Join us  

Ditox पोळी ! वजन कमी करायचं तर पोळी खा, साधी नाही  डिटॉक्स पोळी, घ्या रेसिपी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 6:39 PM

गव्हाची पोळी ही पौष्टिक असते हे खरं पण ती वजन कमी करण्यासाठी कशी उपयोगी पडेल याचा विचार करायला हवा. हा विचार केल्यास किंवा तसा शोध घेतल्यास डिटॉक्स पोळीचा पर्याय समोर येतो. ही डिटॉक्स पोळी आहे काय?

ठळक मुद्देडिटॉक्स पोळी कणीक आणि भाजी यांच्या मिश्रणातून तयार होते. डिटॉक्स पोळी म्हणून भोपळ्याची पोळी ही उत्तम आहे.डिटॉक्स पोळीमुळे वजनाशी संबंधित खाण्याचं प्रमाण आणि उष्मांकाचं प्रमाण या दोन्ही गोष्टींचा मेळ व्यवस्थित घालता येतो. छायाचित्रं- गुगल

पोळी हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. दिवसातून दोन वेळेस जेवणात पोळी ही लागतेच. पोळी ही शरीरास पौष्टिक असते हे खरं पण जेव्हा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करायला हवा. त्यामुळे गव्हाची पोळी ही पौष्टिक असते हे खरं पण ती वजन कमी करण्यासाठी कशी उपयोगी पडेल याचा विचार करायला हवा. हा विचार केल्यास किंवा तसा शोध घेतल्यास डिटॉक्स पोळीचा पर्याय समोर येतो. या डिटॉक्स पोळीमुळे आहारातील पोळीचं प्रमाण कमी होत नाही पण वजन वाढण्यास कारणीभूत ठरणार्‍या पोळीतील कणकेचं प्रमाण मात्र निश्चितच कमी होतं.

 छायाचित्र- गुगल 

डिटॉक्स पोळी आहे तरी काय?

डिटॉक्स पोळी कणीक आणि भाजी यांच्या मिश्रणातून तयार होते. ही डिटॉक्स पोळी खातो तेव्हा अर्ध्या पोळीच्या बरोबरीचे उष्मांक पोटात जातात.  डिटॉक्स पोळीमुळे शरीरात पोषक घटक तर जातातच पण शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासही मदत होते. या गुणामुळेच ही डिटॉक्स पोळी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.  डिटॉक्स पोळीचं वैशिष्ट्य म्हणजे  कोणत्याही हंगामी भाजीचा उपयोग करुन ती तयार करता येते. कोणती भाजी उपलब्ध आहे आणि आपल्या शरीराला कोणत्या पोषक घटकांची सर्वात जास्त गरज आहे हे ओळखून त्यानुसार कणकेत भाजी मिसळावी लगते. या डिटॉक्स पोळीमुळे वजनाशी संबंधित महत्त्वाच्या असलेल्या खाण्याचं प्रमाण आणि उष्मांकाचं प्रमाण या दोन्ही गोष्टींचा मेळ व्यवस्थित घालता येतो.

डिटॉक्स पोळी म्हणून भोपळ्याची पोळी, पालक, बीट, मेथी या भाज्या घालून केलेली पोळी आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरते.अशा प्रकारची पोळी  शरीरास पोषक घटकही पुरवते. डिटॉक्स पोळी करताना एकास एक एवढं प्रमाण घ्यावं लागतं. म्हणजे एक कप कणीक असल्यास एक कप भाजी घ्यावी. डिटॉक्स पोळीमुळे (भाज्यांच्या समावेशामुळे)  शरीरात ओलावा राहातो आणि शरीरातील उष्णता कमी होते.डिटॉक्स पोळीद्वारे  शरीरात पोषक घटक तर जातातच पण शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासही मदत होते. या गुणामुळेच ही डिटॉक्स पोळी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.

 छायाचित्र- गुगल

डिटॉक्स पोळी करण्यासाठी जी भाजी घालायची आहे ती स्वच्छ धुवून् बारीक चिरुन तिला मिक्सरमधून बारीक प्युरी स्वरुपात करुन घ्यावी.  एक कपभर भाजीची प्युरी असल्यास एक कप कणीक घ्यावी. हे दोन्ही एकत्र करुन कणीक मळून घ्यावी. भाजीच्या प्युरीत पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यानं वेगळ्या पाण्याची गरज भासत नाही. आवश्यकता वाटली तरच थोडं थोडं पाणी घालून कणीक मळावी..कणीक मळताना चवीपुरतं मीठ घालावं. इतर काहीही घालण्याची गरज नसते.कणीक चांगली मळून ती अर्धा तास झाकून ठेवावी.नेहेमीच्या पोळीप्रमाणे पोळी लाटून आणि भाजून घ्यावी. ही डिटॉक्स पोळी कोणत्याही भाजीसोबत छान लागते.