वजन कमी करण्याचे अनेक आरोग्यदायी मार्ग आहेत, ज्याद्वारे वजन कमी होतं आणि आरोग्यही चांगलं राहातं. वजन कमी करणं म्हणजे आरोग्य बिघडवणं नव्हे तर फिट होणं होय. वजन कमी करण्यासाठी अनेकजण रात्री जेवायचं टाळतात. पण रात्री उपाशी पोटी झोपणं म्हणजे आपल्या हातानं आपलं आरोग्य धोक्यात घालण असतं असं तज्ज्ञ म्हणतात. रात्री झोपण्याआधी जेवणं, खाणं हे नेहेमीचं काम वाटत असलं तरी याचा आपल्या आरोग्याशी, आरोग्याच्या फायद्या तोट्याशी जवळचा संबंध असतो. उपाशी पोटी झोपल्यानं तज्ज्ञ म्हणतात की थेट चयापचय क्रियेवरच परिणाम होतो. त्याचा स्नायुंपासून मानसिक आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होतो. म्हणून तज्ज्ञांच्या मते उपाशी पोटी झोपू नये हेच योग्य.
रिकाम्या पोटी झोपल्यास
* काही न खाता झोपल्यास शरीराला भूक सतत जाणवत राहाते. या जाणिवेनं चयापचयाची क्रिया मंद होते. याविषयावर झालेला अभ्यास सांगतो की रिकाम्या पोटी झोपयाने आपल्या शरीराची प्रथिनांचं स्नायूत रुपांतर करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रात्री भूक लागलेली असतानाही रिकाम्या पोटी न झोपता काहीतरी पौष्टिक खायला हवं.
* आपण जेव्हा उपाशी पोटी झोपतो तेव्हा आपला मेंदू आपल्याला खाण्याबाबत सूचना देणं सुरु करतो. त्यामुळे झोपायला जातो तेव्हाच भूक जाणवत रहाते. त्यामुळे शांत झोप लागत नाही. झोपेत बैचेनी जाणवते.
* स्नायू मजबूत करण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो. याविषयीचा अभ्यास सांगतो की उपाशी पोटी झोपल्यानं स्नायुंची हानी होते. प्रथिनं हे मानवाच्या शरीरासाठीचं सर्वात आवश्यक पोषक घटक आहे. उपाशी पोटी झोपल्यानं शरीरातील प्रथिनं आणि अमिनो अँसिडची काम करण्याची क्षमता नष्ट होते. मेद जर नसेल तर शरीर प्रथिनं तयार करण्यासाठी स्नायुंची झीज करण्यास सुरुवात करतो.
* रात्री काही खाल्लं नाही तर आपलं वजन कमी होईल या भावनेनं होणारा आनंद क्षणिक टिकणारा असतो. उपशी पोटी झोपल्यानं उलट मूड बिघडतो, स्वभाव चिडचिडा होतो. त्याचा परिणाम नात्यांवर देखील होतो.
* रिकाम्या पोटी झोपल्यास दुसर्या दिवशी सकाळी आपल्या ऊर्जेची खूप गरज लागते. ही खरज भागवण्यासाठी जंक फूड खाल्लं जातं. त्यामुळे वजनावर आणी आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.
रात्री झोपण्याआधी काय खावं?
वजन कमी करण्यासाठी संपूर्ण जेवणं टाळणं वेगळं आणि उपाशी पोटी झोपणं वेगळं. जेवण टाळून शरीरास आवश्यक ते पौष्टिक खाऊन झोपल्यास त्याचा शरीराला फायदा होतो आणि वजन कमी करण्याचा उद्देशही साध्य होतं. झोपण्या आधी ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अँसिड असलेले पदार्थ खावेत. या पदार्थामुळे सेरोटोनिन हे हार्मोन सक्रीय होतं आणि झोप चांगली लागण्यास मदत होते.
दूध, चीज, सुका मेवा, बिया, तीळ यासारख्या पदार्थात ट्रिप्टोफॅन हे अमीनो अँसिड असतं. हे थोड्या प्रमाणात गहू, तांदूळ्, बाजरी, ज्वारी, नागली यासारख्या धान्यांपासून बनलेल्या पदार्थांबरोबर खाल्लं तर शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते.
झोपण्यापूर्वी हे टाळा
रात्री झोपण्यापूर्वी पचण्यास जास्त वेळ आणि श्रम लागणारे , पोट खराब करणारे, झोपमोड करणारे गोड, मसालेदार, तळलेले पदार्थ खाणं टाळावं. सोबतच कॅफिनयुक्त पदार्थ, अल्कोहोल या बाबी घेण्याचंही टाळावं. उपाशी पोटी झोपणं जितकं धोकादायकच तितकंच या स्वरुपाच्या पदार्थांचं , पेयांचं सेवन करणंही घातक असतं.
जेवण करुनही भूक लागत असल्यास
* रात्री जेवल्यानंतरही झोपण्याच्या वेळेस अनेकांना भूक लागते. तेव्हा काही बाही खाणं हा त्यावरचा उपाय नाही. रोजच रात्री जेवण झाल्यावर झोपण्याआधी भूक लागत असेल तर आपल्या खाण्याच्या सवयी थोड्या बदलाव्यात. रात्री जेवणाच्या वेळेस अर्धपोटी राहिल्यासही भूकेची जाणीव होवू शकते.
* दिवसा किमान तीन वेळेस खाल्लेलं असेल तर रात्री झोपताना भूक लागत नाही.
* रात्रीच्या जेवणात प्रथिनं आणि तंतूमययुक्त पदार्थांचं सेवन केल्यास पोट भरलेलं राहातं . अनावश्यक भूक लागत नाही.
* रात्री जेवण करुनही भूक लागलीच तर पाणी पिणं हा चांगला पर्याय आहे. पाण्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते. शरीर आतून ओलसर ठेवण्यास आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते.
* झोपण्याआधी भूक लागल्यास मध, दूध बदाम यासारखे पदार्थ सेवन करणं योग्य मानलं जातं.
* रात्री हलकं फुलकं खाल्ल्यानं पोट भरलं नाही, भूक लागली असं जाणवत असेल तर थोडं बाहेर फिरुन यावं यामुळे भूक शांत होते.