Join us  

भजीवडे तळून उरलेलं तेल पुन्हा पुन्हा तळणासाठी वापरता? आजारांना आमंत्रण देताय, सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 5:55 PM

आषाढ महिना सुरू असल्यामुळे घरोघरी सध्या तिखट, गोड पुऱ्या तळणे सुरू असेल. तसेच पावसाळ्यातही तळलेले चटकदार पदार्थ खाण्याचा मोह होतोच. पण पुऱ्या, वडे किंवा भजी तळल्यावर कढईत उरलेले तेल पुन्हा वापरत असाल तर मात्र सावधान !

ठळक मुद्देपरदेशात तर तळलेले तेल जमा करण्यासाठी ठिकठिकाणी कलेक्शन सेंटर असतात.

तेलाच्या किमती जवळपास १०० रूपये लीटर आहेत. किंबहूूना काही ब्रॅण्डच्या तेलाच्या किमती तर त्याहीपेक्षा अधिक आहेत. म्हणूनच तर तळलेलं तेल टाकून देणं महिलांच्या जीवावर येतं. महागाई एवढी गगनाला भिडलेली असतात, अशा पद्धतीने महिलांनी केलेला विचार अगदीच स्वाभाविक आहे. पण कढईतल्या त्या थोड्याशा तेलासाठी पैशांचा विचार करत असाल, तर भविष्यात तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते, असे डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे कितीही जीवावर आले, तरी एकदा तळलेले तेल पुन्हा वापरू नका, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. 

 

काही महिन्यांपुर्वी फुड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकदा तळणासाठी वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. या तेलामध्ये ट्रान्सफॅटचे प्रमाण खूप वाढलेले असते. ट्रान्सफॅट्र जास्त प्रमाणात असणे हृदयासाठी अत्यंत हानिकारक आहे. तळलेल्या तेलात जर पुन्हा पुन्हा पदार्थ तळले तर त्यातील रॅडिकल्स वाढत जातात. प्रचंड वाढलेले रॅडिकल्स कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात, असेही काही अभ्यासातून मांडले गेले आहे. 

 

आपल्या शरीरात HDL आणि LDL असे दोन प्रकारचे कोलेस्टरॉल असतात. यापैकी HDL हे चांगले कोलेस्टरॉल तर LDL हे वाईट कोलेस्टरॉल म्हणून ओळखले जाते. तळलेल्या तेलामधून शरीरात प्रवेश करणाऱ्या ट्रान्सफॅटमुळे वाईट कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढत जाते. शरीरातील वाईट कोलेस्टरॉल वाढणे हृदयासाठी अत्यंत धोक्याची सुचना आहे. यामुळे हृदयासंबंधी अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे थोडासा मोह टाळणे कधीही चांगले. 

तळलेल्या तेलाचा असा उपयोग करा- शक्यतो तळताना मोजून मापूनच तेल घ्या. एकेक घाणा तळल्यावर अंदाज घेऊन तेल वाढवत न्या. असे केले तर मग फार फार तर पळीभर किंवा त्यापेक्षाही कमी तेल कढईत उरेल.

- तळलेले तेल जर टाकून द्यावेसे वाटत नसेल, तर दर वेळेला जे काही तेल कढईमध्ये उरेल, ते एका वेगळ्या बाटलीमध्ये भरून ठेवता जा. ही झाली आपली दिवाळीच्या दिव्यांसाठी तेल बँक. दिवाळीला हेच तेल वापरून अंगणातले दिवे, पणत्या पेटवाव्यात.

- तळलेल्या तेलाने तुळशीपुढचा दिवा लावायला काहीच हरकत नाही. पण शेवटी हा ज्याच्या- त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. 

 

हे देखील लक्षात ठेवातळलेले तेल कधीही सिंकमध्ये फेकू नका. यामुळे ड्रेनेज पाईप ब्लॉक होऊ शकतात. तळलेल्या तेलामुळे सिंकमधील कचरा विघटीत करणारे जीवाणू मरतात. त्यामुळे मग पाईप चोकअप होऊ शकतो. त्यामुळे हे तेल सरळ ओल्या कचऱ्यात टाका. 

 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्स