Join us

उन्हात सतत फिरावं लागतं, कामासाठी प्रवास होतो? हा घरगुती थंड काढा प्या, ऊन बाधणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2024 08:00 IST

ऊन बाधू नये म्हणून काही घरगुती उपाय करावे पण उन्हाचा त्रास वाढला तर डॉक्टरांकडेच जाणं योग्य.

ठळक मुद्देतहान लागली की हेच पाणी प्यायचं. तरतरीही येते.

उन्हाळा आला की आपण दरवर्षी म्हणतो की ऊन फार वाढलं आहे. यंदा फारच ऊन आहे. पण हे सारं म्हणताना कामं चुकत नाहीत. उन्हात जाऊन काम करावंच लागतं. प्रवास होतो. अंगाची लाहीलाही होते. कधीकधी भोवळ येते. चक्कर येते. धाप लागते. काहीजण तर आपण काय बोलतो आहोत हे लक्षात न येता बडबडही करतात. डिहायड्रेशनचा त्रास तरी अत्यंत आम आहे. आणि मु‌ख्य म्हणजे उन्हाळ्यात बाहेरचे खराब पाणी चुकून पिण्यात आले तर तब्येत बिघडते ती वेगळीच,

यावर उपाय म्हणजे घरुन पाणी नेणं.पण अनेकदा नुसतं पाणी पिऊनही पोट डब्ब होतं. पोट दुखतं, जेवण जात नाही. उलटीसारखं होतं. मळमळतं. थोडक्यात काय ऊन बाधतं. उन्हाळी लागून सतत लघवीला जावं लागलं तर अनेकजणी हैराण होतात. नाजूक जागेचं दुखणं कुणाला सांगतााही येत नाही आता यावर उपाय काय? खरंतर उपाय अनेक आहेत. आपण डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन उचित आहार घ्यावा. व्यायाम करावा. तब्येतीकडे लक्ष द्यावं.पण एक पारंपरिक उपायही सोबत करुन पहायला हरकत नाही. त्यानं अपाय काही नाही. अर्थात चुकून जर कुणाला हे पाणी पिऊन मळमळ होते आहे असं वाटलं तर ते पिऊ नये कारण काहींना आंबट सरबतांचाही उन्हाळ्यात त्रास होतो. पित्त वाढते.

(Image : google)

तर उपाय काय?

चार मिऱ्या,  लहानसा आल्याचा तुकडा , चार तुळशीची पानं, कपभर पाण्यात उकळवून घ्यायची, पाणी आटून अर्धा कप करायचं. हे पाणी गार झालं की गाळून घ्यायचं. आता त्या पाण्यात अजून दोन लीटर पाणी घालायचं. साधारण एक लिटरच्या दोन बाटल्या. एक चमचा मीठ आणि एक लिंबू पिळायचा. मीठ चवीप्रमाणे. हे पाणी उन्हाळ्यात प्यायचं. उन बाधत नाही. ज्यांना लिंबानं मळमळतं त्यांनी लिंबू न पिळता चिमूटभर साखर चवीला घालावी. तहान लागली की हेच पाणी प्यायचं. तरतरीही येते.