिबात न खाणे याचे शरीरावर आणि मनावर चुकीचे परिणाम होऊ शकतात. पण काही अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार अशाप्रकारचे डाएट केल्याने सतत मूड बदलणे, अचानक खूप भूक लागणे, थकवा येणे, नैराश्य येणे किंवा रागावर नियंत्रण न राहणे, न खायला सांगितलेली एखादी गोष्ट सतत खात राहणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे कोणतेही डाएट करताना योग्य तो सल्ला घेऊन मगच करायला हवे हे नक्की.