Join us  

उपवास करताना तुम्हीही हमखास 4 चुका करताय? तब्येत ढासळणार, फिटनेसचे वाटोळे..त्यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2022 4:14 PM

फास्टिंगचा फिटनेस इफेक्ट मिळवायचा तर उपवासाच्या दिवशी आहारात चुका टाळून नियम पाळायला हवेत. उपवासाचे आहाराचे नियम काय सांगतात?

ठळक मुद्देसाखर, गोड पदार्थ खाणं यावर उपवासाच्या दिवशी नियंत्रण ठेवायला हवं. कृत्रिम साखरेऐवजी नैसर्गिक स्वरुपातली साखर सेवन करायला हवी. उपवासाच्या दिवशी मर्यादित आहार जितका महत्त्वाचा तितकंच चहा काॅफी पिण्यावर नियंत्रणही  आवश्यक असतं. शरीराची लो कार्बची, हेल्दी फॅटसची गरज आरोग्यदायी पध्दतीने भागवता यायला हवी. 

उपवासाला जितकं धार्मिक आणि अध्यात्मिक अंगं असतं तितकंच आता आरोग्याचं अंगही आहे. श्रध्देसोबतच तब्येत जपण्यसाठी, आरोग्य कमावण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. फिटनेससाठी रोज व्यायाम आणि आहार नियम पाळून जो प्रयत्न केला जातो  त्याला हातभार म्हणून उपवास केला जतो. पण एरवी आठवड्याचे सहा दिवस सांभाळलं जाणारं आरोग्याचं तंत्रं उपवासाच्या दिवशी काही चुका केल्यात तर पूर्ण बिघडतं.

Image: Google

फिटनेस राखण्यासाठी, आरोग्य कमावण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी म्हणून केलेला उपवास या सगळ्यांसाठीच नुकसानदायक ठरतो तो केवळ उपवासाच्या दिवशी आहारात केलेल्या चुकांमुळे. या चुका टाळून उपवास केला तर फास्टिंगचा फिटनेस इफेक्ट नक्की दिसेल. 

चुका टाळा नियम पाळा

Image: Google

1. उपवासाला तिखट मीठासोबतच गोड पदार्थांचं सेवन एरवीपेक्षा जास्त केलं जातं. त्याचं कारण उपवास दिलं जातं. उपवास आहे म्हणून जास्त गोड खाल्लं तरी बिघडत नाही आणि उपवासाला एनर्जी हवी म्हणून गोड खाणं गरजेचं आहे. असे हे दोन गैरसमज उपवासाच्या दिवशी गोड खाण्याचा मोह पाडतात. हा मोह पूर्ण केला तर वजन कमी करण्यासाठी उपवास हा उद्देश मोडीत निघतो.  तज्ज्ञ म्हणतात उपवासाच्या आहाराद्वारे फिटनेस राखायचा असेल तर साखर, गोड पदार्थ खाणं यावर उपवासाच्या दिवशी नियंत्रण ठेवायला हवं. गोड खाण्याची इच्छा झालीच तर गूळ, खजुराचं सिरप घालून केलेले पदार्थ तेही थोडे प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

Image: Google

2. उपवासाला पचनास हलके पदार्थ खावेत. कर्बोदकं जास्त असणारे पदार्थ जास्त खाल्ले जातात. यामुळे क्षणिक ऊर्जा मिळालेली वाटते पण पुन्हा काही वेळाने पुन्हा भूक लागून तसेच पदार्थ खावेसे वाटतात. उपवासाच्या दिवशी दिवसभर हेच चक्र सुरु राहिलं तर उपवास करुन आरोग्यास फायदा शून्य आणि नुकसान जास्त होईल हे नक्की. उपवासाच्या दिवशी पचनास हलके, फायबर आणि प्रथिनंयुक्त घटकांचा आहार मर्यादित प्रमाणात आणि दिवसातून केवळ दोनदा-तिनदाच घ्यावा. उपवास आहे, काही नाही खाल्लं तर पटकन वजन कमी होईल म्हणून काही न खाता दिवसभरात भरपूर वेळा चहा काॅफी प्यायली जाते. त्याचा परिणाम म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. काही न खाल्ल्याने चयापचय क्रियेचं नुकसान होतं. हे टाळण्यासाठी मर्यादित आहार जितका महत्त्वाचा तितकंच चहा काॅफी पिण्यावर नियंत्रणही महत्त्वाचं. 

Image: Google

3. उपवासाला मधून मधून लागणारी भूक भागवण्यासाठी बटाट्याचे वेफर्स खाल्ले जातात. पण ते प्रामुख्याने तेलकट असल्याने त्याचा पचनावर विपरित परिणाम होतो. अशा प्रकारे तळलेले वेफर्स जास्त खाण्यात आले तर पोट बिघडणं, डोकं दुखणं, छातीत जळजळणं हे त्रास होतात. हे टाळण्यासाठी तज्ज्ञ बटाट्याचे तळलेले पदार्थ खाण्याऐवजी बटाट्याचे भाजलेले अर्थात बेक्ड केलेले वेफर्स खाण्याचा सल्ला देतात. उपवासाला अजिबात कर्बयुक्त पदार्थ खाऊ नये असं नाही. थोडया आणि आरोग्यदायी कर्बोदकांची  गरज शरीराला असते. ती भागवण्यासाठी बेक्ड वेफर्स हा चांगला पर्याय असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. 

Image: Google

4. रोजच्या आहारात लो कार्बची जशी गरज असते तशीच हेल्दी फॅटसचीही गरज असते. उपवासाच्या दिवशीही शरीराची /आरोग्याची ही गरज असतेच.  ती आरोग्यदायी पध्दतीने भागवण्यासाठी अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया यांचा समावेश आहारात करावा. यामुळे आरोग्यदायी फॅटस तर मिळतातच सोबतच शरीराला पोष्टिक घटकही मिळतात. एरवी जशी आपण आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेतो तशीच काळजी उपवासाच्या दिवशी घेणंही आवश्यक आहे. नाहीतर उपवास करुनही वजन मात्र वाढतंच ही तक्रार कधीही न संपणारी असेल असं तज्ज्ञ जे तज्ज्ञ म्हणतात ते बरोबरच आहे! 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजना