शिल्पा शेट्टी आणि फिटनेस हे एक समीकरण आहे. आज 44 वर्षांच्या शिल्पा शेट्टीकडे पाहून अनेकींना स्वत:ला फिट ठेवण्याची प्रेरणा मिळते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी ही व्यायामासोबतच घरगुती उपायांनाही तितकंच महत्त्व देते.
शिल्पा शेट्टीने नुकतीच स्वत:च्या दिनचर्येबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. यात तिने दिवसभर ती आहारात काय? घेते याची माहिती दिली होती. या माहितीत दोन वेळा सीसीएफ चहा या पेयाचा उल्लेख होता. हा चहा शिल्पा शेट्टी दुपारी दोन वाजता आणि रात्रीच्या जेवणानंतर असा दोन वेळा घेते. आता हा सीसीएफ चहा नेमका आहे तरी काय? असा प्रश्न वाचणार्यांना पडला असेल . हा काहीतरी विदेशी प्रकार असेल असंही काहींना वाटलं असेल. पण खरंतर हे आहे शिल्पा शेट्टीचं आवडतं डीटॉक्स ड्रिंक. या डीटॉक्स ड्रिंकची रेसिपीही तिने शेअर केली आहे. हे डीटॉक्स ड्रिंक तयार करणं अगदीच सोपं आहे.
सीसीएफ चहा म्हणजे काय?
सीसीएफ चहा हे काही अवघड कोडं नाही की कोडवर्ड नाही. हे आहे एक आरोग्यदायी पेयं. ते तयार करण्यासाठी बाहेरुन एकही गोष्ट आणण्याची गरज नाही. घरच्याघरी या तीन वस्तू मिळतात. सीसीएफ म्हणजे क्यूमिन अर्थात जिरे, कोरिएण्डर म्हणजे धने आणि फेनेल म्हणजे बडिशोप. या तीन घटकांनी तयार होणारा चहा म्हणजे सीसीएफ चहा होय.
जीरे, धने आणि बडिशोप हे तीन घटक स्वयंपाकात सुगंधी मसाले म्हणून वापरले जातात. पण याचा चहा हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो असं शिल्पा शेट्टी म्हणते. विशेषत: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी हा चहा उपयुक्त आहे. काहीबाही, वेळीअवेळी खाऊन आपली बिघडलेली पचन व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त आहे.
हा चहा परिणामकारक कसा?
जिरे, धने आणि बडिशोप हे तीन घटक या चहाची परिणामकारकता वाढवतात. जिरे हे प्रामुख्यानं पचनसंबंधित समस्यांसाठी उपयुक्त मांले जातात. धन्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करुन थंडावा मिळण्यासाठी करतात . धन्याचा उपयोग मानसिक समस्यांवरही होतो. मनातली भीती कमी करण्याचं काम धने करतात. तर बडिशोपाचा उपयोग मुखवास म्हणून होतो. पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर बडिशोप ही रामबाण उपाय आहे.
या तीन गोष्टी एकत्र करुन त्याचा चहा करुन पिल्यास त्याचा सर्वात चांगला फायद पचन क्रियेवर होतो. हा चहा पचनासंबंधीच्या समस्या दूर करतो. शिवाय शरीरातील मेद कमी करतो. शरीरात असलेले विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी हा चहा मदत करतो. हा चहा डीटॉक्स ड्रिंक म्हणून दोन वेळेच्या जेवणानंतर प्यायल्यास त्याचा वजन कमी होण्यास फायदा होतो. पण शिल्पा शेट्टी म्हणते की या सीसीएफ चहासोबत नियमित व्यायामाचीही सवय असेल तर वजन वाढण्याचा प्रश्नच उरणार नाही.
सीसीएफ चहा कसा करायचा?
अर्धा चमचा बडिशोप, अर्धा चमचा अख्खे धने, अर्धा चमचा जिरे आणि दिड कप पाणी घ्यावं.
एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावं. पाणी उकळायला लागलं की यात वरील तिन्ही गोष्टी बडिशोप, धने आणि जिरे टाकावेत. आता पाणी थोड्यावेळ उकळू द्यावं. दिड कप पाणी एक कप झाल्यासारखं वाटलं की गॅस बंद करावा. पाणी गाळून घ्यावं. थंड होवू द्यावं. थोडासा गोडवा येण्यासाठी यात थोडं मध घालावं की झाला तयार सीसीएफ चहा.