शरीराची चयापचय क्रिया उत्तम नसली की खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यामुळे मग पचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या सभोवती काही व्यक्ती अशा असतात, ज्यांना खाण्यातला बदल अजिबात सहन होत नाही. ॲसिडिटी, मळमळ, गॅसेस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता असे अनेक त्रास सुरू होतात. त्याउलट ज्या व्यक्तींची चयापचय क्रिया उत्तम असते, अशा व्यक्तींना असा त्रास फार क्वचित जाणवतो. कारण चयापचय क्रिया उत्तम असल्याने त्यांची पचनशक्ती चांगली असते. पण पचनशक्ती कमजोर असणाऱ्या लोकांनी आहाराच्या बाबतीत काही पथ्य पाळायलाच हवीत..
बऱ्याचदा जेवताना आपण विरुद्ध अन्न एकत्र करून खातो. कोणता पदार्थ कशासोबत खावा किंवा तोंडी लावावा, याचे आयुर्वेदानुसार काही नियम आहेत. पण आपण मात्र अनेकदा हे नियम धाब्यावर बसवतो आणि त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. हे काही मोजके नियम लक्षात घेतले तर अपचनाचा त्रास आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो.
ही ३ पथ्ये पाळा..
१. वारंवार अपचनाचा त्रास होणाऱ्या मंडळींनी दुधासोबत वेगवेगळे प्रयोग करणं टाळलं पाहिजे. आजकाल गरम दुधात थंड आईस्क्रिम टाकून खाल्लं जातं. हॉट चॉकलेट मिल्क विथ आईस्क्रिम हा त्यातलाच एक प्रकार. असा काही प्रयोग तुम्ही करत असाल तर तो थांबवा. दूध एकतर गरम प्या किंवा थंड प्या. पण गरम दुधात थंड पदार्थ टाकणं किंवा थंड दुधात गरम काहीतरी घालून खाणं टाळा.
तिशी आली तरी फिट राहायचं तर 'फॅट्स'चं गणित चुकवू नका, अन्यथा वाढेल वजन आणि पुढे धोका..
२. गहू आणि तीळ हे दोन पदार्थ एकत्र करून खाल्ल्यानेही पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अनेकांना संक्रांतीच्या दिवशी केलेली तीळगुळाची पोळी पचन नाही. अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी गव्हाची पुरी तिळाच्या तेलात तळणेही टाळले पाहिजे.
३. ज्या लोकांना पचनाचा त्रास असतो, त्यांना हरबरा डाळीच्या पिठापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानेही त्रास होतो. अशा मंडळींनी हरबऱ्याची उसळ, भजे, ढोकळा अशा पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. हरबरा डाळ आणि मैदा असं कॉम्बिनेशन तुम्ही खात असाल, तर त्याने जास्तच त्रास होऊ शकतो.